लटकू-लटके

दिंनाक: 06 Apr 2018 15:13:41


पावडरच्या डब्याला टेकून आरशात पाहात तो बसला होता.

मग हात पाय ताणून आळस देत तो म्हणाला, ‘‘आमचं सारं आयुष्य या बायकांच्या मागे मागे फिरण्यात जातं. ’’

हे ऐकल्यावर त्याला हसत ‘ते’ म्हणाले, ‘‘मागे फिरण्यात नव्हे; तर मागे लटकण्यात जातं, असं म्हणायचं असेल तुम्हाला?’’

तो सुवासिक हसत म्हणाला, ‘‘व्वा! अगदी बरोबर. पण तुम्ही कसं काय ओळखलंत?’’

‘‘अहो, आम्हीपण तुमच्या सारखेच ना? लटकू लटके, बिलकूल हटके!!’’

तो फुसफुसला, ‘‘हो, पण तुम्ही असता दोघे. मी बिचारा एकटाच!’’

‘‘म्हणजे, तुम्हाला काहीच माहीत नाही तर.. अहो आम्ही जरी दोघे असलो, तरी ‘दोन डूल शेजारी, तरी भेट नाही संसारी’ अशी आमची अवस्था.’’

हे ऐकल्यावर श्री. गजरे भाऊ चाटच पडले.

डूल म्हणाले, ‘‘अहो, एका जागी तुम्ही स्वस्थ बसावं आणि उगाच चुळबूळ करू नये; म्हणून तुम्हाला म्हणे बायका पिना मारतात?’’

‘‘एकदम खरं! पण... अर्धच खरं.!!

डूल किणकिणले, ‘‘आता हे काय?’’

गजरा सैलावला. म्हणाला, ‘‘या माणसांच्या बोलण्याला काही ताळमेळ नाही! हे तुम्हाला कळलंय कधी?’’

‘‘अहो, आम्हाला कळणार नाही तर कुणाला कळणार? त्यांची प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांच्याच कानाला लोंबकळत ऐकतो!’’

‘‘या बायका आम्हाला पिना टोचतात! पण काही शिकल्या-सवरलेल्या बायका आमच्यात मोठ्या पिना खुपसतात आणि त्याला ‘आकडा’ म्हणतात!! खरं सांगतो, हे ऐकूनच मला ‘आकडी’ येते.’’

हे ऐकल्यावर डूल जोरजोरात किणकिणू लागले!

गजरे भाऊ कुरकुरत म्हणाले, ‘‘या बायकांची एक गोष्ट मला समजत नाही. या बायका डोक्यावर कुठल्यातरी खतरनाक वासाचं तेल थापतात आणि त्यावर मंद सुगंधी फुलांचा गजरा टोचतात. व्हेरी डिस्गस्टिंग!’’

‘‘आँ? यात न समजण्यासारखं काय आहे? कमालच आहे तुमची!’’

‘‘अहो, डोक्यावर कितीही तेल थापलं आणि डोचक्यात भाराभर फुलं माळली, तरी त्याचा काही स्वत:ला वास घेता येत नाही म्हंटलं. त्यात आमची प्रकृती सुगंधी आणि नाजूक. त्या तेलाच्या खतरी वासाने आणि पिना टोचल्याने आमच्यातली निम्मी फुलं तर जागीच बेशुद्ध पडतात! उरलेल्या फुलांची पाठ त्या बायकांच्या खराटा छाप केसांवर घासून घासून सोलून निघते!! काही जणींची चुळबूळ इतकी असते की, आमच्यातली काही फुलं पिना खात खात त्यांच्या केसभूमीवर आपला प्राण सोडतात.

पण.. .. ..

.. या फुलांचं बलिदान व्यर्थ जात नाही!!’’

‘‘गाल रे गाल! भयानकच तुमचे हाल!! म्हणजे..? म्हणजे काय होतं काय नंतर..?’’

‘‘तुम्हाला म्हणून सांगतो; पण बाकी कुणाला सांगू नका. जेव्हा बायकांच्या केसात फुले अखेरचा श्वास घेतात, तेव्हापासूनच त्या बायकांचे केस टपाटपा गळायला लागतात!’’ हे बोलताना गजर्‍याला खूप गहिवरून आलं.

त्याची काही फुलं कोमेजली. तर काहींच्या पाकळ्या आखडल्या.

डूल त्याला समजावत म्हणाले, ‘‘इतकं काही अस्वस्थ व्हायचं कारण नाही. तुला माहीतच आहे, दिवसभर आम्ही त्यांच्या कानात लोंबकळत असतो.’’

‘‘इतकंच काय, आम्ही बायकांच्या ‘हा’ ला ‘हा’ आणि ‘ना’ ला ‘ना’ ही करत असतो!! त्यांच्या बॉडीलँग्वेजशी आम्ही अगदी एकरूप झालेलो असतो! तरीपण या बायका... आम्हाला मानसिक त्रास देतात!’’

‘‘म्हणजे..? काय करतात काय?’’

‘‘आमचं कुटुंब तसं मोठं आणि टिकाऊ आहे. एका मोठ्या चपट्या डब्यात किंवा कपाटाच्या कोपर्‍यात आम्ही सुखाने राहातो. पण यांच्यामुळे आमच्यात अनेक गैरसमज निर्माण होतात.’’

‘‘अजूनही मला नीटसं कळलं नाही. गैरसमज.. म्हणजे? अरे, कपडे बदलल्यावर त्या आमच्या घराजवळ येतात. मग आमच्या कुटुंबातील एकेकाला हातात घेऊन त्या म्हणतात, ‘‘हा या साडीवर जात नाही.

हा या ड्रेसवर जात नाही.

हा जरा लाउड आहे.

हा तर चंपूच आहे.

याची तर अगदी रयाच गेलीय.

हा तर अगदी फेकून द्यायच्या लायकीचा आहे.

आणि..  आम्हाला देतात टाकून खाली.

खरं म्हणजे, आम्ही त्यांच्याकडे जायला तयार असतो, उत्सुक असतो. पण यांचीच मिजास!

आमच्याविषयी असं खोटंनाटं बोलल्याने आम्हाला मानसिक त्रास होतो. एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होतात. मग खाली पडल्यावर...माझ्या तारा कुणा लहानग्याच्या नाकात जातात किंवा मणी माझ्याच बहिणीच्या तोंडात! हा त्रास वेगळाच! ‘मॅचिंगचा बाऊ, नको रे भाऊ’ असं म्हणतात ते काय उगाच?’’

गजरा फूल उडवत म्हणाला, ‘‘तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ‘मॅचिंगचा घोळ झाला की कान ओघळतात!’ अशी एक चिनी म्हण आहे. आज ना उद्या त्यांना अक्कल येईल.’’

डूल किणकिणत म्हणाले,

‘‘कधी कधी वाटतं..

पुढच्या जन्मी माळ व्हावं

आणि

यांच्या गळ्यात पडावं.

सगळ्या कुटुंबानं एकत्र नांदावं!’’

गजरा हसत म्हणाला,

‘‘व्वा!

आम्ही तर ठरवलंय..

पुढच्या जन्मी मागून पुढे यायचं.

हार व्हायचं!

गळ्यात पडून हरखून जायचं!!’’

फेसाळे कुटुंब घरातल्या मोठ्या मोठ्या माणसांच्या तोंडाला सकाळी सकाळी फेस तरी आणतं किंवा त्यांच्या कानाखाली तरी सणकवतं! 

वाचा फेसाळे कुटुंबीयांबद्दल अधिक खालील लिंकवर 

फेसाळे कुटुंबीय

-राजीव तांबे

[email protected]