‘कोणतं करिअर निवडू?’ या प्रश्नाचं सर्वात सोपं उत्तर आहे, ‘तुझ्या आवडीचं.’ अर्थात हे उत्तर ‘देणाऱ्याला’ सोपं आहे, पण ज्याला प्रत्यक्षात करिअर निवडायचं आहे, त्याचा दृष्टीने अवघड आहे. कारण माणसाची ‘आवड’ सतत बदलत असते आणि या दर वर्षी बदलणार्‍या ‘आवडी’नुसार आपण करिअरचा मार्ग बदलत गेलो; तर आपण कोणत्याही एका क्षेत्रात यशस्वी होणार नाही.

माझ्या पिढीच्या प्रत्येक मुलाला लहानपणी रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर व्हावसं वाटायचं. किंबहुना पु.ल. देशपांडे यांच्या मूळ वाक्यात थोडा बदल करून मी म्हणेन, ‘ज्याला लहानपणी इंजिन ड्रायव्हर व्हावसं वाटलं नाही, त्याला बालपण कळलंच नाही किंवा त्याचं बालपण वाया गेलं.’ परंतु म्हणून सगळ्यांनी इंजिन ड्रायव्हर व्हायचं का? आणि सगळ्यांना ते शक्य आहे का?

बऱ्याचदा एखादी यशस्वी किंवा लोकप्रिय किंवा प्रसिद्ध व्यक्ती बघितली की, आपल्याला त्या क्षेत्रात जावंसं वाटतं. यासाठी त्या क्षेत्राची सर्वंकष माहिती घेतलेली असतेच असं नाही. पण एखाद्या सी.ए.चं वातानुकूलित कार्यालय, त्याची गोल फिरणारी खुर्ची, एखाद्या अभिनेत्याला/अभिनेत्रीला बघायला जमणारी गर्दी बघून सी.ए. किंवा अभिनेता/अभिनेत्री बनण्याची ‘तथाकथित आवड’ मुलांच्या मनात निर्माण होते. डॉक्टर लोकांचा पांढराशुभ्र एप्रन आणि त्यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोपचं आकर्षण वाटल्याने डॉक्टर व्हावसं वाटतं, असं सांगणारी मुलगी माझ्याकडे समुपदेशनाला आलेली आहे. कल्पना चावलाचा अपघात होण्यापूर्वी एअरोनॉटिकल शाखेचा पसंतिक्रम तळाला होता. अपघातानंतर तिला मिळालेली प्रसिद्धी पाहून त्यानंतरच्या वर्षात प्रत्येक दुसऱ्या मुलीला एअरोनॉटिकल इंजिनिअर व्हावसं वाटू लागलं. यामुळे या शाखेचा पसंतिक्रम एकदम वर गेला आणि तिसरा झाला. त्यानंतर सुनिता विल्यम्सच्या या क्षेत्रातील कामगिरीमुळे तो अजून टिकून आहे.

तात्पर्य काय, तर ‘नुसती आवड’ लक्षात घेऊन करिअर निवडणे धोकादायक आहे. मग आवडीला अजिबात महत्त्व नाही का? तर, आहे. पण ती लहानपणापासून दिसली पाहिजे, जोपासली पाहिजे. सध्या मी समुपदेशनाला बसताना जवळ एक कागदाचे विमान आणि काही कागद ठेवतो. जी मुलगी ‘‘मला एअरोनॉटिकल इंजिनिअर व्हायचं आहे, कारण मला त्याची ‘आवड’ आहे’’, असं सांगत येते, तिला मी विचारतो की, ‘तू कधी साधं कागदाचं विमान करून तरी उडवलं आहेस का?’ ‘हो!’ म्हणाली तर, तिला कागद देऊन प्रत्यक्ष विमान करायला लावायचं किंवा माझ्याकडील तयार विमान देऊन ते फक्त डावीकडे वळेल किंवा वर जाईल अशी सुधारणा त्यात करायला लावायची, असा माझा बेत असतो. परंतु आजवर अशा एकाही भावी कल्पना चावला(ज्यु.)ने माझा बेत तडीस जाऊ दिलेला नाही. कारण माझ्या पहिल्या प्रश्नाचंच उत्तर या सर्व कल्पना चावला ‘नाही’ असं देतात. मग ही खरी आवड आहे का? आवड ही लहानपणापासून दिसली नव्हे; तर ‘जाणवली’ पाहिजे. अशी आपली ‘खरी आवड’ प्रत्येकाने शोधली पाहिजे. पालकांनी देखील पाल्याच्या ‘हो’ ला ‘हो’ न म्हणता त्याला/तिला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.

मग या आवडीला करिअर निवडीत अजिबात स्थान नाही का? तर त्याचं उत्तर आहे - ‘आहे!’ पण ते तिसरे. पहिले स्थान कल चाचणीला (Aptitude Test) आहे. त्यातून आपल्या मेंदूचा कल कोणत्या क्षेत्रांकडे आहे, हे समजते. मग येतो तो क्षमतांचा विचार. मेंदूचा कल अनेक क्षेत्रांकडे असू शकतो. पण त्या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याची क्षमता (Ability) आपल्यात असेलच असे नाही. त्यामुळे कल चाचणीने सुचवलेल्या क्षेत्रांपैकी ज्या क्षेत्रात यशस्वी होण्याची आपली क्षमता असेल, अशी क्षेत्रे वेगळी काढावीत. या क्षेत्रांपैकी जे क्षेत्र आपल्याला आवडतं, ते निवडावं. एकापेक्षा अधिक क्षेत्रे आवडीची असतील, तर त्यांना पसंतिक्रम द्यावेत व त्या पुढील निकषावर अंतिम निर्णय घ्यावा.

पुढील निकष आहे ‘व्यावहारिकतेचा’. आपल्या आवडीच्या क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात करिअर करणं व्यावहारिकदृष्ट्या सोपं आहे, ते बघावं व ते निवडावं. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट अशा व्यावसायिकांच्या मुलांनी/मुलींनी शक्यतो तेच क्षेत्र निवडावं म्हणजे त्यांना आईवडिलांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा थेट फायदा होतो. त्यांना व्यवसायात उतरण्यासाठी तुलनेने कमी कष्ट घ्यावे लागतात. पालकांचा व्यावसायिक संच (Set Up) वापरता येतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा सुरुवातीला होणाऱ्या चुका टाळण्यासाठी, सुधारण्यासाठी होतो. त्यांचा व्यवसाय प्रस्थापित (Well Set) असेल तर त्यांचे संपर्क, त्यांचे नाव वापरून व्यवसाय स्थिर करता येऊ शकतो, वाढवता येतो. त्यांचे ग्राहकविश्व (Client) वापरता येते. यामुळे व्यवसाय सुरुवातीपासूनच चांगला चालण्याची शक्यता वाढते. कष्ट कमी पडतात, ज्याचा उपयोग अधिक ज्ञान मिळवण्यासाठी होऊ शकतो. एखाद्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसेल तर असे क्षेत्र निवडू नये. आवड आणि करिअर यांचा सुवर्णमध्य काढावा. हा मुद्दा पटावा; म्हणून एक उदाहरण देतो आणि थांबतो.

माझी एक विद्यार्थिनी उत्तम अभिनेत्री आहे. अभिनयाकडे तिचा कल आहे. तशी तिची क्षमता आहे आणि आवड तर आहेच आहे. पण करिअर निवडण्याच्या अंतिम टप्प्यात मी तिला एक व्यवसायाभिमुख सल्ला दिला. का? तर ही विद्यार्थिनी खूप बुटकी आहे. यामुळे ती कितीही उत्तम अभिनय करत असली, तरी व्यावसायिक रंगभूमीवर किंवा चित्रपट/मालिका या क्षेत्रात तिला यश मिळणे अवघड आहे. ही व्यावहारिकता तिने समजून घेतली व माझ्या सूचनेवर विचार करून योग्य निर्णय घेतला. आज ती पूर्वनियोजित असणारा स्वतःचा व्यवसाय करते व आपली आवड जोपासण्यासाठी प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय आहे.

आवड आणि व्यावहारिकता यांचा संगम साधून करिअरचा योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला शुभेच्छा!

- शिरीष आपटे

करिअर समुपदेशक

[email protected]