आकांक्षा

दिंनाक: 29 May 2018 14:55:21


 

चंद्राशी संवाद करावा, मुठीत घ्यावी अवनी
अनंत आकाशाला घ्यावे कवेत दो बाहूंनी
मेघांवरती स्वार होउनी जावे क्षितिजावरी
इंद्रधनूचे बिंब पहावे सागरलाटांवरी!

ग्रहमालांच्या करूनि पायऱ्या, जावे अवकाशी
अन् मोजाव्या ब्रह्मांडातिल नवसूर्यांच्या राशी!
शतसूर्यांना दान करावी शीतलता स्नेहाची
आणि तयांना सांगत जावी महती तेजाची!

प्रकाशवर्षे मोजित हर्षे चकित करावे काळाला
मृद्गंधाचा अन् लावावा टिळा तयाच्या भाळाला
स्वप्नपऱ्यांशी स्पर्धा करुनि सप्त स्वर्ग जिंकावे
सप्तसुरांच्या मैफलीत या सारे विश्व झुकावे!

नक्षत्रांची करूनि अक्षरे रोज लिहाव्या कविता
त्यात असावे दवबिंदूचे जगणे अन् नवता!
सशब्द करण्या मनसंवेदन असा उमाळा यावा
नील नभाचा कागदहि मज अपुरा वाटावा!


-श्रीराम वा. कुलकर्णी
[email protected]

 

करिअर निवडताना...करिअर सप्ताहातील सहावा लेख. नवनिर्मितीचा आनंद देणारे क्षेत्र : शिल्पकला 

शिल्पकला : एक सृजनशील अनुभव