सार्थक

दिंनाक: 07 May 2018 15:20:47


रवींद्रनाथ ठाकूर हे खर्‍या अर्थाने बहूआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची व्याप्ती आपल्याला स्तिमित करते. महत्त्वाचे म्हणजे ते बालमानसतज्ज्ञ होते. छोट्या मुलांसाठी त्यांनी लिहिलेले सहजपाठ आजही बंगालमध्ये शिकवले जातात. त्यात मुलांच्या आजूबाजूच्या घटना, गोष्टी लिहिल्या आहेत. त्या वाचताना मुलांना मजा वाटते. कारण एखादी गोष्ट आवडली नाही तर मुलं चटकन तिथे मनाने गैरहजर होतात, हे रवींद्रनाथांना माहीत होते.

‘सार्थक जनम आमार ...’ ही मायभूमीबद्दल प्रेम, कृतज्ञता व्यक्त करणारी सुंदर कविता.

हे आई, या देशात माझा जन्म झाला आणि मी तुझ्या प्रेमात बद्ध झालो, हे माझं भाग्यच.

हे मायभूमी, तुझे वैभव किती, तुझ्याकडे रत्न माणकं आहेत की नाही हे मला माहीत नाही. (पारतंत्र्यात इंग्लंडच्या राणीच्या वैभवाच्या पार्श्वभूमीवर) पण मी जेव्हा तुला बिलगतो तेव्हा तुझी वत्सलता मला जाणवते.

फक्त तुझ्याच वनात, बागेत सुंदर, सुगंधी फुले फुलतात आणि तुझ्याच विशाल गगनात चंद्र, चांदण्या अमृत वर्षाव करतात.

जन्मल्यानंतर प्रथम तुझेच तेज माझ्या दृष्टीस पडले आणि तेच तेज:पुंज रूप पाहता पाहता तुझ्या मांडीवर मी डोळे मिटावे.

अशी ही कविता.

 

सार्थक झाले जन्माचे मम

जन्मलो या देशात ।

सार्थक वाटे आई, तुझिया

बद्ध झालो प्रेमात ॥

 

ठाऊक नाही वैभव, माया

किती तुझी की, तू निष्कांचन ।

जाणवते मज सुखद छाया

तुला बिलगता माझे तनमन ॥

 

वनी तुझ्या गं कितीक सुमने

रूप-गंधे मना मोहवी ।

चंद्र - चांदण्या अमृत शिंपीत

तुझ्याच गगनी नित्य तोषवी ॥

 

दिव्यतेज तव प्रथम आई,

जन्मताच मम दृष्टीस पडले ।

तेच तेज मी निरंत पाहत

तव अंकी मग मिटेन डोळे ॥

 

-स्वैर अनुवाद – सुखेशा (स्वाती) दाढे

[email protected]

मूळ बंगाली कविता – रवींद्रनाथ टागोर