नमस्कार, आज शिबिराचा पाचवा दिवस. रोज नवनवीन खेळ खेळायला आणि छान उपक्रम करायला मिळाल्यामुळे आज काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी 'जोडीदार शोधा' आणि 'साखळी' हे दोन नवीन खेळ शिकवले. जोडीदार शोधतानाची सावधानता आणि साखळी खेळतानाची संघवृत्ती या वेळी लक्षात येत होती. खेळ खेळून झाल्यानंतर रुपालीताईने गेल्या चार दिवसात आपण कोणकोणते उपक्रम केले, कोणते खेळ खेळलो याबद्दल मुलांशी संवाद साधला. आज मुलांसाठी 'पाहुणी' आणि 'लिटल बिग जॉर्ज' या दोन लघुपटांचे आयोजन केले होते. 'पाहुणी' हा पहिला लघुपट बघितल्यानंतर रुपालीताईने लघुपटावर चर्चा घेतली. मुलांना या लघुपटातून 'तुम्ही काय शिकलात?' 'काय आवडलं' असे प्रश्न विचारले. मुलांनी अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली. त्यानंतर 'लिटल बिग जॉर्ज' हा दुसरा लघुपट मुलांनी बघितला. या लघुपटातील जॉर्ज त्यांना काहीसा त्यांच्यासारखाच भासत होता. हा लघुपट बघितल्यानंतर शिक्षणविवेक कार्यकारी संपादक  अर्चना कुडतरकर यांनी मुलांना प्रश्न विचारले. लघुपटातील पात्रापासून अनेक घटनांवर चर्चा झाली. लघुपट बघून झाल्यानंतर रुपालीताईंनी शिक्षणविवेकच्या अंकातील राजीव तांबे यांचा 'लिहा-लिही' हा खेळ घेतला. फुगा उडवून इंग्रजी मुळाक्षरे लिहितांना मुलांची खूप तारांबळ उडाली. प्रयत्न करत मुलांनी खेळाची मजा घेतली. लघुपटाची आणि खेळाची चर्चा करत आजचा दिवस संपला.
- प्रतिनिधी