मी भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. माझा उगम पूर्वेकडून होऊन मी पश्चिमेकडे समुद्राला जाऊन मिळते. अशी मी नर्मदा... मला रेवा असेही म्हंटले जाते. रेवा या शब्दाचा अर्थ ‘पर्वत-पठारावरून उड्या मारत वाहणारी’ असा होतो. मला मध्य प्रदेश राज्याची जीवनरेषा असेही म्हटले जाते.

माझा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंटक पठारावरून होतो. माझ्या उगम स्थानाची उंची १,०५७ मीटर एवढी आहे. अमरकंटक पठारावरून मी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगाच्या दरीतून पश्चिम दिशेने वाहत माझा प्रवास सुरू करते. मी मध्य प्रदेशातील जबलपूर, होशंगाबाद येथून वाहत महाराष्ट्रात प्रवेश करते. तेथून गुजरातच्या दिशेने वाहत मी भडोच येथे अरबी समुद्राला खंबातच्या आखातास जाऊन मिळते. माझ्या या प्रवासात मला अनेक सख्या म्हणजेच नद्या येऊन मिळतात. मला उत्तर दिशेकडून हिरण ही एक प्रमुख उपनदी येऊन मिळते. सातपुडाच्या उत्तर उतारावरून मला बंजार, शेर, शक्कर, तवा, छोटी तवा या नद्या येऊन मिळतात. छोटी तवा व माझा जेथे संगम होतो, तेथे दर्डी व मंधार नावाचे दोन १२ मी उंचीचे धबधबे आहेत. अहिल्याबाई होळकर यांनी माझ्या काठावर महेश्वर मंदिर संकुलाचे बांधकाम केले आहे आणि महेश्वरी घाटही बांधला आहे. तेथून ८ कि.मी. अंतरावर सहकाधारा धबधबा आहे

माझ्या नदीच्या खोऱ्यात सुपीक, काळी माती व गाळमाती असून नदीच्या वरच्या डोंगराळ भागात तांदूळ व भरडधान्ये, तर सपाट भागात गहू व खालच्या भागत कापूस, तेलबिया व ज्वारी ही पिके घेतली जातात. अशा प्रकारे माझ्या नदीकाठाजवळच्या सुपीक जमिनीत पिके घेतली जातात.

माझ्या खोऱ्यात भरपूर पाऊस पडतो. माझ्या नदीकाठचे एक वैशिष्ट्य म्हणजे मी देशाच्या अगदी सुंदर भागातून वाहते. मोठी, घनदाट जंगले माझ्या नदीच्या काठांना व्यापून टाकतात. मी बऱ्याचदा आपला प्रवाह बदलत असते. म्हणून कृषी समुदायाला माझ्या काठी स्थायिक होणे कठीण वाटले. मात्र माझ्या नदीच्या खोऱ्यात आदिवासी जमातीचे वास्तव दिसून येते. वेगवेगळ्या कालखंडातील स्थायिक झालेल्या आदिवासी लोकांची प्राचीन संस्कृती मी जतन करून ठेवली आहे. ही संस्कृती तापी आणि माझ्या दरम्यानच्या डोंगराळ भागात विखुरलेली दिसून येते. हा सारा वारसा जपत मी पुढे पुढे वाहत जाते. माझ्या दोन्ही तीरांंवर विशेषतः डोंगराळ भागात साल, साग या वृक्षाची घनदाट अरण्ये आहेत. माझ्या खोऱ्यातून मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच खांडवा-इटारसी-जबलपूरवरून अलाहाबादला जाणारा आणि खांद्व्यावरून इंदूरकडे जाणारा असे लोहमार्ग आहेत.

नर्मदा बचाव आंदोलन याबद्दल तुम्ही ऐकून असालच. हे आंदोलन नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणाविरूद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी यांनी उभारलेले आंदोलन होते. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आजही सुरू आहे.

मी भारताच्या मध्यावरून वाहते म्हणून मला उत्तर आणि दक्षिण संस्कृतीचा मध्यबिंदू समजले जाते. यावरूनच नर्मदा परिक्रमाची संकल्पना आपल्याला समजू शकते. ही परिक्रमा अमरकंटक येथील माझ्या नदीच्या काठावर वसलेल्या ओमकारमंधता या तीर्थक्षेत्रापासून सुरू होते आणि दक्षिण भागातून वळसा घालत मी पुन्हा खंबायतमार्गे ओमकारमंधता येथे पोहोचते. हिंदू धर्मामध्ये गंगा नदीप्रमाणे मला ही धार्मिक महत्त्व आहे. मी शिवाच्या अंगावरून निघाली आहे, असे लोक मानतात. त्यामुळे मला गंगा नदी खालोखाल पवित्र मानले जाते.

नद्यांविषयी माहिती सांगणारा 'नद्यांचा प्रवास' या सदरातील पहिला लेख वाचा खालील लिंकवर 

नदीबद्दल इंटरेस्टिंग काहीसे...

उत्कर्षा मुळे-सागवेकर

[email protected]

Ref ;   1. Indian Water culture – R.S.Morawanchikar

2.         V.H Yaardi; J.BKumathekar ; Marathi Vishwakosh  Maharashtra Rajya Marathi VishwkoshMandal.