नमस्कार, नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि मस्त खेळ खेळायचा उन्हाळी शिबिराचा आज चौथा दिवस. आज आल्याल्याच मुलांनी खेळायला सुरुवात केली होती. त्यांचा आवडता 'पोस्टमन' हा खेळ खेळून आजच्या सत्राला सुरुवात झाली. 'पुस्तक माझे' , 'रंग-रांगोळी' आणि 'पपेट शो' या सत्रांनंतर आज 'बनवू शिल्पे' या सत्राचे आयोजन होते. न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील कलाशिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी हे सत्र घेतले. सुरुवातीला सरांनी मातीचं नावं, त्या मातीपासून काय काय शिल्पे बनवतात हे सांगितलं. मातीकामाच्या साध्या आणि सोप्या वस्तू सरांनी मुलांना शिकवल्या. गुलाबाचे फुल, टेडीबेअर, कासव, कॅडबरी या वस्तू बनवल्या. मग गोलाकार बसल्यावर प्रत्येकाला एक-एक मातीचा गोळा देण्यात आला. आणि सरांबरोबर मुलांनी त्या गोळ्याच्या वस्तू बनवल्या. मुलं अगदी मन लावून, लक्ष देऊन शिल्पं बनवत होती. दिसायला सोपी असणारी शिल्पं बनवताना लक्षात येत होते की, प्रत्येक आकार किती काळजीपूर्वक द्यावा लागतो. शिल्पं बनवून झाल्यावर रुपालीताईने मुलांना 'चिमणीउडी',  'balancing balloon' आणि 'लक्ष द्या आणि चापट मारा' हे नवीन खेळ शिकवले. फुग्याच्या खेळामध्ये सर्वजण एकमेकांना खूप प्रोत्साहन देत होते. मग आपण बनवलेल्या छान छान वस्तू नीट जपून ठेऊन सगळे आपल्या घरी गेले.
-प्रतिनिधी