प्रत्येकामध्ये कलागुण हे उपजतच असतात. या कलागुणांना वाव मिळण्यासाठी किंवा त्यांच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असते ते मार्गदर्शन. शालेय जीवनातच याची मुहूर्तमेढ रोवली जाते. शालेय शिक्षण पद्धती यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात कला शाखा असणे महत्त्वाचे आहे. कला शाखेमध्ये संगीत, नाट्य, चित्र व शिल्प या कलांचा समावेश प्रामुख्याने असतो. यातील शिल्पकलेचा जर विचार केला, तर ही फार महत्त्वाची आणि भविष्यात करिअर करण्यासाठी उपयुक्त अशी कला आहे. ही कला जर शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली, तर त्याचा नवीन पिढीला नक्कीच उपयोग होऊ शकतो.

शिल्पकला (क्ले मॉडलींग) शिकण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी शिल्पकला शिकण्याकरता लागणाऱ्या माध्यमाची ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये शाडू माती, प्लॅस्टिसिन क्ले सहज उपलब्ध होऊ शकते. त्यापासून आकार निर्मिती कशी करायची, याचे प्राथमिक शिक्षण शालेय जीवनातच देता येऊ शकते. शाडू माती आणि प्लस्टिसिन क्ले वापरून शिल्पकलेची सुरुवात करता येते. शिल्पकला (क्ले मॉडलींग) शिकताना सुरुवातीला मूळ आकार करता येतात आणि ते करणेही सोपे असते. यात प्रामुख्याने गोल, त्रिकोण, चौकोन हे मूळ आकार त्रिमितीमध्ये; म्हणजे घनाकार करावेत. चेंडूसारखा गोल, ठोकळ्यासारखा चौकोन, पिरॅमिडसारखा त्रिकोण या मूळ आकारांपासून इतर आकारांची निर्मितीदेखील करता येते. पायाभूत (बेसिक) गोष्टींपासून सुरुवात केल्यास माध्यमाची ओळख लवकर होते आणि मनात भीतीदेखील राहत नाही.

क्ले मॉडलिंगचा फायदा म्हणजे दोन्ही हात त्यात गुंतलेले असतात व त्यामुळे मनाची एकाग्रता लवकर होते. क्लेमध्ये मन एकाग्र होणे फार महत्त्वाचे असते, म्हणून पाश्चात्य देशात लहान मुलांना प्लॅस्टेसिन क्ले खेळण्यास देतात.

दहावी-बारावीनंतर या शाखेत प्रवेश घेता येतो. दहावीनंतर जर शिल्पकला या शाखेत प्रवेश घ्यायचा असेल, तर फाऊंडेशनचा अभ्यासक्रम शिकणे आवश्यक आहे. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चार वर्षांचा शिल्पकलेचा पदविका अभ्यासक्रम आहे; तो शासकीय आहे. बारावीनंतर करायचा झाल्यास बी.एफ.ए.चा पदवी अभ्यासक्रम आहे. मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, पुण्यातील भारती कला विद्यालय, कोल्हापुरातील आर.एस.गोसावी कलानिकेतन महाविद्यालय या तीन प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने शिल्पकला अभ्यासक्रम शिकवला जातो. याशिवाय पुण्यातील सिंम्बायसिस कॉलेज, डी.वाय.पाटील महाविद्यालय, व्ही.आय.टी.कल्चरल कॉलेजेस्मध्ये फक्त फाऊंडेशन अभ्यासक्रम शिकवला जातो.

हल्ली या शाखेत खूप कमी विद्यार्थी येतात. कारण भविष्यात याचा किती उपयोग आहे, हे फारसे कुणाला माहीत नसते, परंतु आता बदलत्या परिस्थितीनुसार या शाखेला फार महत्त्व आले आहे. याचा उपयोग अनेक क्षेत्रांत करता येणे शक्य झाले आहे. शिल्पकरांना अगदी सजावटीपासून ते अॅनिमेशनपर्यंत वेगवेगळी क्षेत्रे निवडून काम करता येणे शक्य आहे. हल्ली स्पर्धेच्या युगातसुद्धा शिल्पकारांचे प्रमाण कमीच आहे.

शिल्पकरांना सिनेसृष्टीमध्ये, मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी सेट डिझाईन तयार करणे, जाहिरातींसाठी मॉडेल तयार करणे, सांस्कृतिक समारंभात सजावट करणे, व्यक्तिशिल्प तयार करणे, अशा अनेक शाखांमध्ये काम करता येते.

ब्राँझमध्ये पुतळे तयार करण्यायाठी अगोदर क्लेचा पुतळा हा करावाच लागतो. मार्बलमध्ये शिल्प करायचे असल्यास किंवा फायबर ग्लासमध्ये शिल्प करायचे असल्यास, अगोदर क्लेमध्ये करणे गरजेचे असते. शिल्पकाराला स्वत:चा स्टुडिओ उभारून स्वत:चे (फ्रिलान्स) काम करता येते. आधुनिक इमारती, शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, आयटी पार्क, शहराचे सौंदर्य वाढवणे अशा अनेक ठिकाणी शिल्पकृती निर्माण करण्याची संधी असते. येथेच शिल्पकारांना काम करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये असणार्‍या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी भरपूर वाव मिळतो. स्वत:च्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवून कलाकृतीचे सादरीकरण करता येते आणि आपल्यातील कला समाजासमोर आणता येते.

शिल्पकलेमध्ये जे वेगवेगळे प्रकार येतात, त्यामध्ये म्युरल्स उठाव शिल्प याचाही समावेश होतो. अशा म्युरल्सची निर्मिती करून, अनेक इमारतींच्या भिंतीचे सुशोभिकरण करता येते. या क्षेत्रामध्ये काम करत असताना कष्टाची, जिद्दीची तयारी ठेवावी लागते. यामध्ये चांगल्या प्रकारे करिअर घडवता येते आणि प्रत्येक वेळी नवनिर्मितीचा आनंद मिळतो, कारण तेच तेच काम न करता, प्रत्येक वेळी नवीन कलाकृती निर्माण करण्याची संधी या क्षेत्रात असते. म्हणूनच, हे क्षेत्र ‘करिअर’ करण्याच्यादृष्टीने निवडणे योग्य ठरेल. शिवाय हल्ली स्किल्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (कौशल्यविकास संस्था) यांची निर्मिती झाली आहे आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कौशल्यविकास शाखा सुरू झाल्या आहेत. याचा उपयोग तुम्हला नक्कीच करता येणार आहे.

- विवेक खटावकर

(प्रसिद्ध शिल्पकार)

[email protected]

 

 नृत्यकलेतील करिअर याविषयी मार्गदर्शन करतायेत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर  

नृत्य : एक डोलदार करिअर