पारिजात

दिंनाक: 20 May 2018 15:29:50


पारिजात - याचे फुल ओरिएसी सुमारे १० मी.पर्यंत उंचीच्या या चिवट मोठ्या झुडपाचे किंवा लहान वृक्षाचे मूळस्थान ‘भारत’ असून छोटा नागपूर, राजस्थान, मध्य प्रदेश; तसेच दक्षिणेस गोदावरीपर्यंत त्याचा प्रसार आहे. खानदेशातही रूक्ष जंगलातही तो आढळतो. पण त्याच्या सुवासिक व नाजूक फुलांकरिता तो सर्वत्र बागेत लावतात. याची पाने समोरासमोर, अंडाकृती, काहीशी दातेरी, वर खरबरीत व खाली लवदार असतात. पाने एप्रिल - मेमध्ये गळतात. फुले लहान, पांढरी, झुबक्यात असतात. ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये त्यांचा हंगाम असतो. पाकळ्या चार ते आठ, वर पांढऱ्या व सुट्या व खाली नारिंगी नळीत जुळलेल्या असतात. फुले सायंकाळी फुलतात. झाडाखाली सडा पडतो त्यांचा. फळ, बोंड गोलसर पण सपाट व चेपल्यासारखे असून त्यात एक–दोन बिया असतात. पुष्पमुकुटाच्या नारिंगी रंगद्रव्याचा उपयोग रेशीम रंगविण्यासाठी पूर्वी होत असे. केशर, हळद, नीळ आणि कात यात मिसळून ते वापरीत. हा रंग खाद्यरंग म्हणूनही वापरत. याच्या बियांपासून फिकट पिवळे भुरे सुगंधी तेल निघते.

पानात कॅरोटीन व अॅस्कॉर्बिक आम्ल असते. लाकूड भुरे, मध्यम कठीण असून त्याचा छ्पराकरिता उपयोग करतात. कोवळ्या फांद्यांच्या टोपल्या बनवितात. साल कातडी कमविण्यासाठी आणि पाने लाकडाला व हस्तिदंताला झिलई आणण्यासाठी वापरतात. ती पित्तशामक, कफ पाडून टाकण्यास उपयुक्त असते. ताप व संधिवातावर गुणकारी असतात. 

दल पुंज – नलिका ही देठे काविळीवर अत्यंत उपयुक्त मानली जातात. याची पाने खाल्याने वा काढा करून घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते. तसेच ती सायटिकावरही फार उपयुक्त आहेत.

हिंदू लोक याला ‘स्वर्गीय वृक्ष’ मानतात. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून मिळालेल्या चौदा रत्नांपैकी हे एक आहे. विवाह प्रसंगीच्या मंगलाष्टकात पारिजातकाचा उल्लेख आहे. तसेच महाभारतातही त्याचा उल्लेख आलेला आहे. हे फूल देवांचे सौंदर्य वाढवते आणि त्यांचा सुगंध हा प्रेमाचा श्वासच आहे असे ग्रीक कवीने म्हटले आहे.

पारिजातकाची झाडे टेकड्यांच्या बाजू व खडकाळ जमीन झाकून टाकतात. किंचित सावलीही तिला मानवते. बकऱ्या झाडे खात नसल्याने झाडीचे रान बनते.

झाडांची लागवड बियांपासून रोपे करून अथवा छाट किंवा दाबाच्या कलमांनी करतात.

पारिजातकावर पडणारा ‘भुरी’ हा एकच महत्त्वाचा रोग आहे. तो ओइरियम वंशाच्या बुरशीसारख्या हरित द्रव्यारहित वनस्पतीमुळे होतो. हवेतून त्याचा प्रसार होतो. त्या वेळी पानांच्या वरच्या बाजूस राखेसारखी पांढरी कवकाची वाढ झाल्याने पाने गळतात. त्यावर ३०० मेशची गंधकाची भुकटी पिस्कारल्याने या रोगास आळा बसतो.

लखनौच्या नॅशनल बोटॅनिकल गार्डनमध्ये केलेल्या पारिजातकाच्या मोठ्या लागवडीत काही नवीन नैसर्गिक प्रकार आढळून आले आहेत. आकार असे – १) कर्णफुल, २) चक्र, ३) सीयाशृंगार – म्हणजे कानातल्या कुंड्यातील फुले ४) ध्रुव ५) तारा.

 रंगाची विविधता हे वैशिष्ट्य असणाऱ्या कर्दळ या फुलाविषयी माहिती घेऊ खालील लिंकवर 

कर्दळ

-मीनल पटवर्धन 

[email protected]