नेटभेट -भाग ३

दिंनाक: 09 Apr 2018 15:26:41


मित्रमैत्रिणींनो,

आजचं युग संगणकाचं आहे. गोष्टी सांगायला घरात आजी-आजोबा नसले, किंवा तुमच्या पालकांकडे वेळ नसला तरी तुमचा फावला वेळ मजेत जाऊ शकेल अशा प्रकारच्या अनेक सुविधा आज इंटरनेटवर आहेत.

आज मी तुम्हांला www.wicked4kids.com या वेबसाईटची ओळख करून देणार आहे. या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला Play, Laugh, Think, Create, Talk, New अशा विविध दालनांकडे नेणाऱ्या लिंक्सची बटणं दिसतील. त्यावर क्लिक करून पुढे आत-आत फेरफटका मारा. ही वेबसाईट म्हणजे जणू अलिबाबाची गुहाच आहे. उदा. तुम्हाला जर विनोद आवडत असतील तर Laugh क्लिक करून आत प्रवेश करा. अबब! किती प्रकारच्या जोक्सकडे घेऊन जाणाऱ्या आणखी कितीतरी लिंक्स! काय वाचू? अन् किती वाचू? अशी अवस्था होईल तुमची!

Think या दालनात शब्दकोडी, चित्रकोडी, मेंदूला खुराक असलेली असंख्य कोडी आहेत. प्रसिद्ध बालचित्रपटांवर आधारित प्रश्नमंजुषाही आहेत.

Illusions म्हणजे भ्रामक चित्रांची आगळी गंमतही तुम्ही अनुभवू शकता.

Play या दालनात थेट कॉम्प्युटरच्या पडद्यावरच खेळता येऊ शकतील असे अनेक व्हिडिओ गेम्स विनामूल्य आहेत.

तुमच्या भावविश्वाला साजेशा इतक्या धमाल गोष्टी या वेबसाईटवर खच्चून भरलेल्या आहेत. त्यांची मजा स्वतः तर अनुभवाच, तुमच्या दोस्तांनाही सांगा.

या वेबसाईटवर तुमचा ई-मेल पत्ता कळवून या वेबसाईटचं कायम सदस्यत्वही तुम्ही प्राप्त करू शकता.

कॉमिक्स व खेळ आवडणाऱ्यासाठी एक सुरेख, आकर्षक वेबसाईट आहे. – www.clubpenguin.com  ‘डिस्ने’ चालकांनी तयार केलेल्या या आगळ्या संकेतस्थळावर असंख्य गमतीजमती, खेळ, चित्रं आहेत. Fun-stufl वर क्लिक करताच सुरेख ‘वॉलपेपर्स’ व ‘कॉमिक्स’कडे घेऊन जाणारी दालने दिसतील. तिथल्या Arts & Crafts टॅबवर क्लिक करताच घरबसल्या करता येतील अशा अनेक सचित्र कलाकृती दिसू लागतील. प्रत्येक कलाकृती बनवण्याचे सुयोग्य मार्गदर्शनही तेथे आढळेल. तुम्ही छान छान रंगीत चित्रं रेखाटू शकत असाल व जगभरातील मित्रांनी ती चित्रे पहावीत असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमची ती चित्रं तेथेच submit करण्याची सोय पालकांसाठी येथे खास दालन हे सर्व पाहून तुम्ही या वेबसाईटच्या नक्कीच प्रेमात पडाल व सदस्यत्वही घ्याल. तुमच्या प्रतिक्रिया मलाही अवश्य कळवा...

विविध भाषा शिकण्यासाठीच्या काही वेबसाईट्सविषयी जाणून घ्या खालील लेखात. 

नेटभेट-भाग २

विवेक मेहेत्रे

[email protected]