लहानपणी वैद्यकक्षेत्राचे फार आकर्षण वाटे. तितकेच आकर्षण शिक्षणक्षेत्राचेही वाटे. या दुहेरी आकर्षणातून मला माझी वैद्यक-शिक्षक : Medical Teacher ही कारकिर्द गवसली. गेली 25 वर्षे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सेठ गो.सु. वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच सायन व के.इ.एम. रूग्णालयातील उमलत्या डॉक्टर्सना शिकवताना भरभरून व्यावसायिक समाधान मिळून माझे जीवन समृद्ध झाले आहे.

वैद्यक व्यवसायात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा विविध शाखा असतात. ज्या प्रवेश परीक्षेद्वारा एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. या शाखांचे प्रवेश होतात; त्याच परीक्षेद्वारा दंतवैद्यक (बी.डी.एस.), फिजिओथेरपी, अॅक्युपेशनल थेरपी या अभ्यासक्रमांचेही प्रवेश होतात.

एम.बी.बी.एस. ही आधुनिक वैद्यकातील पहिली पदवी इंटर्नशीप व इस्पितळातील अनुभव घेऊन स्वतःची खाजगी वैद्यकीय सेवा सुरू करता येते. अशा चांगल्या कौटुंबिक डॉक्टर्स, फॅमिली फिजिशिअनची समाजाला खूप आवश्यकता असते. आयुर्वेद व होमिओपॅथी पदवीधरही हा मार्ग स्वीकारू शकतात.

ज्यांना नोकरीचा पर्याय हवा असेल असे डॉक्टर्स सरकारी आरोग्य सेवा, दवाखाने, शालेय आरोग्य योजना, महापालिकेच्या आरोग्य सेवा, इ.एस.आय.एस., आरोग्य विमा कंपन्या इत्यादी ठिकाणी नोकरी करू शकतात. यू.पी.एस.सी.च्या परीक्षांमार्फत निवड झाली तर सी.जी.एच.एम. केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी सरकारी वैद्यकसेवा, केंद्र सरकारच्या आरोग्य संस्थांतील वैद्यकीय अधिकारी, विमानतळ प्राधिकरणातील वैद्यकसेवा व सरकारी आरोग्य सेवातील वैद्यकतज्ज्ञ ही पदे मिळू शकतात. रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यकशास्त्रात एम.डी. किंवा डी.पी.एच. केल्यास सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्रात अतिशय चांगल्या संधी उपलब्ध होतात.

ऑक्युपेशनस हेल्थ या विषयाचा अभ्यासक्रम करून बहुराष्ट्रीय मोठ्या कंपन्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी पदे मिळू शकतात. या व्यतिरिक्त ONGC, BHEL, Western Coal Field अशा कंपन्यांना डॉक्टर्सची आवश्यकता असते.

राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये संशोधकपदे उपलब्ध असतात. सार्वजनिक आरोग्य सेवेत आयुर्वेदिक पदवीधरांनाही वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते.

डॉक्टर्सना रेल्वेत, तसेच संरक्षण खात्याअंतर्गत ऑर्डिनन्स फॅक्टरीत संधी मिळू शकतात. सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा पर्यायही उपलब्ध असतो.

बहुसंख्य डॉक्टर्स पदवी घेऊन न थांबता पदव्युत्तर शिक्षण घेणे पसंत करतात. आपल्या आवडीच्या विषयात एम.डी. किंवा एम.एस. करून विशेषज्ञ म्हणून स्वतःचा व्यवसाय करता येतो. त्याहून पुढे जाऊन डी.एम. किंवा एम.सी.एच. करून अतिविशेष सेवा देता येते. हृदयरोग, जठरांत्र अशा अतिविशेष शाखा किंवा शल्यचिकित्सेत बालशल्यचिकित्सा, सुघटन असे अतिविशेष अभ्यासक्रम निवडता येतात. पदविकांचा पर्यायही अनेक शाखांत उपलब्ध असतो. स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र, बालरोग इत्यादी पासून ते मधुमेह व सार्वजनिक आरोग्यही पदविका मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

विशेषज्ञ झाल्यानंतर स्वतःची खाजगी सेवा, मोठ्या सरकारी किंवा खाजगी रूग्णालयातून सेवा किंवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यक शिक्षक असे अनेक पर्याय असतात. अॅलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदातही एम.डी., एम.एस. असे विशेषज्ञ होण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. इतर पदवीधरांप्रमाणे सनदी सेवेत जाण्याचा पर्याय वैद्यक पदवीधारकांनाही खुला असतो.

इस्पितळ व्यवस्थापन व आरोग्य सेवा व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. इस्पितळ व्यवस्थापन हा पर्याय इतर पदवीधरांनाही उपलब्ध असतो.

अलीकडे आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचे महत्त्व अनेकांना जाणवू लागले असून आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार लोकप्रिय होऊ लागले आहेत. पंचकर्म उपचारांसाठी मेडिकल टूरिझम (वैद्यक सेवा घेण्याकरता दूर अंतरावरून प्रवास करून येणे व उपचार+महत्व असा दुहेरी अनुभव घेणे) विकसित होत आहे.

दंतवैद्यक सेवा (बीडीएस) या विषयांतही खाजगी सेवा, विशेष सेवा (एमडीएस) अशा दोन्हीला वाव आहे. लहान मुलांच्या दंतविशेष सेवा (पीडो डोन्शिया), ऑर्थोडोन्शिया इत्यादी विषयात विशेषज्ञ बनता येते. सध्याच्या सौंदर्याच्या कल्पनांसाठी गुंतवणूक करणाऱ्या समाजघटकात ‘स्माइल डिझाइन’ दंतरोपण इत्यादी सेवांनाही खूप मागणी उपलब्ध आहे. दंतवैद्यकाची गरज प्रत्येकाला कधी ना कधी लागतेच.

आरोग्य सेवेत वैद्यक तज्ज्ञांपेक्षाही जास्त संस्थेने गरज असलेला व्यवसायगट म्हणजे परिचारिकांचा. परिचर्येमध्ये पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीसुद्धा मिळवता येते. शिकवण्याची आवड असेल तर नर्सिंग स्कूलमध्ये सिस्टर ट्यूटर म्हणून संधी असतात. वस्ती पातळीवर काम करायचे असेल तर पब्लिक हेल्थ नर्स, ऑक्सिनरी नर्स मिडवाइफ हे पर्याय आहेत. विशेषज्ञ व्हायचे तर तोही पर्याय आहे. उदा., कॅन्सर परिचर्या. परदेशात प्रसूतीशास्त्र, भूलशास्त्र इत्यादी विषयात तज्ज्ञ परिचारिका उत्तम कारकिर्द करतात.

फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी (ओटी, पीटी) म्हणजेच भौतिकोपचार व व्यवसायोपचार यांची नावे एकत्र घेतली जात असली तरी या दोन वेगवेगळ्या व अत्यंत उपयुक्त शाखा आहेत. विविध आजारांतील पुनर्वसनात या विषयांतील तज्ज्ञांची फार गरज भासते. विशेषतः अस्थिव्यंग शल्य क्रियेनंतर तसेच स्नायू सांधे, हाडांच्या समस्यांमध्ये फिजिओथेरपीचे महत्त्व अनन्य साधारण असते.

वैद्यकीय समाजसेवा (एम.एस.डब्ल्यू.) या विषयाचे प्रशिक्षण निर्मला निकेतन टाटा समाजविज्ञान संस्था अशा संस्थातून होते. प्रशिक्षित वैद्यक समाजसेवक इस्पितळे, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय उपक्रमांतून समाजविकास अधिकारी, समुपदेशक, समाजकल्याण अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत असतात.

स्पीच थेरपीस्ट, ऑडिऑलॉजिस्ट, कर्णबधिरत्व व वार्चसंदर्भातील समस्यांमध्ये स्पीच थेरपिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात.

इस्पितळांमध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणे व यंत्रसामग्री वापरली जाते. ती हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व तंत्रज्ञ आवश्यक असतात. इ.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सी.टी., एम.आर.आय., पी.इ.टी. इत्यादी साठीही तंत्रज्ञ लागतात.

पॅथॉलॉजीसारख्या निदानात्मक शाखांमध्ये डॉक्टर्स व्यतिरिक्त डीएमएलटी, सीएमएलटी केलेल्या तंत्रज्ञानांनाही संधी असतात.

औषधनिर्माणशास्त्र व औषध उद्योगात फार्मसी व फार्मकॉलॉजी या विषयातील तज्ज्ञांना कारकिर्दीच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध असतात. औषध निर्माण, दर्जा, पणन (मार्केटिंग) संशोधन व विकास अशा विविध विभागांमध्ये काम करण्यास वाव असतो.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आणखीही काही संधी असतात. उदा., सॅनिटरी इन्स्पेक्टर्स (S.I. अभ्यासक्रम स्थानिक स्तराज्य संस्था) Mistrolic Local Self Government आरोग्य शिक्षक (अभ्यासक्रम केंद्रीय आरोग्य संस्था उदा., फॅमिली वेल्फेअर अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, चर्नी रोड), बहुउद्देशीय आरोग्य सेवक – Multipurpose worker Health workers - स्त्री व पुरुष इत्यादी.

ज्यांचे शिक्षण जेमतेम 8वी असेल, गृहिणी असतील पण आरोग्य सेवेत रस असेल तर अंगणवाडी सेविका किंवा कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटिअर म्हणून स्वयंसेवी तत्त्वावर काम करता येते.

आरोग्य क्षेत्रात अलीकडे आहारतज्ज्ञांची (Dietician Nutrition) मागणीही वाढत आहे. क्रीडाक्षेत्र व फिटनेस (तंदुरूस्ती) केंद्रात तसेच लठ्ठपणा व मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी लढणाऱ्या रूग्णांना आहारतज्ज्ञांची मोलाची मदत होते.

काही शाखांमध्ये अतिशिक्षित तज्ज्ञांची कमतरता असते, तेव्हा प्रशिक्षित पॅरामेडिक्सचे महत्त्व जाणवते. जसे पॅरामेडिकल ऑप्थॅत्मिक असिस्टंट, डोळ्यांचा नंबर काढणारे रिफ्रॅक्शनिस्ट तसेच प्रशिक्षित नर्सेसची कमतरता भरून काढण्याकरता मोठ्या रूग्णालयात आयव्ही टेक्निशियन्स असतात.

सध्या समाजात वृद्धांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे व भारत Aging Country या व्याख्येत गणला जाऊ लागला आहे. तसेच पक्षाघात व इतर कारणाने अशा रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना फार काळ इस्पितळात भरती करून ठेवता येत नाही. मात्र परिचर्येची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत नर्सिंग एडस् (परिचर्या साहाय्यक) व ते/त्या पुरवणार्‍या संस्था उपयुक्त ठरतात.

खरेतर वृद्धांना त्यांच्या घरी उपचारात्मक सेवा, वैद्यकीय तपासणी व इतर पूरक सेवा पुरवण्याची खूप गरज आहे. आपल्या आधी वृद्ध झालेल्या काही देशांमध्ये वृद्धांना घरच्या घरी जेवण पुरवण्यापासून आंघोळ घालणे, तपासण्या करणे, सोबत देणे, सुरक्षा पुरवणे यासाठी सेवा उपलब्ध आहेत. आपल्याला त्यांची गरज लागणार आहे.

मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन व ट्रान्सलेशन ही आणखी काही नवी क्षेत्रे. विविध भाषांचे ज्ञान असेल तर वैद्यकीय जर्नल्समधील शोध साहित्य अनुवादित करणे (उदा., चीनी (मँडरीज) अथवा जपानी भाषेतून इंग्रजीत)

ज्यांना संगणकात गती आहे, संशोधनाची आवड आहे ते क्लिनिकल ट्रायल्स, वैद्यकीय संशोधनात कारकिर्द करू शकतात. उपयुक्त वैद्यकीय मोबाईल अॅप्स विकसित करू शकतात.

Medical Records - वैद्यकीय अभिलेख जतन करणे, डिजिटल स्वरूपात बदलून साठवणे हा एक वेगळा व्यवसाय आहे.

ज्यांना अभियांत्रिकीत गती आहे पण वैद्यक व्यवसायाबद्दल आस्था आहे ते बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा पर्याय स्वीकारू शकतात. आरोग्य क्षेत्रात, इस्पितळात उत्तम व्यवस्थापकांची गरज असते. तेथे इंजिनिअरर्स, फायनान्स, मार्केटिंग या क्षेत्रांतील ज्ञान असलेले व्यवस्थापकही उत्तम कारकिर्द करतात.

डॉक्टर्स राजकारणात जाऊन मंत्रीपदापर्यंत पोहोचून आरोग्य धोरणावर आपला ठसा उमटवू शकतात.

थोडासा वेगळा विचार केला तर आरोग्यासाठी आज चांगला योग प्रशिक्षकांचीही फार गरज आहे. देशातच नव्हे तर परदेशातही योगतज्ज्ञ आरोग्यासाठी बहुमोल योगदान देऊ शकतात.

ताणतणावांचे व्यवस्थापन करणार्‍या कार्यशाळांना कॉर्पोरेट जगतात चांगला प्रतिसाद मिळतो.

स्वयंसेवी संस्था स्थापन करून गावपातळीवर आदिवासी किंवा शहरी वंचित गटांना आरोग्य सेवा पुरवणे शक्य असते.

भारतातून मोठ्या संख्येने डॉक्टर्स, परिचारिका व थेरपिस्ट परदेशी जात असतात व इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, गल्फ कंट्रीज इत्यादी देशात कारकिर्द घडवतात. त्या त्या देशातील परीक्षा देऊन, परवाने मिळवून ते तेथे काम करतात.

अनेकदा या क्षेत्रात कारकिर्द घडवू इच्छिणारे विद्यार्थी विचारणा करतात, की यांतील कुठली कारकिर्द सर्वोत्तम? या प्रश्‍नाला माझे उत्तर असते की जी आपल्याला आयुष्यभर किंवा खूप वर्षे मनापासून आवडेल असे काम देईल ती आपली कारकिर्द. आपल्या आवडीनिवडी व्यक्तिमत्त्व व गरजा लक्षात घेऊन निवडलेली कुठलीही कारकिर्द आनंददायी असते. तेव्हा तुम्हाला आनंददायी वाटेल अशा कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!

- डॉ. ऋजुता सचिन हाडये

[email protected]