कळी उमलताना

दिंनाक: 29 Apr 2018 14:54:57


सुजाता लेले आपल्या परिचयाच्या आहेतच. अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असतात. याच पूर्व प्रकाशित कथांचा ‘कळी उमलताना' या संग्रहात एकून ५४ कथा आहेत. प्रत्येक कथेतून वेगवेगळ्या विषयावर भाष्य करून मुलांमधे सामजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखिकेने केलेला दिसतो.

पौगंडाअवस्थेतील ही मुले मोठी होत असताना आजूबाजूचे आचार-विचार घेऊनच मोठी होत असतात. पण आपल्या वागण्याचा या वाढणाऱ्या मुलांवर कसा परिणाम होत आहे, हे बऱ्याचदा मोठी माणसे विसरुनच जातात. तेव्हा मात्र अशा पुस्तकांचा फार उपयोग होतो. बऱ्याचदा या वयात मुले एकमेकांशी नको असलेली स्पर्धा करत असतात. एकमेकांच्या गुणांमुळे असुरक्षित वाटून घेतात. आपला मित्र आपल्यापेक्षा खूप हुशार आहे. आणि म्हणून सर्वजण त्याचेच कौतुक करतात, हे बऱ्याच मुलांना असुरक्षित वाटण्याचे कारण असते. अशा वेळी नको ती सुडाची भावना मानत येऊन जाते. अशा नाजूक विषयाला देखील लेखिका हळूवारपणे हाताळताना, ‘संक्रांतीचा हलवा’ ही कथा रोजच्या आयुष्यातलं उदाहरणं देऊन सांगते आणि चांगल्या-वाईटातलं महत्त्व पटवून देते. ‘पर्यावरणपूरक भोंडला’ या कथेत छोट्या छोट्या मैत्रिणी, आजीने सांगितलेली घटस्थापनेची गोष्ट आठवून तुळशीचे आणि गवती चहाचे रोप स्वतः लावतात. असा वेगळा विचार खरं तर सर्वांनीच करायला हवा ना!

सुजाता लेले यांच्या कथा फक्त मानवी नाते संबंधावरच भाष्य करत नसून प्राणी, पक्षी आणि निसर्गाशी आपले असलेले अनमोल नाते आपल्याला दाखवून देते. निसर्ग आपल्याला खूप काही देतो तसेच आपण निसर्गाला काही देऊ शकलो नाही, तरी किमान आपण त्याला हानी तरी पोहोचवू नये, हे त्या कथेतून पटवून देतात. पाळीव प्राणी देखील आपल्याला माणसाएवढाच लळा लावू शकतात. तसेच आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाहीत, हे मनी नावाचं गुणी बाळ या कथेतून लक्षात येतं.

आपल्या घरातील आजी-आजोबा आपल्याला नेहमी चांगलं-वाईट सांगत असतात. तसेच प्राण्यांमध्ये देखील असे आजी -आजोबा प्राणी असतात. आणि ते छोट्या प्राण्यांना चांगल्या-वाईट गोष्टी समजावून सांगत असतात. तर तुम्ही ‘जंगलातील अनोखी होळी’ ही गोष्ट वाचली की तुम्हाला ते नक्की पटेल!

आता सुट्टी हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. तेव्हा सुट्टीत देखील कोणी सूचना केलेल्या मुलांना अजिबात आवडत नाही. पण ‘सुट्टी मजेत घालवताना’ ह्या कथेतून लेखिकेने साधलेला संवाद आणि सांगितलेले खेळाचे महत्त्व तुमची सुट्टी आणखी मजेत घालवायला नक्कीच मदत करेल.

या पुस्तकात पाल्यांसोबतच पालकांशीदेखील ‘मैत्री कोणासारखी कराल’ या लेखातून लेखिकेने संवाद साधला आहे. याठिकाणी मानव आणि निसर्गाच्या मैत्रीचे उदाहरण दिले आहे. आपण निसर्गाला आपल्या स्वार्थापोटी बरीच हानी पोहोचवली असली तरी निसर्ग कधीच आपल्यासोबत फटकून वागत नाही. पण आपण मात्र त्याच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन नैसर्गिक साधनसंपत्ती उध्वस्त उ करत आहोत. ‘पंचमहाभूतच आली मदतीला धावून’ या कथेतून एका माणसाच्या चुकीमुळे जंगलातील कितीतरी छोट्या-मोठ्या प्राण्यांना त्रास होऊ शकतो हे लक्षात येते.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ‘अंगठ्यावीणा’, ‘आगळी-वेगळी दिवाळी, भूतदया आणू आचरणात’, ‘मोलाचा सल्ला’, ‘फसवी मैत्री नकोच’, ‘आतला आवाज ऐका’ अशा सर्वच कथा आपल्याला काही ना काही सकारात्मक संदेश देतात.

डॉ. रंजना दाते यांनी अतिशय समर्पक शब्दांत या पुस्तकाची प्रस्तावना मांडली आहे. तर अमोल बेलोकर, ईशा पुसाळकर आणि दीपक संकपाळ यांनी काढलेली या पुस्तकातील सर्व चित्रे फार बोलकी आहेत.

पिढ्यांमध्ये, नात्यांमध्ये आणि निसर्गासोबत वाढत असलेले अंतर कमी करून जवळीक साधणारे हे पुस्तक सर्व मित्र-मैत्रिणींनी नक्की वाचवे.

-ज्योती बागल

[email protected]