“दोन, तीन, चार ... अरेरे...पडले सगळे...’’

“टाईम अप... आता सना तूं...’’

“...चार, पाच, सहा...बक्अप... सांभाळून... सात... वा! वा! ...घाई नको करू सना... आ...ए ए ...गेली...’’

आज हे काय चाललंय माहितीये का?

स्नेहलताईनं हे लहान मुलांच्या खेळातले रंगीबेरंगी ठोकळे आणलेत आणि ते एकमेकांवर ठेवून, जास्तीत जास्त उंच मनोरा, कमीत कमी वेळात कोण करतं ते पाहायचंय.

सगळे गोलाकार उभं राहून एकमेकांना चिअरअप करताहेत. टाळ्या वाजवताहेत.

ताईनं सुरुवातीलाच सांगितलंय... “इथं कोणाचीच कोणाशीच स्पर्धा नाहीये. पण प्रत्येकानं स्वत:शीच स्पर्धा करायची आहे. एकाग्रता न सोडता उंच उंच मनोरा करायचा आहे. त्यासाठी वेळेचंही भान ठेवायचंय. मन शांत ठेवून प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. मनोरा पडला तरी दिलेली वेळ संपेपर्यंत पुन्हा प्रयत्न करायचे आहेत.’’

सगळ्यांनी सर्वस्व पणाला लावून या खेळात भाग घेतला. खेळाचा मनापासून आनंद घेतला. एकमेकांना प्रोत्साहन देत, खेळाची मजा घेतली. चौदा ठोकळे रचून शाल्मलीनं सर्वात उंच मनोरा केला तर अथर्वने तेरा ठोकळे रचले.

स्नेहलताईनं सगळ्यांना शाबासकी दिली. खेळात जिंकलेल्यांना आणि खेळात भाग घेऊन जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पण. सगळ्यांना खूप मजा आली.

उद्या येताना ताईनं सगळ्यांना एकेक बटाटा आणायला सांगितला.

“बटाट्याचं काय करायचं ताई?’’, छोट्या सायलीला प्रश्न पडला.

“हं... ती एक मज्जा आहे ... आपण बटाट्याची शर्यत लावायची आहे...’’, ताई म्हणाली.

“हो हो... खूप मजा येते त्यात’’, सारंग म्हणाला. “म्हणजे एक प्रकारे धावण्याचीच शर्यत ती, पण ते करताना एकेक बटाटा उचलून आणायचा असतो. आपल्या शर्यतीच्या ट्रॅकवर ओळीनं पाच बटाटे ठेवायचे. धावत जाऊन एक बटाटा उचलायचा, परत सुरुवातीच्या जागी आणून ठेवायचा. नंतर दुसरा, मग तिसरा...एका वेळेस एकच आणायचा. मग सगळे बटाटे घेऊन दुसऱ्या टोकाला जायचं. हे सगळं करून जो पहिल्यांदा तिकडे पोहोचेल तो जिंकला. हो ना ताई.’’, सारंगने नेहमीप्रमाणे भाव खाल्ला.

“बरोब्बर...’’ ताई म्हणाली... “आणि प्रत्येकाने कोणता बटाटा आधी उचलायचा... पहिला का पाचवा... हे ज्याचं त्यानं ठरवायचं. फक्त जिद्दीनं प्रयत्न करून वेळेचं गणित मात्र जमवायचं बरं का?"

“हो चालेल... मज्जा येईल नाही...?’’, सर्वांना आत्ताच उत्साह संचारला.

“आता आणि एक सांगू का... म्हणजे थोडा उपदेश वगैरे वाटेल तुम्हाला... कंटाळा नाही ना आला?’’

“नाही नाही... मुळीच नाही... सांग ना स्नेहलताई...’’, सगळी एका सुरात म्हणाली.

ताईलाही बरं वाटलं.

“हे खेळ कशासाठी खेळायचे? करमणुकीसाठी तर नक्कीच. त्याच बरोबर कधी थोडा शारीरिक व्यायाम तर कधी डोक्याला व्यायाम. तसंच आपली समयसूचकता वाढवायची, एखादं काम यशस्वीपणे करण्याचा मनापासून प्रयत्न करायचा, हरलं तरी वाईट वाटून निराश न होता, पुढच्या वेळेस अधिक नेटानं प्रयत्न करायचा. दुसऱ्याशी सतत तुलना न करता, आपली स्पर्धा आपल्याशी. मला हे नक्की जमेल असा विचार करून प्रयत्न सुरू करायचे. आपल्या चुका शोधायचा प्रयत्न करायचा. याबाबतीत आपले सर - बाई, आई - बाबा, आजी - आजोबा, ताई - दादा, मित्र - मैत्रिणी कोणाचीही मदत न लाजता घ्यायची. एकदा का चुका कळल्या की, त्या सुधारायला सोपं जातं. आपण जे काही करतो आहे त्यातच नीट लक्ष देऊन केलं, एकाग्रतेनं केलं की, कमी वेळात छान काम होतं. आणि या सगळ्याबरोबरच वेळेचं गणितही सांभाळायला शिकायचं...’’ मुलं अगदी एकाग्रतेनं त्यांच्या ताईचं बोलणं ऐकत होती.

यालाच Time management म्हणतात. वेळापत्रक आखणे. याचा उपयोग खेळातच नाही तर पुढे आयुष्यभर होतो. जसा शाळेचा अभ्यास करताना होतो, तसा परीक्षेच्या वेळी दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करण्यासाठी होतो. अभ्यासाबरोबरच एखादी कला शिकण्यासाठी वेळ काढता येतो. नेहमीच्या कामांमधून व्यायामासाठी वेळ काढता येतो, अभ्यासाव्यतिरिक्त निरनिराळी पुस्तकं वाचता येतात. नाटक-सिनेमासारख्या करमणुकीसाठी वेळ देता येतो, टी.व्ही.वरची क्रिकेट मॅच पाहायला वेळ काढता येतो, मित्रांबरोबर गप्पा मारण्यासाठी वेळ मिळतो. या सगळ्याच गोष्टींचा आनंद घेता यायला हवा. फक्त कोणत्या कामासाठी कधी वेळ काढायचा, कोणत्या गोष्टीला कधी आणि किती महत्त्व द्यायचं याचा प्राधान्यक्रम (preference) ठरवता येणं महत्त्वाचं. काय कळतंय ना...?’’

आता असं पाहा, “तुम्हाला सध्या सुट्ट्या लागल्या आहेत. वर्षभर लवकर उठणं, शाळेत वेळेवर जाणं, रोजच्या रोज अभ्यास, मग परीक्षा... या सगळ्यातनं मोकळं झाल्यासारखं वाटत असेल ना? मग लवकर उठण्याची घाई नाही, हे मान्य. पण सुट्टीचंही वेळापत्रक आखता येतं. मग मला सांगा सुट्टीतले प्लॅन्स तरी काय तुमचे? सांगा पाहू.’’

“मी तर खूप-खूप गोष्टींची पुस्तके वाचणार...’’

“मी डान्सची प्रॅक्टिस करणार...’’

“मी तर आमच्या कोकणातील गावी जाऊन धमाल करणार...’’

“मी स्विमिंगला जाणार...’’

“मी ड्रॉईंगच्या क्लासला जाणार...’’

“आमच्या गाण्याच्या क्लासच्या बाई खूप नवीन गाणी शिकवणार आहेत. मी गाण्याची प्रॅक्टिस तर करणारच आहे, पण ती गाणी हार्मोनिअमवर वाजवण्याचीही प्रॅक्टिस करणार...’’

“मी... अजून काही ठरवलं नाही, पण भरपूर कार्टून फिल्म्स मात्र नक्की पाहणार...’’

सगळ्यांची विशलिस्ट ऐकून स्नेहलताई एकदम खूश झाली.

“वा वा...प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या गोष्टी करणारच आहात, पण.............’’

पण काय...? सगळ्यांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह ...........

“आणखी एक गोष्ट सर्वांनी करायची... ती म्हणजे घरच्या कामात जमेल तशी मदत. आईला भाजी निवडायला, चिरायला मदत, टेबलावर जेवणाची तयारी करणं, जेवणानंतरची आवराआवर, घरातील स्वच्छता, लॉन्ड्रीत कपडे टाकणं - आणणं, कुंडीतल्या झाडांना पाणी घालणं अशी कितीतरी छोटी-छोटी कामं असतात, जी तुम्ही सहज करू शकता आणि स्वयंपाक घरातील काही गोष्टी शिकून घेणं, म्हणजे चहा - कॉफी करणं, सरबतं - ज्यूसेस बनवणं, सँडवीच - ऑम्लेट बनवणं, वरण - भाताचा कुकर लावणं इ... हे सर्व मुलींनी आणि मुलांनीसुद्धा शिकायचं बरं का..!

बघा तर करून कशी मज्जा येते. दुपारच्या वेळी मित्र - मैत्रिणींना बोलवा आणि तुम्ही स्वत: असं काहीतरी करून खिलवा... पुढे पुढे तर फक्त सुट्टीतच नाही, नेहमीच अधूनमधून करायला आवडेल तुम्हाला. मलाही बोलवायला विसरू नका बरं का...!

मग आता "कशाची वेळ झाली सांगा पाहू...?’’

“घरी जाण्याची...’’ मुलांमध्ये एकच खसखस पिकली.

“आणि हो, घरी जाता जाता जरा झाडांकडेही नजर टाका. वैशाख लागला ना..., नुकतीच अक्षय्य तृतीया ही झाली आहे. मोहोरलेल्या आंब्याच्या झाडांवर लागलेल्या कैऱ्यांचे आता रंग बदलून आंबे तयार झालेत, ते पाहा जरा. अशा झाडावरच पिकलेल्या आंब्यांची गोडी काही वेगळीच असते बरं का. अक्षय्य तृतीयेला असे घरच्या झाडांवरचे पिकलेले आंबे काढून, घरचे सगळेजण जेव्हा पहिल्यांदा खातात, त्याला “आंब्याचं नवं केलं’’ असं म्हणतात.

ते पाहा कोपऱ्यावरच्या बहाव्याच्या झाडावर कसे पिवळ्या धमक फुलांचे लांब लांब घोस लटकले आहेत. भर उन्हाळ्याच्या रखरखाटात लालबुंद फुललेला गुलमोहर कसा डोळ्यांना आनंद देतो पाहा. चाफा, मोगरा, वाळा यांनी वातावरण कसं सुगंधित करून टाकलंय पाहा, त्या फळवाल्याकडे हीऽऽऽ मोठ्ठी कलिंगडाची रास असेल, रसदार गोडगोड द्राक्षं, जांभळं, करवंदांचा रानमेवा पण असेल. घरी हिरवं पिवळं कैरीचं पन्हं, लाललाल कोकम सरबत असेल... ग्रीष्म ऋतुतल्या या वैशाख वणव्याचे चटके कमी करायला निसर्गानेच किती तयारी करून ठेवली आहे पाहा जरा. त्याचाही रसिकतेनं मनसोक्त आनंद घ्या. त्या त्या मोसमातली ताजी ताजी फळं खाल्लीत ना, की उन्हाळा बाधण्याची चिंताच नको. काय...पळा आता घरी.’’

"हार न मानता जिद्दीनं, चिकाटीनं प्रयत्न करत राहिलं की यश हे मिळतंच.",सांगतेय स्नेहलताई!

लेख २ - सांग ना स्नेहलताई

-मधुवंती पेठे

[email protected]