चित्रकला

दिंनाक: 25 May 2018 15:04:49


एक काळ असा होता की, चित्रकार व्हायचे म्हटले, तर पालक प्रश्न विचारायचे, ‘काय भिकेचे डोहाळे लागले आहेत का?’ आजचे पालक सांगत येतात, ‘आमची मुलं समोरचं बघून अगदी हुबेहुब चित्रं काढतात हां!’ खरे तर, कलेच्या जगात कॉपी ड्रॉईंगला फार महत्त्व दिले जात नाही. कलेमध्ये महत्त्वाची असते ती सर्जनशीलता. आज कलाकार असण्याला ‘ग्लॅमर’ मिळत आहे. या ग्लॅमरमध्येही ज्याला स्वतः मधले सर्जन आणि समाधान टिकवता येते, तो कलावंत म्हणून टिकून राहतो. कलाशिक्षण या साऱ्याचे भान देते. म्हणूनच कलेमध्ये करिअर करायचे असेल, तर सजग कलाशिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.

तुम्हाला चित्र काढायला आवडते का? आवडत असेल, तर हा लेख तुमच्या उपयोगाचा आहे. चित्रकलेत करिअर काय करता येते, हे सांगण्यापूर्वी मात्र मी तुम्हाला खूप प्रश्न विचारणार आहे. अर्थात, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आत्ता आलीच पाहिजेत असे नाही, पण उत्तर न आलेल्या प्रश्नांचा शोध घरातली मोठी मंडळी आणि तुमचे कलाशिक्षक यांच्या मदतीने जरूर घ्या. कारण त्यातूनच तुम्हाला या क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळेल, हे नक्की.

तर... 

1) आज सकाळी तुम्ही ज्या कपमधून दूध किंवा चहा किंवा कॉफी प्यायलात तो कप कुणी बनवला?

2) आजच्या वर्तमानपत्रात होंडाची जाहिरात आहे, कुणी केली ही जाहिरात?

3) ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ यांच्या टाईपमध्ये फरक आहे. कुणी केले हे टाईप?

4) गेल्या पावसाळ्यात ताईने एक छत्री विकत घेतली. त्यावर पावसाची कविता लिहिली आहे. ती म्हणाली ही कॅलिग्राफी आहे. कुणी केली ही कॅलिग्राफी?

5) तुम्ही अलीकडे पाहिलेल्या नव्या सिनेमाचे आर्ट डिरेक्शन कुणी केले होते?

6) परवा काकूने लग्नात सुंदर पैठणी नेसली होती, ती पैठणी कुणी तयार केली?

7) कॅनव्हासवर केलेले एखाद व्यक्तिचित्रण किंवा निसर्गचित्रण आपण तासनतास बघत राहातो. कोण काढते हे चित्र?

असो, तर तुमच्या लक्षात येईल की, कॉफी पिण्यापासून ते वर्तमानपत्रापर्यंत आणि तिथून सण-समारंभांपर्यंत, दैनंदिन जीवनात अनेकदा आपण कलाकाराला अप्रत्यक्षपणे भेटत असतो. हा कलाकार चित्रकारच असतो, असे नाही. तो कधी चित्र काढणारा, तर कधी वस्त्र संकल्पन करणारा, इंटिरिअर डिझाइनर, सिरॅमिक डिझाइनर, शिल्पाकृती करणारा शिल्पकार, सिनेमॅटोग्राफर, फोटोग्राफर किंवा अॅनिमेटर असा कुणीही असू शकतो. म्हणजेच, ही केवळ चित्रकला नसते, तर ती असते दृश्यकला.

दृश्यकलेची ही रूपे ढोबळ मानाने दोन भागांत विभागली जातात. एकाला म्हणतात ‘उपयोजित कला’ (अप्लाईड आर्ट) आणि दुसरी ‘अभिजात कला’ (फाईन आर्ट). उपयोजित कला ही प्रामुख्याने जाहिरात कला असते. इलस्ट्रेशन, फोटोग्राफी, टायपोग्राफी, विंडो डिस्प्ले असे अनेक उपविषय याअंतर्गत शिकवले जातात. फाईन आर्ट ही वास्तविक निखळ आनंद देणारी कला असते. चित्रकला, शिल्पकला हे विषय इथे शिकवले जातात, पण त्यातही अनेक उपविषय आहेत. मुख्य म्हणजे इथे थोडी उपयोजनाची जोड देऊन निर्माण झालेल्या सिरॅमिक, टेक्सटाईल, इंटिरिअर डिझाइनच्या शाखाही अभ्यासाला मिळतात.

आता प्रश्न असा असेल की, याविषयीची अधिक माहिती कुठे मिळेल? तर कलामहाविद्यालयांच्या संकेतस्थळांना किंवा प्रत्यक्ष संस्थांना भेट देणे हाच सर्वोत्तम पर्याय. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट हे भारतातले महत्त्वाचे आर्ट स्कूल मुंबईतच आहे. त्या व्यतिरिक्तही अनेक पदवी (डिग्री) आणि पदविका (डिप्लोमा) कलामहाविद्यालये महाराष्ट्रभर आहेत. दिल्ली, कलकत्ता, बनारस, भोपाळ, बंगलोर, चेन्नई, बडोदा इथेही नामांकित कलामहाविद्यालये आहेत. दहावी आणि बारावीनंतर करता येणारे अनेक अभ्यासक्रम (कोर्सेस) येथे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रामध्ये कलाशिक्षण घ्यायचे, तर साधारण प्रक्रिया कशी असते, याची ढोबळ माहिती मिळण्यासाठी हा तक्ता तुम्हाला उपयोगी पडेल.

या कलाशिक्षणातून दृश्यकलेचे मुलभूत शिक्षण मिळते. याच्या साहाय्याने पुढे करिअरच्या संधी स्वतःला शोधाव्या लागतात. उदा., इलस्ट्रेशन हा विषय कलाशिक्षणात शिकवला जातो, त्यातून मग कुणी लहान मुलांची पुस्तके इलस्ट्रेट करणारा चित्रकार होतो, कुणी मुखपृष्ठांसाठी वाखाणला जातो, कुणी कॉमिक इंडस्ट्रीमध्ये जातो; तर कुणी अॅनिमेटर होतो. कुणी मेडिकल इलस्ट्रेशनसारखी अगदी वेगळी वाटही चोखाळू शकतो. थोडक्यात काय, तर एकदा हे प्राथमिक शिक्षण घेतले की, आंतरिक उर्मीने आणि स्वतःच्या कल्पकतेने कलेच्या अवकाशात भरारी घेता येते.

हां, पण ‘इथे काय सारखी चित्रंच काढायची. सोप्पंच आहे! मज्जाच आहे कायमची!’, असं वाटत असेल, तर ते मात्र खरे नाही. इथे कलानिर्मितीचा ‘अभ्यास’ करावा लागतो. कला इतिहास, सौंदर्यशास्त्र, उपयोजित कलेची तंत्रे व तत्त्वे असे अनेक विषय वाचावे लागतात. त्यांची लेखी परीक्षाही द्यावी लागते! तेव्हा अभ्यासाची सगळी शिस्त पाळण्याची आणि तरीही शिस्तीचे नियम सांभाळून सर्जनात ‘बेशिस्त’ होण्याची कसरत करावी लागते. प्रबंध लिहावे लागतात. उत्तम संगीत, नाटक, सिनेमा, नृत्य बघत राहाणे, त्याचे रसग्रहण करणे हेही करावे लागते. या साऱ्याला उत्तम संशोधनाची जोड दिली की, कलाकृतीची निर्मिती तर जमते; त्याचबरोबरीने लौकिक जगात गरजेच्या अशा अगदी डॉक्टरेटपर्यंतच्या पदवीचा मार्गही उलगडत जातो.

तेव्हा... ‘भिकेचे डोहाळे’ ते ‘आर्टिस्ट असण्याचे ग्लॅमर’ यांमधला प्रवास ‘विवेका’ने समजून घेण्याचा प्रवास आहे. काही जणांचा व्यवसाय वेगळा असतो आणि छंद वेगळा असतो. छंद हे त्यांच्यासाठी आनंदाचे जग असते, पण जेव्हा ‘कला’ हा छंद व्यवसाय बनतो, तेव्हा त्यात आनंद तर आहेच; मात्र एक जबाबदारीही आहे. ही जबाबदारी असते समाजात कलावंत म्हणून आपली भूमिका पार पाडण्याची.

‘करिअर’ म्हणून जर कलाक्षेत्रात येण्याचा विचार करत असाल, तर टप्प्याटप्प्याने या साऱ्याचा गांभीर्याने विचार जरूर करा. आवश्यक तिथे इतरांची मदत घ्या. तोपर्यंत करायचा घरचा अभ्यास म्हणजे कलाप्रदर्शन. विशेषतः कलामहाविद्यालयांच्या कलाप्रदर्शनांची माहिती मिळवून या प्रदर्शनांना जरूर भेट द्या! तुमच्या कलाप्रवासासाठी शुभेच्छा!

करिअर निवडताना... करिअर सप्ताहातील दुसरा लेख वाचा खालील लिंकवर  

 सेलिब्रेटींच्या करिअर कथा

- माणिक वालावलकर

 [email protected]