बदके सुरेख....

दिंनाक: 08 Apr 2018 15:12:33


बदक असा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर लांब चोचीच्या पांढऱ्याशुभ्र पक्ष्यांची रांग तरंगू लागते. आपल्या डोक्यात हे एवढेच काय ते बदकाचे चित्र, त्यांचे वर्णन तयार असते. पण मित्रांनो, आपल्या या परिचित पक्ष्याचे अनेक प्रकार असतात. वेगळ्या जातीच्या बदकांची वेगळी रूपे आणि वैशिष्टे ही असतात. त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...

बदक हा उभयचर पक्षांचा वर्ग... पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी ते संचार करू शकतात. या बदकांच्या अनेक जाती आहेत.

पिनटेल बदक :

भारतात स्थलांतर होणारे हे बदक. रंगाने करडे असणाऱ्या या बदकांना अत्यंत टोकदार असे शेपूट असते. म्हणूनच बहुधा त्यांना पिनटेल असे नाव पडले आहे.

मलार्ड बदक :  

युरोपमधील सायबेरियातील हे स्थायिक पक्षी आहेत. भारतातील पाणथळ जागी या प्रकारातील बदके आढळून येतात. हिवाळ्यात हे स्थलांतर करतात. दिसायला सुंदर असणारी बदकांची ही जात शाकाहारी असते. दलदल आणि कमी खोल जागी राहण्याला पसंती असते. या पक्ष्यांचे खास वैशिष्ट म्हणजे इतर बदकांपेक्षा यांचा उडण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे यांची शिकार करणे हे शिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरते.

स्पॉटबिल किंवा हळदीकुंकू बदक :

कधीही स्थलांतर न करणारे आहेत. भारतात सर्वाधिक आढळणारे हे बदक आहे. तळी, नद्या, सरोवरे ही यांची निवासस्थाने... विदर्भातील पैनगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. खरे तर या बदकांना व्यवस्थित अन्न मिळाले, तर ते एकाच जागी कायमस्वरूपी राहतात. या बदकांना हळदीकुंकू असे वेगळेच नाव का पडले असेल, असा प्रश्न पडतो. या बदकांच्या काळ्या रंगाच्या चोचीच्या बुडाशी पिवळे – नारंगी रंगाचे दोन ठिपके उठून दिसतात. म्हणूनच त्यांना हळदीकुंकू म्हणत असावेत.

शॉव्हेलर बदक :

हेही भारतात स्थलांतरित होणारे बदक आहे. ते सायबेरियातून भारतात येतात.

चक्रवाक किंवा ब्राम्हणी बदक :

हेसुद्धा भारतात आढळणारे स्थलांतरित बदक आहे. तसेच बांग्लादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीनचा काही भाग आणि आफ्रिकेतील इथियोपिया येथे यांचे वास्तव्य आढळते. या बदकांचेही एक वैशिष्ट्य आहे. या प्रकारातील नर आणि मादी हे तलावात जोडीने राहतात.

तसेच इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थित चालू शकतात. पाणवनस्पती, पाणकीटक, गोगलगाई हे यांचे आवडते खाद्य आहे. आता यांनाही ब्राम्हणी बदक असे नाव का? हे काही जातीवाचक नाव नसून एका ठराविक रंगछटेचे इंग्रजी भाषेतील नाव आहे.

गुलाबी डोक्याचे बदक :

भारतात पूर्वी विपुल प्रमाणात आढळणारी ही जात. डोक्यावरच्या सुंदर गुलाबी पिसांमुळे अतिशय सुंदर आणि आकर्षक असा हा पक्षी. त्याच्या याच सौंदर्याने त्याचे अस्तित्व मिटवून टाकले. त्याची सुंदर गुलाबी पिसे सजावटीसाठी आणि मांस खाण्यासाठी यांची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आली आणि २०व्या शतकात ते नामशेष झाले.

तुम्हाला गुगलवर प्रत्येक जातीच्या बदकांची छायाचित्रे पाहता येतील. तुम्ही गुगल इमेजमध्ये जाऊन प्रत्येक जातीप्रकाराचे नाव टाकून शोधून पाहू शकता.

 -प्रतिनिधी 

[email protected]