नमस्कार, शिक्षणविवेक आयोजित प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिबिराचा आज शेवटचा दिवस. तरीही आज सर्वजण खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते. सुरुवातीला ‘पप्पडम पायसम’ हा एकाग्रतेवर आधारित नवीन खेळ रुपालीताईने शिकवला. त्यानंतर सर्वांना परिचित असलेला ‘संगीत खुर्ची’ हा खेळ खेळण्यात आला. या खेळात मुले खूपच रमली होती. आजचे सत्र म्हणजे आपल्या आवडत्या वस्तूविषयी माहिती सांगण्याचे होते. आदल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आपापल्या आवडीच्या वस्तू आणल्या होत्या. प्रत्येकजण आपल्या वस्तूबद्दल भरभरून बोलत होते. आवडीच्या वस्तूविषयी सर्वांना सांगताना वस्तूविषयीची आपुलकी मुलांच्या बोलण्यातून लक्षात येत होती. वस्तूचे वैशिष्ट, त्याचा रंग, त्याचा उपयोग असे एक ना अनेक पैलू समजत होते. चेंडू, गोष्टीचे पुस्तक, बाहुली, घोडा, टेडी बेअर, रोपटे, बदाम अशा प्रत्येकाच्या आवडत्या वस्तू आज पाहायला आणि त्याबद्दलची माहिती ऐकायला मिळाली.
पुढचे सत्र म्हणजे ‘खाऊ करू, खाऊ खाऊ’. या सत्रात मुलांनी सर्वांच्या आवडीचे सॅंडविच बनवले. ब्रेड, काकडी, टोमॅटो, चीझ, बटर, सॉस असे साहित्य समोर दिसताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले. सावकाशपणे आणि मनापासून सर्वांनी सॅंडविच बनवले. स्वतः बनवलेले सॅंडविच खाताना मुलांना खूप मजा येत होती. आज पालकांसाठी बालक-पालक उपक्रम होता. सॅंडविच तयार होत असतानाच पालकही शिबिरात हजर झाले. मुलांनी बनवलेले सॅंडविच खाताना पालकांना कौतुक वाटत होते. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम सुरू झाला. समारोपात शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी शिक्षणविवेकबद्दल माहिती सांगून शिबिरातल्या ताईंची ओळख करून दिली. मुलांनी शिबिरात केलेले सर्व उपक्रम पालकांना सांगितले. अमृता साठे, नमिता दाबक, रश्मी बहुलकर, गोवंडे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सगळ्याच पालकांनी ‘मुलांना शिबिर खूप आवडल्याचे’ सांगितले. तसेच यापुढेही शिक्षणविवेक आयोजित सर्व उपक्रमात सहभागी होण्याविषयी सहमती दर्शविली. शिक्षणविवेक, कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी पालकांशी संवाद साधला. शिक्षणविवेक प्रकाशित गोष्टींच्या मालिकेचा उल्लेख करत त्या गोष्टींचे वैशिष्ट्य या वेळी सांगितले. सर्व मुलांनी शिबिराच्या दिवसात केलेल्या सर्व वस्तू त्यांना देण्यात आल्या. शिबिर चालू असलेल्या ऐतिहासिक वास्तूची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थी आणि पालक यांना स्वा. सावरकर अध्यासन केंद्राद्वारे ‘विदेशी कपड्याच्या होळी’चा लघुपट दाखवण्यात आला. विदेशी कपड्याच्या होळीचे स्मारक पाहात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत शिबिराचा समारोप झाला.
-प्रतिनिधी