कागद वाचवा...

दिंनाक: 05 Apr 2018 15:17:19


शाळेत असताना मधल्या सुट्टीत किंवा ऑफ पिरिएडला कागदी विमाने तयार करून ती एकमेकांवर मारण्याचा खेळ आपण प्रत्येकाने खेळलेला असतो. ही विमाने तयार करण्यासाठी वह्यांचे कागद फाडले जातात. कधी कंटाळा आला तर वहीच्या मागच्या कोऱ्या पानांवर पेनाने रेघोट्या ओढणे किंवा चित्रे काढणे, असे उद्योग करताना आपण किती कागद फुकट वाया घालवत असतो, याचे आपल्याला भानच नसते.

हस्तकलेच्या तासाला एखादी वस्तू जास्तीत जास्त सुबक बनवता यावी म्हणून आपणच स्टेशनरीच्या दुकानातून रंगीबेरंगी कोरे कागद खरेदी करतो. त्या कागदाची छान वस्तू बनविण्यासाठी चिकटवल्या जाणाऱ्या निरुपयोगी गोष्टींची त्यात भर असते. पण एकदा त्या वस्तूला गुण मिळाले की, घरात नाहीतर शाळेत ती वस्तू धूळ खात पडते. पाकिटात जमा झालेली बसची तिकिटे, विकत घेतलेल्या सामानाच्या पावत्या, वापरलेल्या वह्या, जुनी वृत्तपत्रे आणि मासिके याव्यतिरिक्त जमा होणारे कागद आपण फाडून फेकून देतो. कागद हा प्लास्टिकसारखा अविघटनशील पदार्थ नसल्यामुळे रस्त्यात जमा झालेल्या कागदाच्या कचऱ्याची आपल्याला फार पर्वा नसते.

पूर्वी आपले आई – वडील, आजी – आजोबा कागदाचा वापर बेतानेच करीत असत. बहुतेकदा वाणसामानात आलेला कागद, वृत्तपत्रांचे कागद, वह्या असे मोजके कागद जमा होत. दरवेळी नव्या कोऱ्या कागदांच्या वह्या वापरायला घेण्यापेक्षा वहीतील जुन्या कोऱ्या कागदांच्या वह्या तयार करून वापरल्या जात. आता मात्र अशा प्रकारची काटकसर कोणीच करत नाही. शाळांमध्येही प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र आणि नव्या वह्यांसाठी आग्रह असतो.

आज आपल्याला कागद उपलब्ध होण्याचे असंख्य मार्ग खुले झाले आहेत. मात्र एक गोष्ट आपण विसरूनच जातो, ती म्हणजे कागद तयार करताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. जेवढा कागदांचा वापर, तेवढे त्यांचे उत्पादन जास्त आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडांचे प्रमाणही जास्त. त्यामुळे कागदाच्या वापरात काटकसर आणि कागदांचा शक्य तेवढा पुनर्वापर कसा करता येईल, हे पाहावे लागेल.

मुंबईतील एका महाविद्यालयाने वहीची कोरी पाने वाचविण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला होता. जुन्या वह्यांचे कागद व्यवस्थित बाईंड करून अशा तयार केलेल्या अनेक वह्या गरीब मुलांमध्ये वाटल्या. अशा उपक्रमांबाबत शाळा, महाविद्यालये, शिक्षक – अध्यापकवृंद यांनी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणजे लहानपणापासूनच मुलांना कागद वाचवायची सवय लागेल.

कागद जाळून कार्बन तयार होतो व त्याचे कण वातावरणात पसरतात. त्यामुळे कागद जाळण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करावा. काही कागदांपासून पुन्हा नवीन कागद तयार करता येतात. पुननिर्माण केलेल्या अशा कागदांचा वापर करावा. रद्दीमध्ये निव्वळ वृत्तपत्रे न देता इतरत्र जमा झालेले छोटे कागद एका पुठ्ठ्याच्या डब्यात जमा करून तेही पुननिर्माणाच्या प्रक्रियेसाठी देता येतील. खरे तर कागदाच्या पुननिर्माणाच्या प्रक्रियेसाठी रोज ५०० टन रद्दी जमा करावी लागते आणि तीही जमा होत नाही.

आजकाल दैनंदिन कामात संगणकाचा वापर वाढल्यामुळे कागदाचा कमीत कमी वापर करण्यास मदतच होते. आपल्याला हवा असलेला मजकूर संगणकावरच ऑपरेट करून सेव्ह करता येतो. आपल्याला हवे तेव्हा तो उघडून वाचता किंवा त्यात बदल करता येतो. ई-मेल किंवा अन्य माध्यमांद्वारे तो दुसऱ्या व्यक्तीला पाठवता येऊ शकतो. मात्र मजकुराच्या विनाकारण प्रिंट आऊट्स काढल्या तर पुन्हा आपण जुन्याच मार्गाने चालल्यासारखे असेल. त्यामुळे आवश्यकता असल्याशिवाय प्रिंट आऊट्स काढणे टाळावे. कागदच छापला न गेल्याने त्यासाठी लागणारी ऊर्जा, शाई, वेळ या गोष्टींचीही बचत होते. कार्यालये पेपर-फ्री ठेवता येतात.  

-प्रतिनिधी

svapp2016 @gmail.com