चिवड्याचंं घर

दिंनाक: 19 May 2018 14:41:29


बालमित्रांनो, उन्हाळा लागला की, जेवणाची मजाच राहत नाही. भाजी-पोळी खाण्याचा तर खूपच कंटाळा येतो. मग अशा वेळी काहीतरी चमचमीत, कुरकुरीत खायला हवं, असं वाटतं, नाही का? काहीच खायला नसेल, तर चिवडा हा बेस्ट पर्याय असतो. असंच अनुजच्या घरीही आईने चिवडा बनवून ठेवला होता... अनुजलाही चिवडा खूप आवडायचा. भूक लागली की, तो या चिवड्याच्या घरावर यथेच्छ ताव मारायचा. पण आज या चिवड्याच्या घरात काही वेगळंच सुरू होतं... काय बरं झालं होतं या चिवड्याच्या घरात?

एकदा चिवड्याच्या घरात कडाक्याचं भांडण सुरू झालं... मुरमुरे म्हणाले, ‘‘मी या घराचा राजा, माझ्याशिवाय चिवड्याची काय मजा?’’ खोबरं म्हणाले, ‘‘मीच श्रेष्ठ, माझ्याशिवाय चिवडा होणार नाही बेस्ट...’’ 

रागाने झाले लालेलाल शेंगदाणे, पौष्टिकतेवर गर्व करून गेले तावातावाने...

शेव म्हणाली नंतर, ‘‘अरे, माझ्यामुळेच चिवडा होतो चटपटीत, नाहीतर लहान-थोर सारे बसतील नाक मुरडीत...’’

कडीपत्त्याची पिटुकली पाने आवाज वाढवत म्हणाली, ‘‘माझा तर किती खमंग सुवास, माझ्याशिवाय चिवडा होईल का खास?’’

मका पोहे उड्या मारत तणतणत म्हणाले, ‘‘मीच बनवतो चिवड्याला मस्त कुरकुरीत; बालगोपाल सारे खातात निवडून खुशीत...’’

आता या चिवड्याच्या घरात आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कडाक्याचं भांडण सुरू झालं होतं, जो तो आपलं महत्त्व पटवून देऊ लागला होता आणि अशातच सारे जण डब्यातल्या वेगवेगळ्या कोपर्‍यात रुसून बसले आणि नेहमी एकजुटीने राहणारं चिवड्याचं घर मात्र वेगळं झालं... थोड्याच वेळात चिवड्याचा घरमालक अनुज आला. त्याला जोरदार भूक लागली होती. आता चिवड्यावर मनसोक्त ताव मारायचा, असं त्याने ठरवलं होतं. पण डबा उघडून बघतो तर काय? अनुजला तर नवलच वाटलं... आईने चिवडा बनवलाच नाही, असं समजून तो निराश झाला. त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून चिवड्याच्या घरातल्या सर्वांनाच वाईट वाटले. पण जो तो रुसून वेगळा बसलेला. अनुजने मग आईला जोरात हाक मारली... आईचा आवाज ऐकताच चिवड्याच्या घरातले सारेच घाबरले. आई येणार नि आपली चंपी करणार, म्हणून सारेच जण एकत्र येण्यासाठी धावपळ करू लागले. त्यांची ही फजिती पाहून अनुजही हसू लागला. लाडक्या अनुजला हसताना पाहून चिवड्याच्या घरातले सारेच खूश झाले. आपलं कधी भांडण झालं होतं, हेही ते विसरले. सारे एकत्र आल्यावर चिवडा झाला मस्त, अनुजने मग सारा केला फस्त. तेव्हा चिवड्याच्या घरातल्या सार्‍यांना कळले, आपल्या घरातील प्रत्येक जण आहे चविष्ट, पण ‘एकी’ची चवच सर्वश्रेष्ठ.

-भाग्यश्री शिंदे 

[email protected]