मागच्या वर्षभरात पालक म्हणून आपल्याला पडणार्‍या काही प्रश्नांची, मला सापडलेली उत्तरे तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला, या प्रश्नांची उत्तरे मी या विषयातील तज्ज्ञ म्हणून नव्हे; तर एक पालक म्हणून मुलाचे संगोपन करत असताना मला व प्रीतीला, म्हणजेच माझ्या बायकोला आलेले अनुभव संवादाच्या रूपातून मांडायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हे अनुभव, प्रश्न ओळखीचे वाटले असतील, काही प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत झाली असेल, तर माझे सदर यशस्वी झाले असे मी म्हणेन. प्रत्येक पालक, मुलाचे भविष्य व वर्तमान सुखाचे व्हावे; म्हणून जीवापाड प्रयत्न करत असतो. मात्र सध्याच्या धावपळीच्या काळात व त्रिकोणी, चौकोनी कुटुंब व्यवस्थेत मुलांसाठी द्यायला कितीही इच्छा असली, तरी आपल्याकडे खूपच वेळ कमी उरतो हेही खरे आहे. म्हणूनच मला वाटते की, मुलांच्या संगोपनाची सध्याच्या काळातील पद्धत आपल्याला हळूहळू; पण नेटाने बदलावी लागेल.

आपल्यापैकी अनेक जण वाडा संस्कृतीत, एकत्र कुटुंबात वाढले, त्यामुळे आपल्या लहानपणी आपली जबाबदारी घेण्यासाठी आई-वडिलांच्या मदतीला नकळत अनेक जण होते. आता मुलांचा अभ्यास, त्यांची आजारपणं ही सगळी जबाबदारी बहुतेक घरांमध्ये फक्त आई वडिलांनाच घ्यावी लागते, त्यातच ही जबाबदारी नेमकी करिअर ऐन भरात असताना घ्यावी लागत असल्याने, मुलांचे संगोपन व नोकरीतील जबाबदारी यांमध्ये संघर्ष सुरू होण्याची शक्यता वाढते. असा संघर्ष सुरू झाला की, त्याचा परिणाम आपल्या मुलांवर जसा होतो, तसा घरातील एकूण वातावरणावरही होतो. एरवी सोप्या वाटणार्‍या, जसे की, मुलांशी गप्पा मारणे, त्यांना चांगल्या कार्यक्रमासाठी बाहेर घेऊन जाणे, त्यांच्या शाळेतील मीटिंगला जाणे, या गोष्टी आव्हानात्मक वाटू लागतात. एकीकडे आपण मुलांसाठी एवढे काही करत असताना, दुसरीकडे मुलांच्या चेहर्‍यावर समाधान मात्र काही दिसत नाही.

एकत्र कुटुंब व्यवस्था परत आणणे शक्य नसले, तरी सामूहिक पालकत्व म्हणजेच पालकांनी एकत्र येऊन मुलांचे संगोपन करत असताना त्यांना पडणारे प्रश्न सोडवणे, मुलांसाठी उपक्रम आयोजित करणे व त्यातून पालक म्हणून वाटणारा एकटेपणा, हतबलता दूर करण्याचा प्रयत्न करणे, हे मात्र सहज शक्य आहे. त्यातून आपण एकत्र कुटुंबपद्धती किंवा वाडा संस्कृत मध्ये मिळणारे संगोपनाचे फायदे मिळवू शकतो.

 आपल्या मुलावर आपली मालकी नाही, तर निसर्गाने ती आपल्याला दिलेली अतिशय मौल्यवान भेट आहे, आपल्या आयुष्याच्या प्रवासातील गोड सोबत आहे. एवढे सोपे सत्य आपण स्वत:ला बजावून सांगितले पाहिजे. मुलांच्या चुका ही त्यांच्यावर ओरडण्याची संधी नाही, तर त्यांनी एखादी नवीन गोष्ट शिकण्याची संधी आहे, असा विचार आपण करून बघितला पाहिजे. मुलाने नवीन आणलेला चहाचा कप फोडला, तर तर तो त्याचा वेंधळेपणा आहे, हे त्याला पटवून देण्यापेक्षा, कप कसा धरला म्हणजे हातातून निसटणार नाही, हे आपल्याला ज्या दिवशी मुलांना शांतपणे सांगता येईल, त्या दिवसापासून मुले त्यांच्या चुका लपवणार नाहीत, तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतील, तुमच्याकडे मदत मागतील.

आपले मूल आपल्याला आवडते का? हा प्रश्न आपण एकदा स्वत:ला विचारला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा प्रश्न मुलाने कप फोडल्यानंतर, परीक्षेत शेजारच्या मुलापेक्षा कमी मार्क मिळवल्यानंतर किंवा तुमच्या मनाविरुद्ध वागल्यानंतर विचारला पाहिजे. त्या वेळीही तुमचे उत्तर ‘हो’ असेल का? याचा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. मूल अपयशी होणे, ही तात्कालिक घटना आहे. त्या वेळी मुलाला त्याचे दोष दाखवण्यापेक्षा मदतीची गरज असते. त्याचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज असते. ज्या वेळी मूल आपल्याला आवडणे, हे त्याच्या तात्कालिक वागण्याशी सापेक्ष राहणार नाही, त्या वेळीच आपल्याला मूल खर्‍या अर्थाने समजेल. 

आपल्याकडे मुलांना देण्यासाठी कमी वेळ आहे, हे नक्की. पण त्यातूनही आपण वेळेचे योग्य नियोजन करून हा प्रश्न सोडवू शकतोच की. घरी आल्यानंतर सोसायटीत फेरफटका मारायला जावे, सुट्टीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींना भेटावे, त्यांच्याशी गप्पा माराव्या, असे आपल्याला वाटणे साहजिकच आहे. पण हे सगळे करत असताना आपण मुलांना सोबत घेऊन गेलो, तर काय हरकत आहे?

पालकत्व म्हणजे संस्काराच्या नावाखाली मुलांना बदलण्याचा, इतर मुलांपेक्षा चांगले घडवण्याचा प्रवास नाही. संस्कार शब्दांतून नाही, तर कृतीतून होतात. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील, तसेच त्यांना चांगले काय, वाईट काय, हे ओळखता यावे, असे आपल्याला वाटत असेल, तर ते आधी आपल्याला ओळखता आले पाहिजे व ते आपल्या वागण्यातून मुलांच्या समोर आले पाहिजे. पालकत्वाच्या प्रवासातून तुम्ही स्वत:ला बदलून एक पाउल... पुढे टाकून बघा, मुले आपोआप दहा पावले टाकायला तयार होतील.

तुमच्या आनंदी पालकत्वाच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा, तुमचे अनुभव किंवा सूचना मला [email protected]  या ई-मेल वर किंवा फोन करून नक्की कळवा.

मुलांच्या मनात या शिबिरांविषयी काय कल्पना असतील? आणि त्यावर पालकांनी सुचवलेला आगळावेगळा मार्ग.

मुलांचे उन्हाळी शिबिर

 चेतन एरंडे 

[email protected]