कर्दळ

दिंनाक: 05 May 2018 14:17:33


कुंपण, सार्वजनिक जागा, शाळा, बंगला, बगीच्यात उंच जातीच्या कर्दळीची लागवड केली जाते. तर मोठ्या कुंडीत वा टबात कमी उंचीच्या कर्दळीची लागवड करता येते. सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन कर्दळीला अनुकूल असते. उन्हाची गरजही महत्त्वाचीच. कुंडीत कर्दळ लावताना एक भाग माती, अर्धा भाग वाळू व दोन भाग सेंद्रिय खत यांचा वापर करावा. दोन्ही जातीत गुलाबी, लाल, नारिंगी – पिवळी, पिवळ्या ठिपक्यांची लाल खुणांची नारिंगी इत्यादी रंगांची फुले असतात. रंगांची विविधता हे कर्दळीचे वैशिष्ट्य आहे. शिवाय कर्दळी सांडपाण्यावर चांगली वाढतात. त्याला काही अपाय होत नाही. हा तिचा विशेष गुण. तिच्यामुळे सांडपाण्यातील काही घटक वेगळे केले जातात. त्यानंतर ते पाणी अन्य झाडांना घालता येते. यामुळेच पूर्वी परसदारी कर्दळीची लागवड हमखास असायची.

लागवड बियांपासून करतात. पावसाळ्यापूर्वी लागवड करणे योग्यच. पण पावसाळ्यात मात्र कर्दळीची लागवड टाळावी. कंद मातीच्या वरच्या थरापासून किमान १५ सें.मी. खोल लावावे. एका कुंडीत एकच कंद लावावा. कंद लावताना वाळूच्या थरावर ठेवल्याने मुळ्या चांगल्या पद्धतीने वाढतात. कंद सडत नाहीत. या झाडांना वर्षभर अधूनमधून फुले मिळतात. पण ऑक्टोबर - डिसेंबर व एप्रिल - जून या काळात चांगली फुले येतात. दीर्घकाळ फुले लागण्यासाठी सुकलेली फुले काढून पुन्हा त्याच कुंडीत वरील पृष्ठभागावर टाकावीत. डिसेंबरमध्ये बहर संपला की, वरच्या थरावर पाने पसरून घालावीत. हा थर २ सें.मी. जाडीचा व मातीचा पृष्ठभाग पूर्ण झाकणारा असावा.

कर्दळीचे बी लहान वाटाण्यासारखे काळे, टणक सालीचे असते. म्हणून पेराण्यापूर्वी बी सँडपेपरवर घासल्याने उगवण चांगली व लवकर होते. तसेच दुसरी गोष्ट, बी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावे. नंतर दुसऱ्या दिवशी ते पेरावे. यामुळे फायदा असा होतो की, बीचा टणकपणा थोडा कमी झाल्याने उगवण सुकर व लवकर होते. कर्दळीला जास्त खतांची गरज नसते, नाहीतर तसे केल्याने फक्त पानेच प्रचंड वाढतात आणि फुलांची संख्या मर्यादित राहते. म्हणून तसे करणे टाळावे. शिवाय कर्दळीच्या पानांच्या कडा गंज आल्यासारख्या झाल्याने ते पान निकामी होते. हे असे होणे फुले यायला मारक ठरते. त्यासाठी केळी – पपईची साले बारीक करून मातीच्या थरावर पसरावी. कडक थंडीपासून कर्दळीला अपाय होऊ नये म्हणून मातीच्या पृष्ठभागावर पानांचे अच्छादन पसरावे आणि त्या काळात रात्री कर्दळीला खूप पाणी द्यावे.

करदळ – ही जातवरील कर्दळीपेक्षा थोडी वेगळीच आहे. ती काष्ठतंतूच्या आधाराने वाढते. पाने, फुले येणाऱ्या फांद्या बेचक्यात असतात. पाने एकंदरीत सदाहरित, फुले पांढरी, लहान, पाच गोल पंख सदृश्य पाकळ्या असलेली. त्यांचा हंगाम मार्च-एप्रिलमध्ये हा दुर्मीळ वृक्ष खंडाळा, माथेरान, फणसाडचे अभयारण्य, अंबोली घाट येथे नैसर्गिकरीत्या वाढतो. हा वेगळा वृक्ष म्हणजे हूक असलेल्या फांद्यांचा म्हणता येईल. संशोधनात असे आढळले आहे की, यातील प्रजातीत ‘एड्स’ बरा करण्याची क्षमता आहे. या वैशिष्ट्याचे आकर्षण जरी असले, तरी नंतर याची मागणी वाढेल. आणि परिणामी हा दुर्मिळ वृक्ष नाहीसा होण्याच्या मार्गावर जाणार.

या वनस्पतीचा उपयोग औषधे निर्माण करण्यासाठी होत असला, तरी तिची लागवड करून अस्तित्व टिकवायला हवे. याच्या अस्तित्वासाठी ज्या परिसरात हा वृक्ष आहे, त्या त्या जागी याच्या बिया टाकून त्यांची वाढ केल्याने त्याच्या नैसर्गिक उपलब्धतेत वाढ होईल.

सांधेदुखीवर उपयुक्त असणाऱ्या तेरडा या फुलांचे विविध वैशिष्ट्ये जाणून घेऊ मीनल पटवर्धन यांच्या लेखात.

 तेरडा

मीनल पटवर्धन

[email protected]