गणिताचे नाव घेतले, तरी आठवतात त्यातील संख्या आणि बेरीज-वजाबाक्या. शाळेच्या पहिल्या दिवसापासून इ.१लीच्या विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होण्यासाठी जि.प. प्राथमिक शाळा घुलेवस्ती, वाकवड, पोस्ट कुंथलगिरी, ता. भूम येथील विनोद रामलिंग कांबळे प्रयत्न करत आहेत. ज्ञानरचनापद्धतीने गणितामधील मुलभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी इ.१लीच्या विद्यार्थांना वेगवेगळ्या खेळांतून अध्ययन अनुभव दिले जातात. अध्ययन संकल्पना संबोधासह स्पष्ट होण्यासाठी परिसरातील वस्तूंच्या आधारे वर्गातच खेळ घेतले जातात.

ज्ञानरचनापद्धतीचा विचार करून वर्गरचना आणि रंगरंगोटी केल्यानंतर अंककार्ड, संख्याकार्ड, नाणी, नोटा, रांगोळी, रंगीतखडे, चिंचोके यांचा वापर करत अनेक खेळ खेळले जातात. विद्यार्थ्यांचे दोन गट करून स्पर्धात्मक खेळ घेताना वस्तू मोजणे, संख्या व संख्याकार्ड यांच्या जोड्या लावणे, संख्याकार्डांपासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. असे खेळ घेऊन विजेत्या गटास बक्षीसे देणे, असे उपक्रम शाळेत राबवले जातात. त्यातून विद्यार्थ्यांना संख्येविषयीच्या अमूर्त व मूर्त संकल्पना समजण्यास मदत होते. इ.१लीच्या विद्यार्थ्यांना संख्येवरील क्रिया शिकवणे म्हणजे दुसरे महत्त्वाचे कौशल्य. विनोद कांबळे हे विद्यार्थ्यांना संख्येवरील क्रिया शिकवत न बसता स्वत:हून गणितीय क्रियांची उकल करण्याची सवय लावतात. यासाठीही त्यांनी ‘माझी एक वस्तू मिसळा’, ‘उरले किती’, ‘वस्तू कमी करा’ अशा एक ना अनेक खेळ तयार केले आहेत.

विद्यार्थ्यांच्या भौमितिक क्षमता विकसित करण्यासाठी आत - बाहेर, जवळ - दूर अशा क्षमतांचा विकास होण्यासाठी ‘राजा म्हणतो’ हा खेळ खेळला जातो. भौमितिक रचना तयार करताना विद्यार्थ्यांसोबतच इतर शिक्षकांनाही वेगवेगळ्या रचना सुचतात. मापनाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उंच - ठेंगणा, लांब - आखूड, लहान - मोठा यांचे प्रात्यक्षिक घेत शाळेत अनेक खेळ घेतले जातात. यासाठी परिसरातील वस्तूंचा वापर केला जातो. व्यवहारज्ञानातून गणित संकल्पना समजण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच बाजाराचा अनुभव दिला जातो. इ.१ली व इ.२रीचे विद्यार्थी ग्राहक, तर इ.३री व इ.४थीचे विद्यार्थी विक्रेते असतात. बाजारातही ‘माझा तराजू’, ‘पूर्ण करा गणिते’ असे खेळ ग्राहकांसाठी असतात.

या सर्व क्षमता विकसनासाठी मोठ्या संख्येने खेळाचे आयोजन केले जाते, मात्र या संकल्पना खेळ म्हणून घेत घेत त्यांचे मूल्यमापनही केले जाते. तोंडी काम व प्रात्यक्षिकातून मूल्यमापन करून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. कमी खर्चिक आणि स्थानिक परिसरातील वस्तूंचा वापर केल्यामुळे संपूर्ण शाळेचे; तसेच नागरिकांचे सहकार्य नेहमी मिळते. संगणक, मोबाईल या तंत्रज्ञानाचा वापर करून शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अध्ययन केले जाते. व्हॉटस्अॅप, फेसबुकद्वारे राज्यभरातील शिक्षकांपर्यंत या खेळांची माहिती पोहोचवण्यात आली असून अनेक शिक्षक या खेळांचा वापर करतात. विनोद कांबळे यांना तालुका आणि जिल्हा स्तरावर मार्गदर्शक म्हणूनही अनेक खेळ शिकवण्याची संधी मिळाली आहे. खेळांतून गणित शिकत असताना विद्यार्थी आवडीने गणिते सोडवतात. प्रत्यक्ष कृती केल्यामुळे मूलभूत क्षमता स्पष्ट होतात. या पुढेही नावीन्यपूर्ण खेळ आणि कोडी घेऊन विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण करण्याचा विनोद कांबळे यांचा मानस आहे. अध्ययन अनुभवाद्वारे गणितीय संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विनोद रामलिंग कांबळे यांना, नवउपक्रमाबद्दल २०१८ साठीचा गणित विभागातील ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

 -रुपाली निरगुडे 

[email protected]

 

चार भिंतीत विज्ञान न शिकवता, परिसरातील गोष्टींचा उपयोग करून विज्ञान शिकवणे; ही संकल्पना राबवली मीना म्हसे यांनी.

 परिसरातील विज्ञान