विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच परीक्षा संपणार असतील. सुट्टी लागल्यावर तुम्ही सहलीचे नक्कीच नियोजन करत असाल, तर मग मी एक ठिकाण सुचवतो, ते म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील बांधवगड व्याघ्रप्रकल्प.

बांधवगड हे अभयारण्य मध्य प्रदेशमधील सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान असून उमरिया जिल्ह्यात वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात बंगाली वाघांची संख्या जगात घनत्त्वानुसार सगळ्यात जास्त आहे. हे अभयारण्य वाघांव्यतिरिक्त चितळहरण व बिबट्यांसाठीही प्रसिद्ध आहे. जंगलाच्या मधोमध बांधवगडाची टेकडीमुळे जंगलाचे चार भाग झाले आहेत. या ठिकाणी बांबू खूप प्रमाणात आढळतात. या जंगलातून चरणगंगा नदी वाहते. बांधवगड टेकडीच्या उत्तरेकडील बाजूचे पाणी कधीही आटत नाही. सन 1951मध्ये मोहन नावाचा सफेद वाघ पकडण्यात आला. सीता नावाची वाघीण 90च्या दशकात फोटोसाठी खूप प्रसिद्ध झाली होती, तर चार्जर नावाचा नर वाघ गाड्यांजवळ येऊन खोड्या करायचा. या अभयारण्यात 22 प्रकारचे प्राणी व 250 जातीचे पक्षी आढळतात. बैगा जमातीचे लोक या भागात जास्त प्रमाणात दिसतात. नुकतेच सोशल मीडियावर वाघ आणि मादी अस्वलाची लढाई तुम्हाला बघायला मिळाली असेल. जर तुम्हाला खरोखर जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल, तर बांधवगडला जाच. असे मी सूचवू इच्छितो. अतिशय सुंदर प्राणी व पक्षी बघण्याचा आनंद घ्या, त्याचे कारण उन्हाळ्यात झाडांची संपूर्ण पाने गळून पडतात, त्यामुळे जंगल विरळ होते. त्यामुळे प्राणी-पक्षी सहज नजरेस पडतात; तसेच उन्हामुळे प्राणी-पक्षी पाणवठ्यावर हमखास येतात.

सन 2017मध्ये मी व माझे चार फोटोग्राफर मित्र खास वाघांची छायाचित्र काढण्यासाठी गेलो होतो. वाघांसह अन्य प्राणी व पक्षीसुद्धा बघावयास मिळाले. पुण्यातील एका मित्राने ही सफारी आयोजित केली होती. यापूर्वी जंगलातील प्राणी फक्त प्राणी संग्रहालयातच पाहिले होते, परंतु आता प्रत्यक्षात वाघ व इतर प्राणी मुक्त फिरताना पाहणार होतो. त्यामुळे वाघासारखा प्राणी स्वप्नातही दिसू लागला.

दि. 18 मे रोजी प्रवास करत असताना एक गोष्ट लक्षात आली. जबलपूर ते बांधवगड हा प्रवास जवळजवळ 164 कि.मी. होता. ओसाड जमीन, विरळ लोकसंख्या, आदिवासी लोकांची एकसारखी दिसणारी घरे, रंग पण एकच. तो म्हणजे निळा. बाजारहाट करणारी लोकं, त्यांचा पेहराव, राहणीमान यावरून हे लोक गरीब असावेत, असं लक्षात आलं. संध्याकाळी सातच्या सुमारास बांधवगड गावात पोहोचलो. वनखात्याचे कार्यालय दिसले, वेलकम कमान दिसली, वाघाचे पोस्टर व पुतळे दिसले, लहान आकाराची गोवंश दिसू लागली. रात्रीच्या दिव्यात झगमगाट करणारी हॉटेलं दिसली, शेवटी आमच्या निवासी हॉटेलात पोहोचलो.

दि. 19 मे रोजी आमची पहिली सफारी होती, पहाटे 5:00 वाजता चहा-नाश्ता करून, सगळे जण सफारी गाडीत कॅमेरासह बसलो. सोबत आधारकार्ड. जंगलाच्या प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो. आमच्यासोबत अजून 10-12 सफारी गाड्या तयार होत्या. आधारकार्ड तपासणी झाल्यावर जंगलात प्रवेश केला. सोबत वनखात्याचा एक कर्मचारी व ड्रायव्हरदादा होतेच. दोघांचीही ओळख करून घेतली. आमचीही ओळख करून दिली.

वसंत ऋतूमुळे झाडांना नवीन पालवी फुटली होती. सूर्याच्या सोनेरी, कोवळ्या उन्हात ती अधिक सुंदर व रंगबेरंगी दिसू लागली. उंच उंच वृक्ष व त्यावर अजगरासारख्या वाढत गेलेल्या वेली आमच्या नजरेस पडल्या. कच्च्या रस्त्याने गाडी धुरळा उडवत वेगाने जात होती. उत्सुकता होती ती वाघ दर्शनाची. प्रथम आम्हांला दर्शन झाले, ते एका कोल्ह्याच्या कुंटुंबाचे. नर-मादी उन्हात खेळत होती. कॅमेरा सेट केला होताच. क्षणात त्याची छायाचित्रे काढली आणि पुढच्या मार्गाला लागलो. थोड्या अंतरावर गेल्यावर राष्ट्रीय पक्षी मोर दिसला. अतिशय सुंदर पिसारा फुलवून बांधावर उभा होता. पुढे एक लांडोर आपल्या दोन पिलांसह सफारी गाडीला आडवी गेली. असे जंगली कोंबडे, भारद्वाज, गिधाड, सांबर, चितळ यांसारखे प्राणी-पक्षी नजरेस पडले. बांधवगड टेकडीच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्या ठिकाणी चितळ हरणांचा एक कळप चरत होता आणि त्याच्या मागावर ‘राजबेरा’ नावाची वाघीण शिकारीसाठी टपलेली होती. हत्तीवर बसून काही छायाचित्रकार तिचे फोटो टिपत होते. उंच गवतामुळे ती आम्हांला दिसू शकली नाही. हत्तीवर स्वार झालेल्या लोकांना वाघाचे खूप जवळून फोटो काढता येतात. अडचणींच्या ठिकाणीही हत्ती जाऊ शकतो. सफारी गाडीला मात्र मर्यादा पडतात. अर्थात सफारी गाडीतून जंगलात उतरण्यास सक्त मनाई असते. जंगलातच उपलब्ध असणार्‍या नाश्त्याच्या ठिकाणी भजी व चहाचा आस्वाद घेतला व परतीचा मार्ग धरून वाघाच्या कृत्रिम पाणवठ्यावर पोहोचलो. या ठिकाणी आम्हांला सन ऑफ बमेरा नर वाघ व ज्यु. कनकटी वाघिणीचे तीन छावे नजरेस पडले. जी साधारण सहा महिन्यांची होती. बमेरा नर वाघ हा अतिशय प्रामाणिक पिता असल्याची माहिती आम्हाला गाईडदादाने सांगितली. तर ज्यु. कनकटी मादी आज या जगात नाही, छावे अनाथ झाले.

पाणवठ्यावर जेव्हा वाघ प्रवेश करतो, तेव्हा खरी मजा येते. एखादा सेलिबे्रटी यावा त्याप्रमाणे असंख्य कॅमेरे एकाच वेळी सुरू होतात. हे बघून मनाला हर्ष होतो. या पाणवठ्यावर आम्हांला वानरांची टोळी दिसली, जी पाणी पिऊन पळसाच्या झाडावर आराम करत होती. वाघ येताच ती पळून गेली. या पाणवठ्यावर पक्ष्यांची रेलचेल दिसली. मोर, जंगली कोंबडे, ट्रिपॉय, रॉकेट टेल ड्रोंगो, स्वर्गीय नर्तक, ग्रीनबर्ड यांसारखे काही नवीन पक्षी आमच्या कॅमेर्‍यात कैद झाले. पहिली सफारीची वेळ संपली. हॉटेलच्या गार्डनमध्ये आणखी काही पक्ष्यांची सुंदर छायाचित्रं पक्षी पाणी पीत असताना घेतली.

दुपारी चार वाजता दुसर्‍या सफारीसाठी अभयारण्यात पोहोचलो. एका ठिकाणी ‘सांबर’ ओरडले, ड्रायव्हरदादाने ब्रेक दाबला व आम्हांला शांत बसण्यास सांगितले. 5 मिनिटे झाली असतील; तोच आमच्या सफारी गाडीसमोर ‘डॉटी’ नावाची वाघीण अवतरली. अतिशय सुंदर व लांबलचक शरीर असलेली वाघीण दिसताच, कॅमेराचा खडखडाट सुरू झाला.

परत पाणवठ्याकडे निघालो, तेव्हा चार रानडुक्कर गाडीला वेगाने आडवे गेले आणि ती कॅमेरात कैद झाले. वेळ संपत आली म्हणून आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. इतक्यात एकजण ओरडला ‘थांबा!’ काय झाले असे विचारले असता त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या टेकडीकडे बोट दाखविले. तर त्याठिकाणी एक बिबट्या आमच्याकडे पाहताना दिसला. बिबट्या हा फार लाजाळू असतो म्हणून त्याला ‘जंगल घोस्ट’ असेही म्हणतात. असा आमचा पहिला दिवस खूप लकी ठरला.

सफारीच्या दुसर्‍या दिवशी आम्ही मगधी झोनमध्ये पोहोचलो. पाणवठ्यावर परत तीन छावे दिसले, अन्य ठिकाणी फिरलो. मात्र फारसे काही मिळाले नाही. उन्हाचे चटके सोसत नव्हते.

परतीचा मार्ग धरला वाटेत दिसेल, त्याचे फोटो घेतले यात रानगवे, गरूड, गिधाड, घोरपड असे प्राणी-पक्षी दिसले.

स्थानिक गावात बहुतेक आदिवासी जमातीचे लोक राहात असावेत. बफर झोनमध्ये हे लोक राहतात, तर कोअर झोनमध्ये फक्त वन्य प्राणी. वन खात्याची माणसं गस्त घालताना दिसत होती. हातात एक कुऱ्हाड किंवा काठी फक्त. सोबत सायकल.

दुपारच्या सफारीत आम्ही ताला झोनमध्ये शिरलो त्या ठिकाणी आम्हाला ‘सोलो’ नावाची वाघीण आपल्या महिनाभराच्या पिल्लासह दिसली, जी प्रथम माता झाली होती. याचा प्रचंड आनंद ड्राइव्हरदादा व गाईड यांनी साजरा केला. आम्ही मात्र क्षणाचा विलंब न करता तिचे छायाचित्र टिपले, तिने आपले पिल्लू तोंडात धरले व झाडीत निघून गेली.

आज सफारीचा तिसरा आणि शेवटचा दिवस. वाघाच्या नैसर्गिक पाणवठ्यावर आम्ही हजर. साधारण सकाळी  सातपासून दबा धरून बसलो. उन्हाचे चटके बसत होते. लहानमोठे पक्षी दिसत होते. परंतु, वाट पाहत होतो ती वाघांची. उत्सुकता संपली... स्पॉटी (spoty) नावाची वाघीण आपल्या तीन पिलांसह अवतरली; जी तीन वर्षांची पूर्ण वाढ झालेली होती. प्रथम आई वाघीण आली, नंतर तिची पिल्लं. काय दमदार एंट्री होती त्यांची, लाजवाब! पाणवठ्यावर पाणी पिऊन ती काही वेळ पाण्यात भिजली व झाडांच्या सावलीत निवांत झोपली.

मोठे वाघ बघण्याचा आनंद या दिवशी लुटला. स्पॉटी, डॉटी आणि सोलो या तिन्ही सख्ख्या बहिणी आहेत, असे ड्रायव्हरदादाने सांगितले.

दुपारच्या सत्रात पहिल्या दिवशी न दिसलेली ‘राजबेरा’ नावाची वाघीण आम्हाला तिच्या तीन पिलांसह सांबरची शिकार खाताना, रस्त्याच्या कडेला पळसाच्या झाडात दिसली. कमी प्रकाशामुळे फोटो काढण्यास अडचण येत होती, तरीही रेकॉर्ड शॉट घेतले. परतीचा मार्ग धरला. सांजवेळ झाली होती. हरणाने आवाज केला. आम्ही गाडी थांबवली. आजूबाजूला पाहिले, तर टेकडीवरून एक बिबट्या पाणी पिण्यासाठी खाली उतरत होता. ‘चरणगंगा’ नदीत पाणी पिऊन झाडीत दिसेनासा झाला.

संपूर्ण सहा सफारीत आम्ही 11 वाघ पाहिले, काही अन्य वन्य प्राणी, पक्षी बघून झाल्यामुळे आम्ही खूप आनंदित झालो होतो. आयोजकानेही छान नियोजन केल्यामुळे आमची सफारी यशस्वी झाली होती.

22 तारखेला आम्ही लांब प्रवास करून आपआपल्या घरी सुखरूप पोहोचलो.

या सफारीची उद्दिष्ट -

वन्य प्राणी, पक्षी व अभयारण्याचे निरीक्षण व छायाचित्रण.

* कसे जाल : पुणे ते जबलपूर रेल्वेने, जबलपूर ते बांधवगड चार चाकीने.

* राहण्याची व जेवणाची सोय : हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरन्ट उपलब्ध. एसी रुम.

* जाण्याचे माध्यम : खासगी सफारी आयोजक,  चार महिने आधी बुकींग आवश्यक.

* सफारी आयोजक संपर्क : ऋषिकेश जाधव - 7058199199.

*सफारी वर्णन व छायाचित्र पाहण्यासाठी –http://www.facebook.com/bhushanbhoye123 या फेसबुक लिंकला भेट द्या.

 -भूषण भोये 

[email protected]