अनेकांना विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यापैकी कोणी पोस्टाची तिकिटे, कोणी आईसस्क्रीमच्या काड्या, वेगवेगळी भेटकार्डे, पत्रिकेवरील गणपतींचे फोटो, रंगीत कागद, दगड, शंख-शिंपले अशा कितीतरी वस्तू जमा करत असतात. आपण जमा केलेल्या अशा वस्तू इतर मित्रांना दाखवण्यात एक वेगळीच मजा असते. ज्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जमा करून जपून ठेवत असता, त्याप्रमाणे आपल्या देशात कितीकरी दुर्मीळ वस्तूंचा ठेवा असलेली अनेक संग्रहालये आहेत. अत्यंत दुर्मीळ, पुरातन वस्तूंचा संग्रह करून त्या संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात; जेणेकरून नागरिकांना त्या पाहता येतील. अशा जतन केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून संग्रहालये आपल्या देशाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपत असतात. त्याचबरोबर कलात्मक, निसर्ग-विज्ञान, तंत्र-विज्ञान यांसारख्या विषयाशी संबंधित असणाऱ्या संग्रहालयांच्या माध्यमातून आपल्याला अनेक दुर्मीळ गोष्टी पाहण्यासाठी उपलब्ध होतात. अशा वस्तू प्रत्यक्ष पाहता तर येतातच; पण त्याचबरोबर त्यामागची पार्श्वभूमी, इतिहास याची तपशिलवार माहितीही मिळते.

भारतासारख्या देशाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारतात पूर्वी राजेशाही पद्धत अस्तित्वात होती, तेव्हा अनेक राजा-महाराजांनी युद्धात वापरलेली शस्त्रे त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून संग्रहालयाच्या स्वरूपात जतन केली आहेत. तसेच, राजेशाही पद्धतीत वापरात असलेल्या वस्तू, तेव्हाची कलाकुसर आज दुर्मीळ झाली आहे. अशा सहज उपलब्ध नसणाऱ्या वस्तूंचा संग्रह करून, संग्रहालयात त्यांची योग्य देखभाल केली जाते. अशा वस्तूंचा संग्रह पाहून आपल्याला समृद्ध अशा राजेशाही जीवनाची कल्पना येते. अशाच वस्तूंचा संग्रह आपल्याला सातारा जिल्ह्यातील औंध येथील ‘श्री भवानी संग्रहालया’त पाहता येतो. औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी जतन केलेला अनमोल ठेवा आपल्याला येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. स्वत: भवानरावांनी १९८३मध्ये हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले केले. संग्रहालयात स्वतंत्र बालविभाग असून, १५व्या व १९साव्या शतकातील जयपूर, कांगरा, मुघल, पंजाब, विजापूर, पहाडी आणि मराठा शैलीतील चित्रकला, रंगकामाचे नमुने आहेत. अनेक पाश्चिमात्य चित्रकारांची चित्रे या संग्राहलयात असून ‘हेन्री मूर’ या पाश्चात्य कलाकाराने साकारलेले माता व बालकाचे प्रसिद्ध शिल्प येथे आहे. जुन्या काळातील कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडाच्या वस्तू, जुनी घड्याळे, हस्तिदंती कोरीव वस्तू या संग्रहालयात आहेत. तसेच, दुर्मीळ वस्तू संग्रहासाठी देशात प्रसिद्ध असणारे, महाराष्ट्राचे भूषण म्हणून ओळखले जाणारे संग्राहलय म्हणजे पुण्यातील ‘राजा दिनकर केळकर संग्राहलय’. दिनकर केळकर यांना दुर्मीळ गोष्टी जमा करण्याचा छंद होता. त्यामध्ये पेटिंग्जपासून दैनंदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे. त्यांनी जतन केलेला ठेवा इतरांना पाहता यावा, म्हणून केळकर यांनी १९६२साली हे संग्रहालय स्थापन केले. स्वत:चे पैसे खर्च करून, त्यांनी अनेक पुरातन वस्तू जमवल्या. पुढे १९७५ साली महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे हे संग्राहलय सोपवण्यात आले. अतिशय भव्य अशा या संग्राहलयात ९ दालेन असून ४० वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये २०,०००पेक्षा अधिक पेटिंग्ज, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा विविध प्रातांच्या लाकडी, दगडी, कोरीव कामाचे नमुने पाहायला मिळतात. विविध प्रकारचे दिवे, कुलपे, अडकित्ते, पेन-दौती अशा पूर्वीच्या काळातील रोजच्या वापरातील वस्तू आहेत. असा सांस्कृतिक व पारंपरिक ठेवा पाहण्यासाठी तुम्ही या संग्रहालयाला अवश्य भेट दिलीच पाहिजे. औरंगाबादमधील ‘सोनेरी महल’ या मोगलकालीन इमारतीत अशाच पुरातन वस्तूंचे संग्राहलय आहे. दौलताबाद या मध्ययुगीन नगराच्या ठिकाणी उत्खननात सापडलेली घरांची रचना व इतर सामाजिक पद्धती दर्शवणारी वस्तू व छायाचित्रे पाहण्यासाठी या संग्रहालयाला भेट द्यायला हवी.

देशातील थोर व्यक्तिमत्त्वांचे आचार-विचार, हस्तलिखिते, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांचे वास्तव्य असलेल्या वास्तू, त्यांच्या वापरातील वस्तू सर्वसामान्य लोकांना पाहता याव्यात याकरता त्यांचे संग्राहलयाच्या स्वरूपात जतन केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान तसेच पुण्यातील केसरीवाडा येथे त्यांच्या काही वस्तू, केसरी वृत्तपत्राच्या जुन्या अंकाचा संग्रह येथे आहे. पुण्यातील ज्या आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधींना १९४२मध्ये स्थानबद्ध करून ठेवले होते; तेथे महात्मा गांधी यांच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस यांचेही संग्रहालये स्मारकाच्या स्वरूपात जतन केले आहेत. या राष्ट्रपुरुषांची संग्रहालयाच्या रूपातील स्मारके म्हणजे आपला राष्ट्रीय ठेवा आहे. आपला राष्ट्रीय वारसा समजावून घेण्यासाठी देशात येणारे पर्यटक अशा संग्रहालयांना आवर्जून भेट देतात. अशा थोर व्यक्तींच्या संग्राहालयांना भेट दिल्याने आपल्यालाही प्रेरणा मिळते.

अशा ऐतिहासिक आणि पुरातन संग्रहालयांबरोबरच आता अनेक ठिकाणी सजीव संग्रहालयेही होत आहेत. निसर्गातून दुर्मीळ होत चालले प्राणी, पक्षी, विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहता यावे म्हणून आजच्या घडीला आपल्याकडे अनेक प्राणी-पक्षी संग्राहालये आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील राणीची बाग. १८६२साली राणी व्हिक्टोरिया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना ही बाग समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने येथे प्राणी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. अनेक वन्यप्राणी येथे पाहायला मिळतात. तसेच पुण्यातील पुणे-सातारा महामार्गावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. सुरुवातीला १९८६मध्ये नीलम कुमार खैरे यांनी येथे फक्त सर्पोद्यान सुरू केले. १९९९मध्ये पुणे महानगर पालिकेतर्फे अन्य वन्य प्राण्यांचे येथे विस्थापन करण्यात आले. या संग्रहालयात पांढरा वाघ, पांढरा मोर, नील गाय, साळिंदर असे दुर्मीळ वन्यजीव त्याबरोबरच हरिण, माकड, सिंह, मगर, सुसर असे प्राणी आहेत. या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे प्रत्येक प्राण्याची शास्त्रशुद्ध ओळख व्हावी; म्हणून फलकही लावले आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्राण्याचे शास्त्रीय नाव, त्याची वैशिष्ट्ये, जीवनकाल, निसर्गासाठी त्यांचा उपयोग अशी माहिती घेण्यासाठी या संग्राहालयात एक सफर करायलाच पाहिजे. आपल्या देशात जैवविविधता विषयावरील आशिया खंडातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. ‘दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या निसर्ग रक्षण, संवर्धनसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुंबईमध्ये ‘दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ संग्रहालयाची स्थापना केली. या संग्रहालयात असंख्य प्राणी, पक्षी यांची छायाचित्रे, माहिती आहे. विविध झाडे, फळे, फुले यांचीही शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला येथे मिळते. संग्रहालयात सुमारे २६,००० पक्षी, २७,५०० वेगवगळे प्राणी आणि ५००० कीटक यांच्या माहितीसाठी या संग्रहालयाला आवर्जून भेट द्या.

याशिवाय एखाद्या विशिष्ट विषयांची माहिती सर्वांना मिळावी; या उद्देशाने अनेक संग्रहालये स्थापन करण्यात आली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या चलन व्यवहाराची माहिती मिळावी, म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने २००५ साली ‘रिझर्व्ह बँकेचे संग्रहालय’ सुरू केले. भारतातील चलनाचे हे पहिलेच संग्रहालय आहे.  येथे लहान मुलांसाठी  स्वतंत्र दालन असून नाण्यांचा इतिहास, माहिती ही खेळातून सांगितली आहे. इ.स.पूर्व ६व्या शतकापासून ते आजपर्यंत आपल्या चलन व्यवहारात कसकसे बदल होत गेले, बदलत गेलेली नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग यांची माहिती तसेच नोटा, धनादेश (चेक), हुंडी यांमध्ये निरनिराळ्या धातूंचा, कागदाचा उपयोग चलनात कसा होत गेला हे या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर कळेल. आपला चलनाचा इतिहास समजून घेण्यासाठी या संग्रहालयात जायलाच हवे.

अलीकडे अनेक शहरात ‘वॅक्स म्युझियम’ही सुरू झाली आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत. अशाही एखाद्या संग्रहालयाला तुम्ही अवश्य भेट द्या.

संग्रहालये आपल्या ज्ञानात भर घालत असतात. ऐतिहासिक संग्रहालयांचा अभ्यसकांना, संशोधकांना पुरातन गोष्टी अभ्यासण्यासाठी संदर्भ म्हणून उपयोग होतो. देशात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या येथील संग्रहालयांच्या माध्यमातून आपली संस्कृती कळण्यास मदत होत असते. संग्रहालयाच्या स्वरूपातच आपल्या पुढच्या पिढ्यांकडे सांस्कृतिक वारसा हस्तांतरित होतो. संग्रहालये आपला समृद्ध ठेवा आहे. ती आपली राष्ट्रीय संपत्ती असून, आपण तिचे जतन आणि संवर्धन करायला हवे.

या सुट्टीत तुम्ही एखाद्या संग्रहालयाला नक्की भेट द्या. तिथे तुम्ही काय पाहिले, संग्रहालयाला भेट दिल्याने तुम्हाला कोणती नवीन माहिती मिळाली, याची नोंद ठेवा. तुम्हीही एखाद्या वस्तूचा संग्रह केला असेल; तर तुमच्या संग्रहाचे फोटो आणि माहिती शिक्षणविवेकला नक्की पाठवा.

- रेश्मा बाठे

[email protected]