नागराज मंजुळे: 

मराठी कवी, चित्रपट दिग्दर्शक नागराज यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर गावीच घेतले. पुढे पुणे विद्यापीठातून मराठी हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. व एमफिल केले. नोकरी करण्यापेक्षा आपल्याला आवडेल तेच करण्याचे त्यांनी ठरवले होते. शिक्षण घेत असतानाच लिहावेसे वाटले. मनात आले म्हणून त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला 2011 सालचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळाला आहे. नागराज यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला समीक्षकांची वाहवा मिळाली. मात्र कवी ही त्यांची एकमेव ओळख नाही. नागराज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला  सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. कोणतीही भाषा बोलणार्‍या व्यक्तीपर्यंत चित्रपट माध्यम पोहोचते, म्हणूनच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक विषय लोकांसमोर मांडले आहेत. नागराज यांनी अलीकडेच दिग्दर्शित केलेला ‘फँन्ड्री’ हा चित्रपट लंडन चित्रपट महोत्सव, मामी चित्रपट महोत्सव, कोलकत्ता चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या सर्व चित्रपट महोत्सवामध्ये प्रथम क्रमाकांचा मानकरी ठरला आहे.

नागराज मंजुळे म्हणतात की, ‘आपली आवड हेच आपले काम झाले, तर ते आपण खूप आनंदाने करतो. कधीकधी आपली आवड स्वत:ला कळायला खूप उशीर लागतो. आपली आवड आपल्याच लक्षात आली नाही, तर नंतर कुठेतरी कळते की, झाले हे चुकीचे आहे. मला असे नव्हते करायचे. आपल्याला काय करायचे आहे हे न कळाल्यामुळे कधीकधी खूप गोंधळ होतो. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव व्हायला उशीर होते. मुलांना स्वत:च्या आवडीनिवडी जोपासण्याचे स्वातंत्र्य सुरुवातीपासूनच दिले पाहिजे. त्यांना आवडीनिवडी जोपासण्याची संधी दिली, तर त्यांना लवकरच त्यांच्या आवडीनिवडींची जाणीव होईल आणि त्यांना हव्या त्या मार्गाने ते मार्गक्रमण करू शकतील. पालक, शिक्षक म्हणून आपण मुलांवर नजर ठेवतच त्यांना फॉलो केले पाहिजे. शिक्षकांनी मुलांची आवड लक्षात घेतली पाहिजे जेणेकरून समाज त्यांना सहजासहजी कळेल.’

***

नीला उपाध्ये:

पत्रकार


1960 च्या दशकात मराठी प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांची संख्या मर्यादित होती. त्या वेळी या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्याही कमी होती. पत्रकारिता हे क्षेत्र पुरुषप्रधान असल्यामुळे या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी होते. नीला उपाध्ये हे महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील असेच एक नाव. ज्यांनी आपल्या अजोड कामगिरीने माध्यम क्षेत्रात महिला म्हणून नवी क्रांती घडवून आणली व भावी पिढीसमोर आदर्श पत्रकार म्हणून प्रतिमा निर्माण केली. नीला उपाध्ये यांनी एम.ए. मराठी व संस्कृतचे शिक्षण घेतले. नोकरी करत असतानाच त्यांनी पत्रकारितेतील पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या पूर्णवेळ बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. सामाजिकतेचे भान असल्यामुळे पत्रकारितेसोबतच साहित्य, समीक्षा, ललित, स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांनी आपली ख्याती मिळवली. सध्या त्या अनेक मासिके, वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन करतात. चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या त्या सदस्या आहेत.

विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करताना नीला उपाध्ये म्हणतात, ‘माझे शिक्षणशास्त्र असे सांगते की, तुम्ही तुमचे शिक्षण तुमच्या मातृभाषेतून घेतले, तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढते. तुम्ही कुठलेही करिअर करा. मी एकच विनंती करेन की, भाषांवर प्रेम करायला शिका. आपली मातृभाषा शुद्ध लिहायला शिका. मातृभाषेवर तर प्रेम कराच, पण त्याचबरोबर इतर भाषांवरही मुलांना प्रेम करायला शिकवा. मुलांना खूप पुस्तके वाचायला शिकवा. मुख्य म्हणजे शुद्ध लिहिण्यावर कटाक्ष ठेवा. करिअर करताना मुख्यत: आपल्या आवडीने करावे. मुलांवर सक्ती करू नये. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना काम करू द्या. पण ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात आपण समाजाचे काही देणे लागतो, हे दायित्व कधी विसरू नका. तुम्ही घेतलेले कोणतेही शिक्षण, वाचलेले काहीही फुकट जात नाही. तुमच्या नकळत ते तुमच्यात मुरत जाते. सतत चिंतन करत राहाणे, वाचन करत राहणे, मनन करत राहणे हे तुम्हाला अधिक चांगला माणूस बनवते. आणि माझा कटाक्ष हाच आहे की, तुम्ही अधिक चांगले माणूस व्हा. तुम्ही चांगले माणूस झालात, तर कोणताही वाईट विचार तुमच्या मनात येणार नाही. तुम्ही अधिक चांगला माणूस होणे, हाच  शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. नुसते व्यावसायिक शिक्षण घेणे योग्य नाही.’

***

डॉ. प्रसाद देवधर :

डॉक्टर, समाज कार्यकर्ते  


डॉ. प्रसाद देवधर यांनी बी.ए.एम.एस. (Bachelor Of Ayurvedic Medicine and Surgery)पर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यान त्यांनी ‘प्रकाशवाटा’ हे नानाजी देशमुख व रागिणीताईवरील पुस्तक वाचले. त्यातील शाश्वत ग्रामविकास त्यांना भावला आणि जगण्याची दिशा त्यांना मिळाली. स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय थांबवून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘भगीरथ’ नावाने ग्रामविकास प्रकल्पाची सुरुवात केली. जलसंधारण, बायोगॅस उभारणी, मत्स्यसंवर्धन, बचतगट, शेतीपूरक व्यवसाय इ. सूत्रांच्या आधारे भगीरथ संस्थेने ग्रामविकासाची दिशा निश्चित केली. एका गावात काम स्थिर झाले, कायकर्त्यांचा गट तयार झाला की, नवीन गावात काम सुरू करायचे, असे शृंखला पद्धतीने भगीरथचे काम चालते.

डॉ. प्रसाद देवधर म्हणतात की, ‘डॉक्टर म्हणजे केवळ इंजेक्शन गोळ्या दिल्याच पाहिजे’ असा काही नियम नाही. शिक्षणाचा उपयोग मात्र 100% होतो. समाजमन बदलण्यासाठी डॉक्टरकी कामी येते. ‘भगीरथ’मुळे वाचलेले विज्ञान प्रत्यक्ष समाजामध्ये वापरता आले. शिक्षणाचा खरा अर्थ समजला. कुडाळ तालुक्यातील पाडपाची वाडी हायस्कूलमधील मुलांनी 2 गुंठ्यामध्ये सुधारित जातीची हळद लावली. आज शाळेकडे 20 किलो हळदपावडर तयार होते. पोषणआहारात ती वापरली जाईल. पुढच्या वर्षी हे सुधारित बियाणे मुले स्वत:च्या घरी वापरतील. विनोबांनी म्हटले आहे, गाव शाळेमध्ये व शाळा गावामध्ये गेली पाहिजे. शिक्षण व समाजाचे नाते अशा प्रकारे वाढले तर दोघांचाही उपयोग होईल. अन्यथा ‘आंधळ दळतं कुत्रं पीठ खातं’ अशी अवस्था दिसेल. आपण हे डोळसपणे बदलू शकतो. शिक्षण त्याच्यासाठीच आहे. त्याचा उपयोग केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी करू नये.’

***

डॉ. अशोकराव कुकडे :

समाजप्रेमी डॉक्टर 


वैद्यकीय व्यवसाय म्हणजे त्याग, पराक्रम आणि सेवा यांचे प्रतीक. परंतु आताच्या काळात मात्र हे क्षेत्र म्हणजे आपला आर्थिक स्तर उंचावणाचे साधन, असे काहीचे चित्र समाजात दिसत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून सेवाकार्य करणे, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. त्यातीलच एक डॉ. अशोकराव कुकडे. अत्यंत सेवाभावी, त्यागी, उच्चशिक्षित व धाडसी डॉक्टर. पुणे विद्यापीठातून एम.बी.बी.एस.ला प्रथम येऊन त्यांनी सुवर्णपदक पटकावले आणि पुढे सर्जरी या विषयात एम.एस.पर्यंतचे शिक्षण घेतले. अधिकाधिक लोकांना चांगल्या प्रतीची वैद्यकीय सेवा, तीही वाजवी शुल्कात उपलब्ध करून देणे या सामाजिक भावनेतून प्रेरित झालेल्या डॉ. कुकडे यांनी 1966 साली इतर तीन मित्रांच्या साहाय्याने त्या काळी अविकसित असणाऱ्या लातूरसारख्या जिल्ह्यात केवळ बारा खोल्यांमध्ये ‘विवेकानंद रुग्णालय’ सुरू केले. 46 वर्षांत या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे. आज हे रुग्णालय ‘विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च सेंटर’ अशा विश्वस्त संस्थेच्या स्वरूपात कार्यरत आहे.

डॉ. अशोकराव कुकडे त्यांचा करिअरविषयक दृष्टिकोन सांगताना म्हणतात की, ‘करिअर म्हणजे काय तर विशिष्ट व्यवसाय स्वीकारणे नाही, तर सामाजिक जाणीव ठेवून केलेले काम. सामाजिक जाणीव म्हणजे आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, समाज यांच्याविषयी आत्मीयतेची, कर्तव्याची जाणीव. काही प्रमाणात ती उपजत असते. परंतु चांगल्या समाजधारणेसाठी, प्रगतीसाठी ती भावना रुजवावी लागते, तिचा परिपोष व विस्तार करावा लागतो, ही जाणीव अखंड राहण्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतात. स्वा. सावरकरांनी वयाच्या 15 व्या वर्षी प्रतिज्ञा केली की, ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरेतो झुंजेन’ हे जन्मजात सामाजिक-राष्ट्रीय कर्तव्यभावनेचेच नव्हे, तर पूर्ण समर्पणाचे उदाहरण आहे. पंरतु सामान्य जनांमध्येही ही भावना उद्दिपित करून त्यामुळे समाजजीवन सुखी संपन्न होऊ शकते. आपल्या समाजात अजूनही याचा अभाव आहे. सामाजिक जाणिवा वाढण्यासाठी, अधिक प्रगल्भ होण्यासाठी संस्काराची आवश्यकता असते. हे संस्कार कुटुंबात, शाळेत, विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून होतात. भाषणापेक्षा प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे हे अधिक प्रवाही होतात. खऱ्या सामाजिक जाणिवा, पूर्णपणे नि:स्वार्थ भावनेने भारलेल्या असाव्यात या कामात पैशाची तर अपेक्षा नसावी पण प्रसिद्धी, पुढारीपणा, अधिकार अशीही हाव नसावी.

विद्यार्थ्यांनी ही भावना, जाणीव समजून करिअरकडे बघणे गरजेचे आहे. तिचे पोषण करणे व अशा कामातून मिळणारा निर्मळ आंनद मिळवण्यासाठी सदैव सिद्ध राहणे आवश्यक आहे.’

***

डॉ. कमलेश सोमण : 

साहित्यिक 


डॉ. कमलेश सोमण हे ‘ म.ए.सो. मुलांचे विद्यालय’ (मुलांचे भावे स्कूल, पेरूगेट पुणे-30)चे माजी विद्यार्थी. स्वतंत्रपणे अभ्यास करून ‘पीएच.डी.’ मिळवली. आपली प्रकाशन संस्था विकसित केली. ‘आपले जीवन आपल्याच तत्त्वविचांरांप्रमाणेच घडवण्याचा आदर्श’ म्हणजे डॉ. सोमण. ‘जे. कृष्णमूर्ती विचारमंच’ या संस्थेचे ते संचालक आहेत. ‘करिअरची सूत्रे’ आपल्या विद्यार्थ्यी मित्रांना ते सांगत आहेत.

‘मित्रहो, सध्या मी, एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून जे. कृष्णमूर्ती विचारमंचातर्फे लोकांशी संवाद साधत असतो. कृष्णमूर्तींची शिकवण समोरच्याच्या तळहातावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो खरोखर कोणते काम करण्याची तुम्हाला तळमळ आहे हे तुम्ही लहान असतानाच, आत्ताच या क्षणी शोधून काढा. ते फार महत्त्वाचे आहे आणि नवसमाजनिर्मितीचा तोच एक मार्ग आहे. एखाद्या कल्पनेला आपण कृतीची जोड देतो, तेव्हा आपण त्याला प्रयत्न करणे असे म्हणतो. तुम्हाला साधेपणा, सहजता यातले सौंदर्य व महत्त्व ओळखता आले पाहिजे. आपण जितक्या सहजतेने आंघोळ करतो किंवा आपण जेवायला बसतो, तितक्या सहजतेने आपल्याला अभ्यासाला, वाचनाला किंवा चिंतनाला बसता आले पाहिजे. खरे शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला आपला अभ्यासही तत्परतेने केला पाहिजे आणि आळसाला मुळीच थारा देता कामा नये. तसेच निरनिराळ्या खेळांमध्ये तुम्ही प्राविण्य मिळवले पाहिजे. मित्रहो, आपण स्वीकार केलेला अभ्यास कला, प्रवास आणि त्यातले प्रयास कधी संपत नाहीत. तसे आपण आयुष्यभर शिकतच असतो आणि निरागस मनच शिकण्याच्या अवस्थेत असते. संपूर्ण सज्जनपणातच, चांगुलपणातच आपल्याला जगायचे आहे. मुख्य म्हणजे जन्मजात बुद्धीला आपल्याला अधिकाअधिक परिपक्व करायचे आहे. ही परिपक्वता आपण स्वीकारलेल्या मार्गावरून मोठ्या चिकाटीने जाण्यातच आहे. तुमच्यात जर चांगुलपणा व प्रेम यांचे बीजारोपण झालेले नसेल, तर तुम्हाला योग्य शिक्षण मिळाले, असे कधीच म्हणता येणार नाही.’

 'करिअर निवडताना.....' या करिअर सप्ताहातील पहिला लेख वाचा खालील लिंकवर   

करिअर : आवड आणि व्यावहारिकता

 

-सायली नागदिवे, रेश्मा बाठे

[email protected]