नमस्कार मित्रहो, आपण आपल्या खगोलाच्या अभ्यास प्रवासात खूप पुढे आलोय. आजवर आपण खगोलातील सोप्या संज्ञांपासून सुरुवात केली आणि नंतर हळूहळू वर्षभराच्या कालावधीत आपण खगोलाच्या अभ्यासात भरपूर मजल मारली! आता या प्रस्तुत लेखामध्ये आपण हा अभ्यास पुढे कसा न्यायचा यासंबंधी माहिती घेऊयात. त्याचप्रमाणे आकाशाविषयीच्या काही अंधश्रद्धा यांबद्दल जाणून घेऊयात.

आकाशाच्या अभ्यासाची सुरुवात तर आपण केली, पण हाच अभ्यास करताना आपल्याला बरेच भान ठेवायला लागते. जसे की, आपण हा अभ्यास करताना आपली सदसदविवेकबुद्धी कायम जागृत ठेवली पाहिजे. याचे कारण असे की, या आकाशाच्या अभ्यासात काय आणि कसे यांसारखे प्रश्न सोडवताना आपल्याला या एका गोष्टीची फार जास्त मदत होते. हा अभ्यास आपण जसा जसा पुढे नेऊ, तसतसे आपल्या लक्षात येईल की, संज्ञा या अधिकाधिक क्लिष्ट होत चालल्या आहेत आणि त्याचप्रमाणे या संकल्पना सुद्धा तश्याच क्लिष्ट होत जातात. त्यामुळेच संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन आपल्याला करून घ्यावयाचे असेल तर आपल्याला त्या स्वतः समजावून घ्याव्या लागतात आणि तसेच त्या सोप्यासुद्धा करून घ्याव्या लागतात. जसे की, ग्रहणे असतील किंवा अधिक्रमणे हे विषय समजायला कठीण आहेत; पण ते तसे का होत असेल? असा प्रश्न आपण स्वतःला केला आणि त्याची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली तर आपल्याला नक्की उत्तरे मिळत जातात. या अभ्यासात तार्किक विचाराला फार जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच काहींना खगोलशास्त्र आपलेसे करायला कठीण जाते आणि त्यांचा प्रवास तिथेच संपतो. मात्र आपल्याला या शाखेत प्रचंड वाव आहे. फक्त संकल्पना समजावून घेणे आणि कोणत्याही अफवा किंवा तत्सम कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या आधी स्वतः त्यावर मनन करून आणि तर्क लावून मगच त्या गोष्टींची सत्यता पडताळून घेता येऊ शकेल.

याच विषयाला अनुसरून हल्ली सोशल मिडियावर अनेक मेसेजेस फिरत असतात. अनेक लोक ते डोळे झाकून इतरांना पाठवतात. आणि मग अशाच प्रकारे काही मोठ्या अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरायला हातभार लागतो. आपण अशाच काही अंधश्रद्धा आणि गैरसमज पाहणार आहोत.

१. आकाशात दोन सूर्य दिसणार – अनेक वेळेस हाच मेसेज गुरू, मंगळ इत्यादी ग्रहांच्या बाबतीत येतो. पण आपण तार्किक विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते की, ग्रहाचा आकार आणि त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे जर आपण लक्षात घेतले तर हे सत्य नसून पसरवला जाणारा गैरसमज आहे हे सहज लक्षात येईल. 

२. चंद्र हा २५८ वर्षांनी अनेक १० वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसेल – आता आपण हा विचार केला पाहिजे की, चंद्र हा वेगळ्या रंगात दिसण्याचे नक्की कारण काय असू शकेल? तर प्रकाशाचे परावर्तन. पण त्यामुळे तो एका विशिष्ट रंगात म्हणजे उगवताना आणि मावळताना जसा लालसर दिसतो तसा दिसेल. पण इंद्रधनूसारखे रंग त्याचे नक्कीच दिसणार नाहीत. अजूनही यावर विचार करण्यास तुम्हाला वाव आहे.

३. सगळे ग्रह एका रेषेत आल्याने पूर येईल, आपत्ती येईल इ. – आता ही घटना फार जास्त दुर्मीळ आहे, पण आपण जर गुरुत्वाकर्षणाचा विचार केला आणि चक्क जर गणित मांडले, तर सूर्य एका बाजूला आणि इतर ग्रह दुसऱ्या बाजूला असा विचार केला, तर आपल्यासुद्धा लक्षात येईल की, या ग्रहांचा पृथ्वीवर होणारा परिणाम अतिशय नगण्य आहे. आणि त्यामुळे या अशा स्थितीमुळे आपल्या पृथ्वीला काहीही धोका नाही. (तो जास्त मानवापासून आहे !)

तर या आणि अशा असंख्य अंधश्रद्धा आणि गैरसमज अज्ञानी लोकांद्वारे पसरवले जातात. आणि अनेक लोकांच्याद्वारे ते खरे देखील मानले जातात. चला तर मग, आपण असे ठरवूयात की, असे मेसेजेस आले तर आपण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करू आणि त्याचे सडेतोड वैज्ञानिक उत्तर देऊन गैरसमज दूर करून या विषयाबद्दल प्रबोधन करू ! पुन्हा नक्की भेटू पुढील लेखमालिकेत; तोपर्यंत आकाश बघत राहा आणि अशीच उत्तुंग गगनभरारी घ्या. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! 

आकाश पाहण्याच्या साधनांबद्दल जाणून घेऊ खालील लिंकवर 

लेख १० – अवकाशाच्या अभ्यासाची साधने – दूरदर्शक , द्विनेत्री

 

-अक्षय भिडे 

[email protected]