बालमित्रांनो, परीक्षा संपून तुम्ही सर्वजण अभ्यासातून मुक्त झालेले आहात; आणि खर्‍या अर्थाने आता सुट्टी सुरू झालेली आहे. सुट्टी म्हटले की धम्माल करणे, मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळणे, ट्रीपला जाणे, टी.व्ही. पाहणे यातच आपला बराचसा वेळ जातो. या गोष्टींसोबत या सुट्टीचा वापर काहीतरी विधायक कामासाठी करता आला तर! हा लेख अशाच उपक्रमांवर आधारित आहे. दैनंदिन जीवनात आपण बर्‍याच गोष्टींचा वापर करून त्या टाकून देतो. अशाच काही घरी सहज उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूंपासून आपण टिकाऊ, उपयुक्त आणि आर्कषक अशा वस्तू बनवण्यास शिकूयात...

1) प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून हँगिग पॉट्स :

आपण बाहेरगावी प्रवास करताना पाण्याच्या बाटल्या विकत घेतो व पाणी संपल्यानंतर त्या फेकून देतो. अशा बाटल्यांचा वापर आपण छोटी छोटी रोपे लावण्यासाठी करू शकतो.

साहित्य :  प्लॅस्टिकची रिकामी बाटली, पंचिंग मशीन  (किंवा बाटलीला व्यवस्थिता भोक पाडता येईल अशी वस्तू), बाटली टांगण्यासाठी सुतळी किंवा नॉयलॉन दोरा, कटर, कातरी, फेव्हिकॉल, वापरात नसलेले कागद, तिकिटे, दुकानाची बिले (जे कागद आपण रद्दीमध्ये टाकू शकत नाही असे वापरल्यास उत्तम) माती, रोपे/बियाणे.

कृती : बाटलीचा अर्धा किंवा तीन तृतीयांश भाग कटरने व्यवस्थित कापून घ्या. बाटलीच्या तळाशी 3-4 लहान लहान छिद्रे पाडून घ्या, त्यामुळे मातीमधील ज्यादा पाणी निघून जाईल. कापलेल्या भागापासून 1-1.5 सें.मी. खाली सुतळी बांधण्यासाठी सर्व बाजूंनी समान अंतरावर भोके पाडा. टाकाऊ कागदांचे तुकडे करून फेव्हिकॉलने बाटलीच्या बाहेरील बाजूने चिकटवा. या कागदाला आवडता रंग देऊन सजावटीसाठी पिस्त्याची टरफले, डाळी, रंगीत बटणे इत्यादीचा वापर करून सजवू शकता. हा पॉट वापरण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामध्ये आवश्यक तेवढी माती घालून त्यात छोटी रोपे लावा. भोकातून सुतळी ओवून  बरोबर मध्यभागी दुसर्‍या सुतळीने टांगून ठेवा.

2) कागदांच्या तुकड्यांपासून वाटी (बाऊल)

साहित्य : टाकाऊ कागदाचे तुकडे (तिकिटे, बिले इ.), फेव्हिकॉल, रंग, ब्रश, साचा बनवण्यासाठी मोठी वाटी.

कृती : कागदाचे छोटे छोटे तुकडे करून घेणे. ज्या वस्तूचा आकार बनवायचा आहे, त्या वस्तूवर हे तुकडे पाण्याने चिकटवणे, एका वाटीत फेव्हिकॉल व थोडे पाणी घेऊन मिश्रण करावे. पाण्याने चिकटवलेल्या कागदाच्या थरावर फेव्हिकॉलचे मिश्रण घेऊन कागदांचे तुकडे चिकटवावे. हवा तेवढा कागदाचा थर चिकटवल्यानंतर, ती वस्तू सुकण्यासाठी ठेवणे. थर पूर्णपणे वाळल्यानंतर आतील वस्तू हळूवारपणे बाहेर काढणे. पाण्याच्या थरामुळे ती वस्तू अलगदपणे बाहेर येते. तयार झालेल्या कागदाच्या साच्याला दोन्ही बाजूने फेव्हिकॉलचे कोटींग देणे. या वस्तूला रंग देऊन छान सजवा. या वाटीचा वापर दागिने, पिना अशा कोणत्याही छोट्या-छोट्या वस्तू ठेवण्यासाठी करता येईल,(टीप : ज्या वस्तूचा साचा म्हणून वापर करायचा असेल ती वस्तू शक्यतो गुळगुळीत व कागदाचा थर साच्यातून बाहेर काढता येईल अशी असावी.)

3) जुन्या पत्रिकांपासून आकर्षक वस्तू :

साहित्य : पत्रिका, जुने भेटकार्ड, साधी पाकिटे, फेव्हिकॉल, कातरी

कृती : आपल्या घरी साधी पांढरी/रंगीत पाकिटे असतात. थोडी कल्पकता वापरून आपण त्यांना अजून आर्कषक बनवू शकतो. आपल्याकडे येणार्‍या पत्रिका-भेटकार्ड यावर सुंदर नक्षीकाम असते. त्या नक्षीकामाचा वापर करून साध्या पाकिटांवर योग्य ठिकाणी चिकटवून अधिक आकर्षक बनवू शकतो. अशी पाकिटे इतरांना भेट देताना अधिक सुंदर वाटतील. पाकिटांच्या व्यतिरिक्त पत्रिका, भेटकार्डचा वापर करून वॉल हॅगिंग सुद्धा बनवता येऊ शकते.

वरील वस्तूंमध्ये टाकाऊ पदार्थांचा योग्य रितीने वापर केलेला असून त्या बनवण्यास अत्यंत सोप्या व दिसण्यास आकर्षक आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत या वस्तू बनवून सुट्टीचा आनंद लुटा!

- संपदा कुलकर्णी

[email protected]