बिग बॉस!

दिंनाक: 02 May 2018 14:44:49


गेली पंचवीस वर्षे ते एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत. अगदी लहानपणापासून ते एकमेकांचे खास मित्र आहेत.

कुठल्याही कामात एकमेकांशिवाय दोघांचं पान हलत नाही. पण गंमत म्हणजे, दोघांचे स्वभाव अगदी वेगवेगळे.

त्यांचा आकार वेगळा. त्याचं वागणं वेगळं. त्याचं दिसणं वेगळं. त्यांच्या ‘कामाची चव’ वेगळी म्हणजे कामाची पद्धत वेगळी.

पण दोघेही एकमेकांच्या बाजूला घट्ट उभे.

फार पूर्वी म्हणजे त्यांच्या लहानपणी, या दोन मित्रांची उंची खूपशी सारखीच होती.

त्या वेळी हे दोघे दिवसभर एकमेकांशी गप्पा मारायचे. संध्याकाळी वारा सुटल्यावर माना वळवून गाणी म्हणायचे. रात्री एकमेकांना ‘फुड नाइट, ड्रिंक टाइट’ करून आपापल्या कामाला लागायचे.

कधी जोरात वारा आला, तर हात लांब करून एकमेकांना टपल्या मारायचे.

कुणाच्या नकळत हळूच एकमेकांच्या पायांना पायांनीच चिमटे काढायचे. पण थोड्याच दिवसांत...

पहिल्याची उंची वाढू लागली सरळ-सरळ.

तर दुसरा मात्र, वाढू लागला आडवा-आडवा.

आणि आता तर..

पहिल्याची उंची प्रचंड, पण त्यामानाने दुसरा बुटकाच. त्यामुळे या दोघांना हल्ली गप्पा मारताना फार त्रास होतो; पण म्हणून ते दोघे काही गप्प बसलेले नाहीत.

ते दोघे पाणी पिताना गप्पा मारतात. दुसर्‍याच्या घरी लख्ख हिरव्या कैर्‍या आल्या होत्या.

 ते पाहून पहिला म्हणाला, ‘‘अरे मित्रा, खूप वर्षांपासून तुला एक गोष्ट सांगायची राहूनच जातेय बघ...’’

हे ऐकल्यावर आंब्याचे झाड सळसळलं आणि नारळाचं झाड काय बोलतंय ते पान टवकारून ऐकू लागलं.

‘‘मला वाटतं जगात तुझ्यासारखा तूच एकटा आहेस!’’

हे नारळाचं बोलणं आंब्याला काही कळलंच नाही.

आंब्याने विचारलं, ‘‘म्हणजे?’’

 ‘‘अरे, आधी तू हिरवागार आंबट मिट्ट असतोस;

पण नंतर मात्र पिवळा आणि गोड घट्ट होतोस!

हा चमत्कारच आहे की!!

तुझा रंग, वास, चव सारं काही बदलतं...’’

नारळाला थांबवत किंचित लाजून आंबा म्हणाला, ‘‘हां हे खरंच!’’

गडगडा हसत नारळ पुढे म्हणाला, ‘‘आणि यात पुन्हा गंमत म्हणजे, तू आंबट असताना, लहान असताना तुला ‘ती’ म्हणतात, पण तू मोठा झाल्यावर, पिकल्यावर मात्र तुला ‘तो’ म्हणतात!! ‘ती कैरी’ आणि ‘तो आंबा’ हे तर भारीच आहे! आणि तू आंबट असलास किंवा गोड असलास, तरी तुझ्यापासून इतके वेगवेगळे पदार्थ करतात, तसं भाग्यं इतर कुठल्याच फळाच्या नशिबी नसावं, असं वाटतं मला.’’

हे ऐकताच चिडून आंबा म्हणाला, ‘‘अरे, पदार्थ परवडले. ते करताना आपल्या जिवाचे एकदाच काय ते हाल होतात;  पण ही माणसं माझे जिवंतपणीच हालहाल करतात. म्हणून ‘एकदाच मरो मग त्यांनी आपलं काहीही करो’, असू आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही.’’

‘‘म्हणजे काय करतात काय तुला?’’ नारळाने भीत भीत विचारलं.

आंबा दात ओठ-खात रागारागाने सांगू लागला, ही माणसांची घरं म्हणजे माझ्यासाठी छळछावण्याच आहेत! मी लहान असताना, कच्चा असताना, आंबट असताना ही क्रूर माणसं मला कापतात, चिरतात. या माझ्या जखमांवर ती तिखट-मीठ लावतात आणि मग आनंदाने टाळ्या पिटत मला चावून चावून खातात.

काही क्रूरकर्मी मला तिखट-मीठ लावल्यावर माझ्या अंगावर उकळतं तेल ओततात. नंतर मला हवाबंद बाटलीत, तेलात बुडवून ठेवतात. आणि मग बाटलीत घुसमटून व तेलात बुडून माझा जीव गेला की ही माणसं, वर्षभर माझे तुकडे खातात! मिटक्या मारत खातात..!!’’ आंब्याला पुढे बोलवेना.

‘‘बाप रे!’’

‘‘म्हणजे ‘आपल्याच दारात उभं असणार्‍याचे तुकडे-तुकडे करायचे आणि तेच तिखट मीठ लावून मिटक्या मारत खायचे’ असं राक्षससुद्धा करत नसतील!!’’ नारळाला पुढे काही बोलवेचना. आंब्याचं दु:ख ऐकून झाडावरच्या नारळातलं पाणीच आटलं! कसंबसं धीर करून नारळ पुढे म्हणाला, ‘‘आता विषयच निघाला म्हणून तुला माझी गोष्ट सांगतो. तुला कसं झाडावरून अलगद काढतात. तसं माझं नाही. मला निष्ठूरपणे वरतून खाली ढकलून देतात. माझा कपाळमोक्ष करतात. मग धारदार सुरा घेऊन मला तासतात. कोयता घेऊन मला फोडतात. इतकं करूनही त्यांचं समाधान होत नाही. तेव्हा.. ते माझे मधोमध दोन तुकडे करतात. मग धारदार विळी घेऊन मला खवण-खवण खवणतात. माझी पार करवंटी करून टाकतात. ही माणसं सर्वांशीच अशी वागतात?’’

नारळाचं हे बोलणं ऐकून आंब्याला क्षणभर काही सुचेना. आंब्याची पानं शहारली.

मोहोर सावरत आंबा म्हणाला, ‘‘अं... मला वाटतं जाऊ दे तो विषय. ‘झालं गेलं मातीला मिळालं’ असं समजू या.’’

‘‘हे बघ... आपल्यामुळे त्यांना आनंद होतो. त्यांना चवीने खाता येतं, असा पॉझिटिव्ह विचार आपण करू या! खरं म्हणजे मीच तुला एक गंमत सांगणार होतो.’’ झावळ्या हलवत नारळ म्हणाला, ‘‘सांग लवकर सांग.’’

‘‘अरे नारळा, या जगात तुझ्यासारखा तूच एकटा आहेस!

‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये याची एंट्री पण आहे! इतक्या उंचावरून खाली उडी मारणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही!’

खाली पडून कपाळमोक्ष झाला तरी इतरांना आपल्यातलं गोड पाणी व मऊ लुसलुशीत खोबरं देणारा असा तू एकटाच आहेस बरं!

आणि...

तुला या आपल्या देशात केव्हढा मान आहे.

कुठल्याही शुभकार्याची सुरुवात तर तुझ्याशिवाय होऊच शकत नाही! आणि पूजा करायची तर तू हाताशी हवासच ना? म्हणून तर तुला म्हणतात ‘श्रीफळ’. आमच्या सगळ्यांचा बिग बॉस आहेस तू.’’

हे ऐकल्यावर नारळ आनंदाने, समाधानाने डोलला.

नारळ डोलता-डोलता मध्येच थांबला.

आंब्याकडे पाहून नारळ म्हणाला,

 ‘‘मित्रा, ‘घरावर आंब्याचं टाळं लावल्याशिवाय नारळाचं श्रीफळ होत नाही.’

ही कोकणी म्हण तुला माहीतच असेल म्हणा.’’

हे ऐकताच..

आंबा क्षणात असा काही मोहोरला की..

आंब्यावर बसलेला पोपट दचकला!

 

निर्जीव वस्तूंमधील धमाल संवाद असलेली लटकू-लटके ही राजीव तांबे यांची कथा..

लटकू-लटके

-राजीव तांबे

[email protected]