विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी केवळ शाळांतील चार भिंतीत विज्ञान न शिकवता, परिसरातील गोष्टींचा उपयोग करून घेणे; ही संकल्पना राबवली मीना म्हसे यांनी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांसोबत २०१४ पासून आजपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी त्या करत आहेत. 

मीना म्हसे यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने इ. २री ते इ. ७वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासत औषधी वनस्पतींची माहिती संकलित करण्याचा उपक्रम राबवला. मीना म्हसे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींचा शोध घेऊन त्यांचे गुणधर्म, वनस्पतीचे औषधी अंग, लागवडीचे उपयुक्त तंत्र, उपचार पद्धती या सर्व मुद्द्यांच्या आधारे माहिती संकलित केली. पर्यावरण जागृती आणि परिसराचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास, शोधकवृत्ती, ज्ञानवर्धक आणि आयुर्वेदिक माहिती यांकडे विशेष लक्ष दिले. या माहितीचे संकलन करत असताना वृक्षदिंडी, वृक्षलागवड असे अनेक कार्यक्रम घेतले. आसपासच्याच परिसरात सहलींचे आयोजन करून तेथील औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. या सर्व वनस्पतींचे घरगुती उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थी त्याचा वापर करतात. तसेच अधिक माहिती मिळण्यासाठी शिरुर येथील ‘तनिष्का हायटेक नर्सरी’त नेऊन रोपांची लागवड, संवर्धनतंत्र व रोपांच्या वाढीची नोंद याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी शाळेत औषधी वनस्पतींची परसबाग तयार केली. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासोबतच गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचेदेखील सहकार्य घेतले. हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता, लोकसहभाग मिळाल्यामुळे ग्रामस्थांना आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती नव्याने लक्षात आली. संकलित माहितीचा उपयोग सर्वांना व्हावा, या दृष्टिकोनातून ‘औषधी वनस्पतींचे उपयोग व महत्त्व’ असे पुस्तक संपादित करून ग्रामस्थांच्याच हस्ते त्याचे प्रकाशन केले. 

मीना म्हसे यांच्या या उपक्रमाची अनेक वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे. इतकेच नव्हे तर, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी मीना म्हसे यांच्यासोबतच विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांमधील या सुप्त वैज्ञानिक गुणांच्या संवर्धनासाठी मीना अशोक म्हसे यांनी केलेल्या नवउपक्रमाबद्दल २०१८ साठीचा विज्ञान विभागातील ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

-रुपाली निरगुडे

[email protected]