नमस्कार, 
शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज पहिला दिवस. परिचयाने सुरुवात झालेल्या शिबिरात आज मुलं खूप खेळ खेळली. पप्पडम्-पायसम्, सिग्नल, मामाचं पत्र हरवलं अशा खेळांनी मजा आली. नवीन ठिकाण, नवी माणसं पाहून सुरुवातीला गप्प गप्प असणारी मुले थोड्याच वेळात आजच्या सत्रासाठी तयार झाली. 'पुस्तक माझे' या सत्रात मुलांनी स्वतःचे पुस्तक तयार केले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी हे सत्र घेतले. चित्र आणि मुलांच्या त्यामागील कल्पना अशी खूप सुंदर पुस्तके तयार झाली. जवळपास सव्वा तास गडबड न करता, एकाग्र चित्ताने मुलांनी आवडीने आपापली पुस्तके तयार केली. स्वतःचे नाव लिहून प्रत्येकाने आपापल्या पुस्तकात काय लिहिले ते सांगितले. त्यांच्या वयानुसार त्यांनी काढलेली चित्रे खरोखरच उत्तम होती. मुलांनी स्वतःचे असे पहिले पुस्तक लहान वयातच तयार केले, हे पाहून पालकांनाही आनंद झाला. प्रीती एरंडे, ईशा जवळगीकर, सायली शिगवण आणि रुपाली निरगुडे यांनी मुलांना मदत केली. उद्याची गंमत काय असेल, याचा विचार करत छोटी लेखक मंडळी घरी परतली.
 
-प्रतिनिधी