जैवविविधता

दिंनाक: 22 May 2018 14:05:44


पृथ्वीची निर्मिती साधारण 5 अब्ज वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीवरील पहिला जीव समुद्राच्या उथळ पाण्यात 3.6 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. एकपेशी असणारा हा सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय जगणारा होता. आज मानवाने साधारण 20 लक्ष प्रजातींची नोंद केली आहे. एवढी प्रचंड जैवविविधता उत्क्रांतीच्या ओघात निर्माण झाली. काल असलेली विविधता आज नाही व आज असणारी विविधता उद्या नसेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आज-काल-उद्या या काही तारखा, महिने व वर्षेनाहीत. यामध्ये लाखो वर्षांचा काळ असतो.

पृथ्वीवर दिसणारी जैवविविधता अनेक स्तरांवर विभागली आहे. उच्चारायला व लक्षात ठेवायला सोपा म्हणून जैवविविधतेऐवजी ‘जीविधता’ हा सोपा शब्द आपण वापरू या. पहिल्या स्तरात सूक्ष्मजीव, एकपेशीय जीव, शैवाल, वनस्पती व प्राणी असे पाच गट आहेत. या पाचही गटात विविधता आढळते. उदा., वनस्पती गटात वृक्ष, वेली, गवत आहे; तर प्राणी गटात जलचर, उभयचर, पक्षी, सरपटणारे  व सस्तन प्राणी आहेत. यातील प्रत्येक स्तरावर जीविधता दिसून येते. उदा., वृक्षांमध्ये सपुष्प व अपुष्प वनस्पती, सदाहरित, पानझडी वृक्ष आहेत. सस्तन प्राण्यांमध्ये शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी व कीटकाहारी प्राणी आहेत. पुढील स्तर आहे प्रजातींचा. म्हणजे धावडा, आंबा, बोर, जांभूळ, बहावा यांसारखे अनेक वृक्ष. गरूड, पोपट, चिमणी, कावळा, शहामृग यांसारखे अनेक पक्षी असतात; तसेच वाघ, चितळ, वानर, उंदीर यांसारखे सस्तन प्राणी असतात. यापुढे जाऊन जातींची विविधता दिसते. उदा., हापूस, पायरी, तोतापुरी आंबे. आंबेमोहर, बासमती, इंद्रायणी जातींचा तांदूळ. त्यापुढे जाऊन प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरातील रक्ताचा प्रकार वेगळा असतो आणि त्या रक्तातील डी.एन.ए. व आर.एन.ए. यातही फरक असतो.

आपल्या भारत देशाचा विचार केला, तर जगातील 21 महाजीविधता असणार्‍या देशांमध्ये आपला समावेश होतो. भारताच्या भूभागाचे क्षेत्रफळ जगाच्या भूभागाच्या क्षेत्रफळाच्या केवळ 2% आहे. यात जगात आढळणार्‍या एकूण जीविधतेपैकी 8% जीविधता आढळते. आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतात महाजीविधता असण्याची अनेक कारणे आहेत. भारतात 4 महिने पाऊस पडतो. पावसाळा हा वेगळा ऋतू आपल्याला लाभला आहे. वर्षांतील 7 ते 9 महिने दररोज 10 ते 14 तास स्वच्छ ऊन आपल्याला मिळते, तसेच आपल्या देशातील विविध प्रदेशांतील तापमानात कमालीचा फरक आढळतो. हिमालयात बर्फ पडला; तर राजस्थान, मराठवाडा वगैरे भागात उन्हाळ्यात 45 अंश से. तापमान पोहोचते. याच भागात वार्षिक पर्जन्यमान 20 मि.ली.च्या जवळपास, तर काही भागांत 3000 मि.ली.पेक्षा जास्त पाऊस पडतो. भारताला मोठा समुद्रकिनारा आहे. सह्याद्री व हिमालयासारखे उत्तुंग पर्वत आहेत. या सर्वांचा परिणाम होऊन भारतात जगात आढळणार्‍या जवळपास सर्व परिसंस्था (Eco System) तयार झाल्या आहेत. याचा परिणाम म्हणून भारतात महाजीविधता निर्माण झाली आहे.

भारतातील जीविधता सर्वत्र समप्रमाणात विभागली गेलेली नाही. आपण राहतो तो पश्चिम घाट (गुजरात ते केरळपर्यंत पसरलेली पर्वतरांग. महाराष्ट्रातील या पर्वतरांगेला आपण ‘सह्याद्री’ म्हणतो.) ईशान्य भारत व अंदमान-निकोबार बेटसमूह या भागांमध्ये जास्त प्रमाणात जीविधता आढळून येते. प्राचीन काळापासून जवळपास आतापर्यंत ही जीविधता टिकून राहिली, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे निसर्गप्रेमी भारतीय संस्कृती व निसर्गाशी एकरूप होण्याची, त्यातील सर्व घटकांचे महत्त्व जाणून त्याबद्दल आदर राखण्याची भारतीयांची वृत्ती हे आहे. ऋग्वेदामध्ये सूर्य, चंद्र, अग्नी, उषा या देवतांच्या प्रार्थना आहेत. महाभारतात विदूराने पशू-पक्षी, वृक्ष-वेली; एवढेच काय गवताचेसुद्धा रक्षण करण्याचा संदेश दिला आहे. अनेक जीवांना आपल्या संस्कृतीतील देवाचे किंवा देवाच्या वाहनाचे स्थान दिले आहे. उदा., नागाची नागपंचमीला, तर बैलाची बैलपोळ्याला पूजा केली जाते. गरुड विष्णूचे, मोर सरस्वतीचे, गाय दत्ताचे व उंदीर गणपतीचे वाहन म्हणून आपण त्यांची पूजा करतो. वनस्पतींचेदेखील आपण पूजन करतो. वडाचे वटपौर्णिमेला पूजन करतो; तर पिंपळ बौद्धांचे श्रद्धास्थान.  शंकराला बेलपत्री आवडते, गपणपतीला दुर्वा व जास्वंदाची फुले प्रिय. भारतभर देवांच्या नावाने संरक्षित केलेल्या राया आढळतात. देवराई व देवबन नावाने रक्षिलेल्या या जंगलांमुळे जीविधता संवर्धनाला मोठा हातभार लागला आहे.

पण, दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात मानवकेंद्रित भौतिक विकासामागे आपण लागलो आहोत. लोकसंख्या वाढ विकासाच्या चुकीच्या पद्धती व चंगळवादी जीवनशैली  ही जीविधतेचा प्रचंड ऱ्हास होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. पर्यावरणकेंद्रित विचारांवर आधारित सम्यक विकास पद्धतींचा त्वरित अवलंब करण्याची गरज आहे. जीविधता आपल्याला फुकट स्वच्छ पाणी, हवा, सुपीक जमीन, खाद्य व नैसर्गिक संसाधने (कापूस, लाकूड, औषधे, मध, डिंक इ.) देते. आपण आपली सर्व धान्ये, फळे व पाळीव प्राणी वन्य प्रजातींपासूनच निर्माण केली आहेत. थोडक्यात, जीविधता नष्ट करणे; म्हणजे मानवाच्या नाशाची सुरुवात  करणेच ठरेल. आपण सर्व जण मिळून जीविधता वाचवण्याचे प्रयत्न करू या.

- राजीव पंडित

[email protected]