आजच्या या डिजिटल युगात जग एकमेकांच्या खूप जवळ आले आहे. माहिती, बातम्या, वैचारिक देवाण-घेवाण या आणि अशा अनेक कारणांसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे आणि इतकेच नव्हे; तर त्यात प्रत्येक क्षणाला एक नवीन क्रांती घडत आहे. या बदलांचा आपल्या जीवनातील अनेकविध घटकांवर परिणाम झालेला दिसून येतो. या माहिती-तंत्रज्ञानामधील क्रांतीने मनोरंजनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विशेषतः कोणत्याही क्षेत्रामध्ये भाषा हे आता बंधन राहिलेले नाही.

आज जगाच्या कोणत्याही भाषेतील माहिती, चित्रपट, माहितीपट आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध आहेत. परंतु हे होत असताना कुठेतरी हे जाणवायला लागले आहे की, ही सगळी माहिती; हे ज्ञान प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेमध्ये उपलब्ध करून दिल्यास त्याचा उद्देश सर्वाधिक सफल ठरेल. ‘गरज ही शोधाची जननी आहे’, या उक्तीनुसार ही गरज लक्षात घेऊन उगम झाला तो ‘व्हॉईस ओव्हर’ आणि ‘व्हॉईस डबिंग’ या अनोख्या कार्यक्षेत्राचा आणि आज या कार्यक्षेत्रातील कामाचा आणि नवनवीन संधींचा आवाका आपल्या कल्पनेपलीकडला आहे.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळे आवाज ऐकत असतो... अगदी आपल्या नकळत...!! उदाहरणार्थ, आकाशवाणीवरील जाहिराती, टीव्हीवरील जाहिराती, मालिकांचे प्रोमो, विविध घोषणा, सूचना, बस स्थानक, रेल्वे स्टेशनवरील सूचना, मोबाईलवर विविध प्रकारची बिले भरताना ऐकू येणारे सूचनात्मक IVR, इतकेच नव्हे; तर सार्वजनिक उत्सव आणि निवडणुकींच्या काळात ऐकू येणाऱ्या प्रचारक घोषणा... या सर्वांच्या मागे असतो एक विशिष्ट असा लक्षात राहणारा ‘आवाज’.

त्याचबरोबरीने आजकाल वेगाने वाढत जाणारे ई-लर्निंगचे क्षेत्र, ज्यात प्रामुख्याने दृक्श्राव्य पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. तसेच, अनेकविध प्रकारच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स्, कॉर्पोरेट फिल्म्स्, ऑडिओ प्रेझेंटेशन, वॉक-ट्रू डेमोज् या सर्वांकरता विशिष्ट आवाज वापरले जातात.

वरील नमूद गोष्टींसाठी वापरला जाणारा ‘आवाज’ म्हणजेच ‘व्हॉईस ओव्हर’.

व्हॉईस ओव्हरचे सर्वोत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास पूर्वी दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या ‘महाभारत’ मालिकेमधील ‘समय’ (काळ) साठी दिला गेलेला आवाज किंवा अगदी आजचे उदाहरण द्यायचे असेल, तर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधील बिग बॉसचा प्रसिद्ध झालेला आवाज.

हे झाले व्हॉईस ओव्हरबद्दल. पण, याबरोबरच अगदी नित्याचे झालेले आवाज म्हणजे, आपल्या सगळ्यांचे लाडके कार्टून कॅरॅक्टर्स. जसे की, मिकी माउस, डोनाल्ड डक, पोकेमॉन, डोरेमॉन, छोटा भीम, अकबर-बिरबल इत्यादी. तसेच, हॉलिवूडचे प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट, याशिवाय डिस्कवरी, हिस्टरी अशा चॅनलवरचे कार्यक्रम, अनेक दक्षिणात्य भाषेतील सिनेमे आपण आता सर्रास हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी अशा भाषांमध्ये पाहू शकतो. तर हे सारे करण्याचे काम म्हणजेच ‘कार्टून’ किंवा ‘कॅरॅक्टर व्हॉईस डबिंग’. डबिंग करताना वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या वयाच्या, पद्धतीच्या... थोडक्यात सांगायचे, तर हर प्रकारच्या कॅरॅक्टरच्या... चित्रविचित्र आवाजांची गरज असते आणि हे वेगवेगळे आवाज देऊ शकणाऱ्या कलाकारांची (व्हॉईस आर्टिस्टची) आज प्रचंड चलती आहे.

आश्चर्य वाटेल, पण आपल्याकडील ‘सास-बहु’च्या मालिकासुद्धा आजकाल इंग्रजी भाषेमध्ये डब करून परदेशात प्रसारित केल्या जातात आणि त्या अतिशय लोकप्रियही होत आहेत.  

या सगळ्यांबरोबरच कोणत्या कॅरॅक्टरला कोणता किंवा कशा प्रकारचा आवाज योग्य ठरेल, हे ठरवणारे ‘डबिंग डायरेक्टर्स’ हेसुद्धा एक अतिशय नवखं करिअर उदयास येत आहे 

अशा प्रकारच्या आवाजाची बाजारामध्ये खूप गरज असते.  अर्थात, या व्हाईस ओव्हर आणि कार्टून डबिंगच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणे, हे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, भाषेचा सखोल अभ्यास, स्पष्टोच्चार, भाषेच्या व्याकरणाची समज आणि सतत स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची तयारी या गुणांची गरज असते.

या क्षेत्रात सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आवाज आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘श्वासोच्छवासावर ताबा’. त्याचबरोबर ज्या काही मुलभूत गोष्टींची जाण असणे आवश्यक आहे, त्या म्हणजे - साउंड,  फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेन्थ, आवाजाची पट्टी अर्थात Pitch, आवाजाचा पोत-दर्जा, शब्दफेक इत्यादी.

व्हॉईस किंवा कॅरॅक्टर डबिंग करत असताना आपल्याला वेगवेगळ्या कॅरॅक्टर्सना आवाज द्यायचा असल्यामुळे आवाजांतील बदल/चढ-उतार हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्यातही विविध भावना केवळ आवाजाच्या माध्यमातून दर्शवण्याची आवश्यकता असल्यामुळे; शांत, रौद्र, हास्य, करुण, बीभत्स, शृंगार, अद्भुत, वीर आणि भयानक अशा ‘नवरसांवर’ प्रभुत्व असणे अपरिहार्य आहे.

सर्वात जमेची बाजू ही की, या क्षेत्रात कार्य करण्यासाठी वयाची, शिक्षणाची... कसलीही अट नाही. आपल्यापैकी अगदी कोणीही या क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतो आणि त्यातही महत्त्वाचे म्हणजे, हे करत असताना तुम्हाला तुमचे चालू करिअर किंवा नोकरी सोडून देण्याची गरज नाही. व्हॉईस ओव्हर आणि कॅरॅक्टर डबिंग हा अर्थार्जनाचा किंवा 2nd Incomeचा स्रोत म्हणून एक उत्तम पर्याय आहे.

तर अशा प्रकारच्या आवाज आणि शब्दफेक तंत्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे अनेक क्लासेस, इन्स्टिट्युट आज कार्यरत आहेत. अमीन सायानी, हरीश भिमानी, मेघना एरंडे, राजपाल यादव, चेतन शशीतल, सुदेश भोसले, पियुष मिश्रा, अविनाश नारकर ही या क्षेत्रातील काही अग्रगण्य नावे, ज्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण शैलीने आणि भाषा प्रभुत्वाने व्हॉईस ओव्हर आणि कॅरॅक्टर डबिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

सध्या आकाशवाणी, टीव्ही, चित्रपट, माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये होणारी प्रगती लक्षात घेता, मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये अशा संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. किंबहुना उत्तरोत्तर ही मागणी वाढतच जाणार आहे, यात शंकाच नाही. व्हॉईस ओव्हर आणि कॅरॅक्टर डबिंग या क्षेत्राचा आवाका जेवढा मोठा आहे, तितक्याच त्यातील करिअरच्या संधीदेखील अनंत आहेत. सोबतच ई-लर्निंग, ऑडिओ-व्हिडिओ ट्युटोरिअल्स, सेल्फ लर्निंग मोड्युल्स, कॉर्पोरेट फिल्म्स्, अॅडव्हरटाइजमेंट आणि डॉक्युमेंटस् यांतील प्रगतीमुळे व्हॉईस ओव्हर आणि कॅरॅक्टर डबिंग कलाकारांसाठी संधींचे भांडार खुले झाले आहे.

म्हणूनच, आपल्यातील कलाकाराला जगासमोर आणण्यासाठी व्हॉईस ओव्हर आणि कॅरॅक्टर डबिंग ही एक सुवर्णसंधी आहे... ती प्रत्येकाने ओळखायला हवी... मग तुम्हीही म्हणू शकाल - ‘‘मेरी ‘आवाज’ही मेरी पेहचान हैं।’’   

 - केदार आठवले

[email protected]

 

करिअर निवडताना ...या करिअर सप्ताहातील तिसऱ्या दिवशी चित्रकलेतील करिअर विषयी लिहीत आहेत माणिक वालावलकर. 

चित्रकला