नेटभेट -भाग ४

दिंनाक: 06 May 2018 14:46:47


आश्चर्य... विज्ञानाचं व साबणाच्या फुग्यांचं!

या सदरातील धम्माल वेबसाईटस तुम्हाला आवडताहेत, असं समजलं. इंटरनेटवर लक्षावधी वेबसाईट्स आहेत. त्या महासागरातून वेचून आणलेल्या दोन धम्माल वेबसाईट्स आज आपण पाहू या.

तुम्ही लहानपणी साबणाचे फुगे नक्कीच बनवले असतील. साबणाचे फुगे पूर्वी सुरळीवाटे किंवा नळीवाटे फुंकून तुम्हीही बनवले असतील. आता मात्र साबणाचे फुगे बनवणारी, बॅटरीवर चालणारी छोटी खेळणी सर्रास मिळतात. असे फुगे बनवण्यासाठी काही विशेष कौशल्य लागत नाही, असं तुमचं मत असलं तरी या विषयाचा सखोल अभ्यास केलेले एक प्राध्यापक आहेत. प्रचंड ज्ञान देणारी, त्यांची याच विषयावरील वेबसाईट तुम्हांला वेगळ्याच विश्वात घेवून जाईल. वेबसाईट पत्ता असा आहे – www.bubbles.org

तुम्हांला येथे साबणाच्या फुग्यांचा इतिहास समजेल. सतराव्या शतकात एका चित्रकाराला ही भन्नाट युक्ती सुचली. अठराव्या, एकोणिसाव्या शतकापर्यंत साबणाचे द्रावण करून असे फुगे बनवले जात. पण १९४० मध्ये ‘केमटॉय’ कंपनीने बाजारामध्ये ‘बबल सोल्युशन’ नावाचं आगळ उत्पादन आणून धम्माल उडवली. १९६० पासून तर या फुग्यांचे (!) क्रीडा प्रकारदेखील अस्तित्वात आले. येथील History या लिंकवर क्लिक करून ते आवश्य वाचा.

पण मुळात साबणाचा फुगा किती वेळ टिकतो? तो मोठा व्हावा व खूप वेळ टिकून राहावा यासाठी ग्लिसरीनसारखी आणखी कोणती रसायनं वापरतात? हाताचा, हँगरचा, तारांचा वापर करून फुगे कसे बनवतात? हे सारं वाचायला तुम्हांला नक्कीच आवडेल. हे फुगे रंगीत का दिसतात? ते गोलच का असतात? ते जास्तीतजास्त किती वेळ टिकू शकतात? अशा शंकांचं निरसनही येथे होईल. तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल, दर वर्षी जगात ‘साबणाच्या फुग्यांसाठीच्या द्रावणाच्या’ २०० दशलक्षहून अधिक बाटल्या विकल्या जातात.

तुमची व्हिडीओ गेम्सची आवड लक्षात घेवून येथे साबणविषयक खेळही दिलेले आढळतात. (पाहा games वर क्लिक करून)

David Stein या व्यक्तीने ५० फूट (अबब!) लांब व २ फूट व्यासाचा, जगातला सर्वात लांब व मोठा साबणाचा फुगा बनवल्यामुळे ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये विक्रमवीर म्हणून त्याचं नाव नोंदवलं गेलंय.

‘Question’ या दालनात ‘biggest bubble’ वर क्लिक करून हा जगातील ‘सर्वात मोठा’ साबणाचा फुगा पाहा. साबणाच्या फुग्याच्या आतमध्ये ३-४ व्यक्ती उभ्या व त्यांच्याभोवती फुगा पाहून तर थक्कच व्हाल! तोंडाने बुडबुडे काढण्याऐवजी एखादा भारतीय हे रेकॉर्ड मोडण्याचे प्रयत्न करील काय?

वरळीचं ‘नेहरू सायन्स सेंटर’ किंवा बंगळुरूचं ‘विश्ववरय्या सायन्स म्युझियम’ तुम्ही पाहिलं आहे का? विज्ञानात रुची असणाऱ्या नेटीझन्ससाठी सायबरविश्वासातही विज्ञानविषयक माहितीचे अगणित खनिजे आहेत.

www.unmuseum.org नावाच्या या संकेतस्थळावरील विविध माहिती पाहूनच तुम्ही हरवून जाल. UN म्हणजे Unnatural Mystery. उडत्या तबकड्या, ब्रम्हांडाचा रंगमंच, व्हर्च्युअल सायक्लोरामा यासारख्या पर्यायांवर क्लिक करून पुढे येणारी नवनव्या वेबपेजेसवरील माहिती वाचून व पाहून थक्क व्हा. ती गंमत येथेच वर्णन करून सांगितली तर काय मजा? या वेबसाईटवर नेहमी नवीन माहितीची भर पडत असते.

सहजपणे घरी करून पाहता येतील असे विज्ञानविषयक सोपे पण अद्भूत प्रयोग करण्याची समग्र माहिती येथे सचित्र रूपाने दिलेली आहे. पण या वेबसाईटवरील सर्वोत्तम दालन आहे ‘प्राचीन जगातील सात आश्चर्य’. त्यासाठी क्लिक करा www.unmuseum.org/wonders.html

विज्ञानविषयक शालेय प्रोजेक्ट्स करू इच्छिणांऱ्यासाठी हे संकेतस्थळ व तेथील रंजक माहिती फारच उपयुक्त ठरेल.

येथे जाणून घेत असलेल्या विविध वेबसाईट्सविषयी तुम्ही तुमच्या मित्रांना अवश्य कळवा. त्यासाठी त्या त्या वेबपेजेसचे html पत्ते (त्यांना URL म्हणतात) ई-मेलद्वारे कळवा.   

असंख्य खेळ, गमतीजमती असणाऱ्या वेबसाईट्स पहा खालील लिंकवर 

नेटभेट -भाग ३

 

-विवेक मेहेत्रे

[email protected]