बालमित्रांनो, दिल्लीच्या रस्त्यांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. दिल्लीतले रस्ते खूप मोठे आहेत. मोठे दोन अर्थांनी, एक म्हणजे लांबीच्या दृष्टीने, एखादा रस्ता १० कि.मी.पर्यंत लांब असू शकतो इथे दिल्लीत. दुसऱ्या अर्थाने मोठा म्हणजे रुंद. ३-४ लेनचा रस्ता असतो फक्त एका बाजूने. विरुद्ध बाजूला पुन्हा तेवढ्याच ३-४ लेन. असं म्हणतात की, देशातल्या सर्वांत महत्त्वाच्या शहरांचा आपण विचार केला तर दिल्ली शहरात रस्त्यावरच्या वाहनांची संख्या सर्वांत जास्त आहे. रस्ते मोठे आणि गाड्या पण भरपूर. तर अशा रस्त्यांवर ट्रॅफिक साचून राहू नये म्हणून इथे रस्त्यांवर अधूनमधून गोल चक्कर आहेत. आता तुम्ही म्हणाल गोल चक्कर म्हणजे काय? सोप्या भाषेत गोल चक्कर म्हणजे आपण महाराष्ट्रात चौक म्हणतो, तशीच मध्यभागी असणारी जागा. या जागेत सेंटरला छान बाग केलेली असते आणि इथून रस्ते सर्व दिशांना गेलेले असतात. म्हणजे तुम्ही शाळेत भूमितीमध्ये वर्तुळ काढत असाल त्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या रेषा असतात ना, तसेच हे रस्ते असतात. म्हणजे तुम्ही समजा सत्य मार्गावरून चालले असाल आणि गोल चक्करपाशी आलात की, त्या गोल चक्करमध्ये फिरून पुन्हा तुम्ही सत्य मार्गावर पोहोचता. हे मुंबईसारख्या शहरातल्या माणसांना विचित्र वाटेल. मुंबईसारखी शहरं सरळ रेषेत वाढलेली आहेत. दिल्ली हे एका केंद्रापासून सर्व बाजूला विकसित केलं गेलेलं शहर आहे. शहराचा राजधानीचा भाग हा व्यवस्थित नियोजित भाग आहे. या भागाच्या केंद्रस्थानी इंडिया गेट ही वास्तू किंवा स्मारक आहे. या स्मारकाला एक पूर्ण फेरी मारणारा रस्ता हा जवळजवळ २ किलोमीटरचा आहे. आणि या रस्त्यातून पंडारा रोड, शाहजहां रोड, अकबर रोड, कस्तुरबा गांधी मार्ग, अशोक रोड, झाकीर हुसेन मार्ग, टिळक मार्ग, कोपर्निकस रोड, पुराना किला रोड, शेरशाह रोड असे जवळजवळ १० रस्ते निघतात. इंडिया गेट हे शहराचं एक केंद्र मानलं तर शहर हे एक वर्तुळ आणि या वर्तुळाचा परीघ म्हणजे रिंग रोड. यातही दोन वर्तुळं आहेत. एक आहे रिंग रोड आणि दुसरा आहे आऊटर रिंग रोड. दिल्लीतल्या रस्त्यांची नावं ही सर्वसाधारणतः ३ भाषांंमध्ये लिहिलेली असतात. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी. 

दिल्लीतले रस्ते जसे मोठे आहेत तसेच ते हिरवेगारपण आहेत. सगळ्या मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फ़ा मोठी मोठी आणि जुनी झाडं आहेत. या झाडांची दाट सावली अनेक रस्त्यांवर पडलेली असते. या झाडांमध्ये सगळ्या प्रकारची झाडं आपल्याला दिसतात. झाडांची खूप विविधता इथे दिसते. कदंब, पिंपळ, अशोक, बकुळ, आंबा, जांभूळ, मोह, साग, शिशिर, चाफा अशी खूप झाडं इथे दिसतात. अमलताश, गुलमोहर अशा झाडांच्या पिवळ्या, लाल रंगांच्या फुलांनी इथले रस्ते उन्हाळ्यात सजलेले असतात. 

दिल्ली हे राजधानीच शहर आहे, त्यामुळे इथे अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत. इतर शहरात आढळणार नाहीत, अशा काही गोष्टी इथे आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, पंतप्रधानांचं निवासस्थान, तसंच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य यांची निवासस्थानं. इथे संसद भवन आहे. सर्वोच्च न्यायालय आहे. या सगळ्या इमारतीही पाहण्यासारख्या आहेत. या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण इमारतींबद्दलही मी तुम्हांला लवकरच सांगणार आहे.

दिल्ली शहराबद्दलच्या काही गमतीजमती वाचा सुप्रिया देवस्थळी यांच्या लेखात खालील लिंकवर  

शोधू नवे रस्ते..

-सुप्रिया देवस्थळी

[email protected]