सोनटक्का

दिंनाक: 04 Apr 2018 15:10:09


सोनटक्का या फुलाचा भारतीय वंश, झुडूपवर्गीय व सदाहरित वनस्पती साधारणपणे दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी ही सहज आढळते. याचे शास्त्रीय नाव हेडीशियम कॅारोनॅरियम. ती, हळद, आले, कर्दळ या कुळातील आहे. हे लहान नरम, फुलझाड आहे. उंची १ ते २ मीटरपर्यत हेडीशियम या प्रजातीत असलेल्या ५० जातींपैकी भारतात सुमारे २५ जाती कोकण, कारवार, सह्याद्री, तसेच श्रीलंका, मलाया येथे आढळतात.

फुले सौम्य, मधुर, सुगंधित, लांब देठाची, खूप नाजूक पाकळ्यांची असतात. त्यांना हात लावायलाही भीती वाटते. त्याच्या आकार- फुलपाखरासारखा असतो, म्हणून त्याला बटरफ्लाय जींजर लिली म्हणतात. ही फुले खाली नळीसारखी आणि वर पसरट असतात. त्याच्या तीन पाकळ्या जेथे मिळतात, तेथे थोडी पिवळसर झाक असते. परागकणांची ती पिशवी छान दिसते. फुले संध्याकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजतात. या फुलांपासून सुगंधी द्रव्य तयार करतात. पुष्पौषधीमध्येही या फुलांचा वापर होतो. अगरबत्ती, साबण सौंदर्य प्रसाधने बनविताना या द्रव्याचा उपयोग केला जातो. ही फुले नाजूक असल्याने त्याच्या कळ्यांच विक्रीसाठी आणाव्या लागतात.

त्याचे फळ- लंबगोल(बोंड) असून केशहीन, त्यात अनेक बीजे असतात. हवाई बेटे येथे फुलातील अत्तर काढतात. त्याला सौम्य, सुखद वास येतो. फळ फुटून तीन शकले होतात.

सोनटक्क्याचे खोड जमिनीत अनेक वर्षे जगणारे, मांसल जाड, आडवे वाढणारे असते. जमिनीवर सरळ पानांसह उभे, बारीक पण मजबूत खोड येते. पाने साधी एकाआड एक, हिरवीगार बारीक पण लांबट असतात. मोठी पाने दोन रांगात असतात. खोडावर पाने एकमेकांच्या समोरासमोर असतात. त्यांची माशाच्या काट्यासारखी रचना असते.

कंदापासून नवीन रोपांची निर्मिती केली जाते. कंदापासूनही सुगंधी तेल काढले जाते. त्यांचाही औषधात वापर होतो. म्हणजे पाने, फुले, कंद हे याचे औषधी भाग आहेत. दुर्मीळ पिवळा सोनटक्का कमीच ठिकाणी दिसतो. बागेत याची  लागवड शोभा व सुगंधित फुलझाड म्हणून होते. फेब्रुवारी - एप्रिलमध्ये लागवड याची लागवड करावी. त्यासाठी मोठी कुंडी घ्यावी. प्रखर ऊन हवे. कमी सूर्यप्रकाशातही याची वाढ छान होते. पाणी नियमित थोडे जास्त लागते. अशा वेळी तांदूळ, डाळ, भाजी धुतलेले पाणी घालू शकता. याला पोयट्याची माती आणि कुजलेले खत आणि शेणखत थोडे घालावे. लागवड केल्यावर पुढे चार महिन्यात फुले येतात. फुले देठाजवळून तोडावे. एका दांड्यातून वीस - पंचवीस फुले नेहमी मिळतात. हिवाळ्यातही काही वेळा फुले मिळतात. एकदा सर्व फुले येऊन गेली की, दांडा पानासहित कापावा. त्याच कुंडीत त्याचे तुकडे करून टाकावे. याला जमीन पाण्याचा निचरा होणारी हवी. पूर्ण वाढ झालेल्या झाडाचे कंद लागवडीसाठी ठेवावेत. कंदाजवळची पाने तोडू नयेत. पाने पिकून गळून पडली की, कंद काढावेत, ते थंड जागेत ठेवावेत. ते लगेच लावता येत नाहीत, त्यांना विश्रांती हवी असते, म्हणजेच त्यांची ती सुप्तावस्था असते. कंदाच्या उंचीच्या दुप्पट खोली लावायला नको. कंद जास्त खोल गेला, तर कुजतो किंवा त्याला फुले येत नाहीत.

सोनटक्क्याच्या सुकलेल्या खोडांचा कागद निर्मितीत उपयोग होतो. जमिनीतील खोडात आरारूट वनस्पतीसारखा स्टार्च असतो. रांची (झारखंड) येथील मुंडा लोक खोडाचे चूर्ण तापावर देतात. तो काढा संधिवातरोधक, पौष्टिक व उत्तेजित करणारा असतो. इंडोनेशियातील मोलूकू बेटात काढा गुळण्या करण्यासाठी उपयोगात आणतात.

गजरे, हार, वेण्या बनविण्यासाठी वापरलेल्या जाणाऱ्या तगर या फुलाविषयी वाचा खालील लेखामध्ये

तगर

- मीनल पटवर्धन

[email protected]