विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, उन्हाळ्याची सुटी सुरू झाली. तुम्ही दिवसभर भरपूर खेळणार, टी. व्ही. बघणार, आईला खायला दे, खायला दे म्हणून सतावणार. म्हणूनच तुम्हाला आईच्या, ताईच्या मदतीने करता येईल आणि तुम्हाला आवडेल अशी पाककृती दिली आहे. आईला जी जी मदत करणे शक्य आहे, ती तुम्ही करा. आणि ही पाककृती करा. आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना खाऊ घाला. बघा ते किती खूश होतील आणि त्यांचा आनंद बघून तुम्ही किती आनंदी व्हाल! नक्की प्रयत्न करा बरं का! आणि नवनिर्मितीचा आनंद घ्या.

साहित्य - 1 वाटी पोहे, 1 छोटी काकडी, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 मिरची, 2 चमचे बारीक चिरून कोंथिबीर, 2 चमचे ओल्या नारळाचा चव, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, चिमुटभर हिंग, हळद.

कृती - काकडी कोचवून घ्या किंवा बारीक चिरून घ्या. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, नारळ, मीठ, साखर हलके एकत्र करा व फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा (10 ते 15 मिनिटे). पोह्यावर पाणी शिंपडून घ्या. फ्रीजमधील मिश्रण घालून पोहे एकत्र कालवा. छोट्या पळीमध्ये तेल घेऊन ते तापल्यावर जिरे, हिंग, हळद घाला. ती फोडणी पोह्यावर घाला. एकदा सर्व मिश्रण हालवून घ्या. रपरपत्या उन्हात संध्याकाळी खाण्यास अतिशय उत्तम! झटपट, पौष्टिक व थंड गुणाचे.

- सुवर्णा देशपांडे

न्यू इंग्लिश स्कूल, सातारा

[email protected]