भावना आणि संवेदना म्हणजेच Emotions  आणि  Feelings. ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे.

भावना म्हणजे एखाद्या बदलामुळे घडून आलेली शारीरिक प्रतिक्रिया जी आपल्या मेंदूत ठामपणे बसली आहे, व जी सर्वांची सारखीच असते.

संवेदना म्हणजे आपली मानसिक (associations) जी वरील प्रतिक्रियांवर अवलंबून असतात. ही associations प्रत्येक व्यक्ती प्रमाणे बदलतात.

संवेदना या नेहमी भावनांनंतर उद्भवतात.              

भावना या शारीरिक प्रतिक्रिया असल्यामुळे मेंदूतील बदल, चेहर्‍यावरील भाव, रक्तदाब, ह्या सर्व गोष्टींवरून त्या मोजतात येतात. या साधरणतः सर्वांच्या सारख्याच असतात व त्यांचा सहजपणे अंदाज लावता येतो. संवेदना या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलतात व त्या मानसिक प्रक्रिया असल्यामुळे त्या मोजणे अवघड असते.

संवेदना या भावनांमुळे निर्माण होतात. भावना या पटकन येऊन जातात, पण त्या मागच्या संवेदना या खूप काळ टिकून राहू शकतात.

प्रत्येक व्यक्तीने खाली दिलेल्या भावना कधी ना कधीतरी अनुभवलेल्या आहेतच:

भीती

राग

दुःख

आनंद

तिरस्कार

आश्चर्य

लहान मुले देखील या सर्व भावना अनुभवतात. पण त्या जपायच्या कशा हे त्यांना कोणी शिकवत नाही. उदा., एखाद्या 5 वर्षांच्या मुलाला शाळेत जायची भीती वाटत असेल तर तो कारणे सांगेल- पोट दुखतंय, डोकं दुखतंय इ. आपल्यासाठी ही फालतू कारणे असतील, पण त्या मुलामध्ये खरोखरच ते शारीरिक बदल होत असतात. तर हे असं का होतंय हे मुलांना समजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळेच मुलांची भावनिक प्रगती चांगली होणार आहे व त्यांना त्यांच्या संवेदना तुमच्यासमोर मांडणे सोपे जाणार आहे.

तर यासाठी पालक म्हणून आपण काय करू शकतो?

मुलांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका. तुम्हाला अंदाज लावता आला पाहिजे की, आत्ता आपल्या मुलाच्या भावना काय आहेत? त्या भावनांना नाव द्या. तुला राग आला आहे असं वाटतंय, आपण बोलायचं का काय झालंय ते?

हा वेळ त्यांना शिकवण्यासाठी व त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी वापरा. त्यांचा भावना सहजपणे कशा जपता येतील याचा विचार त्यांना करायला लावा. मला कळतंय की, ‘‘बाबांची वाट बघून बघून तुझी चिडचिड झाली आहे, पण ते येईपर्यंत आपण एखादी गोष्ट वाचायची का?’’

भावना जपण्यासाठी वेगवेगळे प्रकार वापरण्यास मुलांना प्रोत्साहित करा. साध्यासाध्या प्रसंगावरून त्यांना भावना ओळखायला व जपायला शिकवा. उदा., मुलाला कुत्र्याची खूप भीती वाटते. रस्त्यावर चालताना अचानक कुत्रा समोर आला तर तू काय करशील? असा त्याला विचार करायला लावा. घाबरून पळत सुटण्यापेक्षा शांतपणे रस्त्याच्या पलीकडे जाता येईल का? बरोबर कोणी असेल तर त्याचा हात धरून कुत्र्याकडे न बघता पुढे जाता येईल का? अशा वेगवेगळ्या मार्गांचा मुलांना स्वतःला विचार करायची संधी द्या.

त्यांना शिकवा की संवेदना व्यक्त करणे हे अतिशय गरजेचे असले तरी ते योग्यरित्या केले गेले पाहिजेत. मित्रांशी भांडण झाले म्हणून घरी येऊन लहान भावावर त्याचा राग काढणे योग्य नाही. त्यापेक्षा राग आल्यावर थोडा वेळ एकटे राहणे/ 100 पर्यंत मोजणे/ राग शांत होईपर्यंत फेर्‍या मारणे, हे सर्व पर्याय मान्य आहेत.

मुलांच्या भावना कधीही उडवून लावू नका. यामुळे त्यांना त्या भावना असण्याची अढी निर्माण होऊ शकते व ते परत कधी तुमच्यासमोर मोकळेपणाने बोलणार नाहीत. काही भावनिक प्रतिक्रिया डावलण्यासाठी पालक मुलांशी खोटे बोलतात. (इंजेक्शन देताना अजिबात दुखणार नाही) पण या खोट्या आश्वासनामुळे त्यांची भावनिक प्रतिक्रिया अजूनच वाढू शकते. जे असेल ते त्यांच्या वयाला समजेल अशा शब्दात स्पष्ट सांगा. एखाद्या 7-8 वर्षांच्या मुलाला लागले, तर तो रडणारच आहे. त्यावर ‘काय रे, लहान बाळासारखा काय रडतोस?’ असे म्हणल्याने त्याचा आत्मविश्वास खचू शकतो. मुलांच्या या सर्व भावनिक प्रतिक्रियांकडे कधीच दुर्लक्ष करू नका. यामुळे त्यांच्या भावना महत्त्वाच्या नाहीत, असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल व ते स्वतःच्या भावना जपणे व संवेदना व्यक्त करणे कधीच शिकणार नाहीत.

आपण आपल्या मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवू शकतो वाचा खालील लिंकवर 

स्मरणशक्ती

- प्रियांका जोशी

[email protected]