‘भाषा’ हा केवळ विषय नसून ते सर्व विषयाचे माध्यम आहे. हा विचार करून जिल्हा परिषद केंद्रशाळा, मत्रेवाडी, ता. पाटण, जि. सातारा येथील सचिन कुंडलिक देसाई यांनी मराठीसाठी ‘शब्दतारका संच’ आणि इंग्रजीसाठी ‘वर्ल्ड ऑफ वर्ड’ असा उपक्रम राबवला आहे. इ. १लीपासून राबवता येणारा हा उपक्रम नांदेड, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, परभणी, सांगली, अकोला अशा २७ जिल्ह्यातील शाळांनी आपल्या शाळांमध्ये यशस्वीपणे राबवला आहे. या उपक्रमामध्ये बाराखडीच्या क्रमबद्धतेने एकूण १२ भागांत रचना आहे. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला प्रथम त्या गटातील अक्षरांची ओळख होते. अक्षर ओळख झाल्यावर प्रत्येक अक्षर व त्या अक्षरापासून बनलेले सर्व परिचित शब्द ‘शब्दतारका’ संचामध्ये आहेत. शब्द वाचनाचा पुरेसा सराव झाल्यावर शब्द, वाक्य आणि वाक्यांचे डोंगर बनवून सराव घेतला जातो. या शब्दतारका समूहांचे ९ भाग असून, प्रत्येक भागात किमान हजारपेक्षा जास्त शब्दांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे शब्दसंपदा तर वाढतेच, शिवाय स्वरचिन्हांचा योग्य वापर, भाषा शुद्धतेचा अभ्यासही सुलभ होतो. मराठी वाचनाची तसेच इंग्रजी वाचनाची गती वाढते. इंग्रजीचे ‘वर्ल्ड ऑफ वर्ड्स’ हा उपक्रम इंग्रजी अल्फाबेटप्रमाणेच आहे. तीन भागात असलेले हे साहित्य यु-ट्यूबवरूनही डाउनलोड करता येते. अध्ययनाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर मुलांना तंत्रज्ञानाचीही आवड निर्माण होते. पाठ्यक्रम बदलला तरी भाषेच्या पायाभूत तयारीसाठी हा उपक्रम उपयोगी ठरतो. अध्ययन कार्डांचे झेरॉक्स काढून लॅमिनेशन करूनही उपक्रम राबवता येतो. तसेच याचे सॉफ्टवेअर असून त्याचाही सहजपणे वापर करता येतो. संदर्भचित्रे, संगीत आणि इफेक्टस् यांमुळे आनंददायी शिक्षण होते. तसेच सचिन कुंडलिक देसाई यांनी www.desaisachin.blogspot.in नावाचा ब्लॉग चालू केला असून एक वर्षांत ९ लाखापेक्षा अधिक लोकांनी त्यास भेटी दिल्या आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषांच्या किमान अध्ययन क्षमता विकसीत होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भाषेची गोडी लागण्यासाठी केलेल्या नवोपक्रमाबद्दल सचिन कुंडलिक देसाई यांना २०१८ साठीचा भाषा विभागातील ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

-रुपाली निरगुडे 

[email protected]