नवीन भाषा शिकण्यातली मजा काही औरच असते. ती भाषा जर आपल्याला अनोळखी असेल तर मजा आणखीनच वाढते. तोच अनुभव आपल्याला ‘आमच्या गोष्टी : मराठी-पावरी’ या वर्षा सहस्रबुद्धे लिखित पुस्तकामुळे घेता येणार आहे. या पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येते की आपल्याला ‘पावरी’ भाषा शिकता येणार आहे, ती ही मराठीतून. दहा पुस्तकाच्या या संचात ‘बाजाराला जाऊ’, ‘चांदणी आली’, ‘झाडंच झाडं’, ‘साप...साप...’, ‘काय आवडतं?’, ‘आमचं घर’, ‘लहानी’, ‘करडी’, ‘माझं गाव’, ‘भाकरी फुगली’ या विषयांचा समावेश आहे. या दहाही पुस्तकांमधला आशय वाचनीय आहे. त्यातून आपल्याला आदिवासी समाजाचे रीतिरिवाज, राहणीमान, त्यांच्या भाषेची व्याकरण व्यवस्था कळते. तसेच नातेसंबंधदर्शक शब्दांचा परिचयही होतो. ‘आमचं घर’ या पुस्तकात नातेसंबंधदर्शक शब्दांचा भरणा असलेला दिसतो. ‘बाबू म्हणजे बाबा, भाही म्हणजे भाऊ, बणीह म्हणजे बहीण’ असे शब्द  त्यात सापडतात पण आईला मात्र ते ‘आई’च म्हणतात, हेही कळते. आहे की नाही गंमत. पण डोगंराला पावरी भाषेत ‘बायडा किंवा डोंगरू’ म्हणतात.

निसर्गाच्या कुशीत राहणारे हे आदिवासी लोक वापरतात ती झाडांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘साग-हागन, मोह - मुवडान, पळस - पलाहन, आंबा -  आंबान’ अशी या झाडांची माधुरी पुरंदरे यांनी रेखाटलेली चित्रेही बघत राहावी अशीच आहेत.

पावरी भाषेतील क्रियापदांची रूपेही पाहण्यासारखी आहेत. त्यासाठी मराठी व पावरी भाषेतील एक उदाहरण देत आहे. पावरी - ‘गळहूं खोळाम बोरायू.’, मराठी - ‘साप गवतात शिरला’. ‘शिरणे’ या मराठीतील क्रियापदाचे पावरी भाषेतील रूप ‘बोरायू’ असे होते. तर ‘पेटवणे’ या क्रियापदासाठी ‘होलगाडयूं’ असे क्रियापद वापरात आहे. ‘भीती वाटणे’साठी ‘भियावतली’ असे क्रियापद पावरी भाषेत वापरले जाते, हेही या पुस्तिका वाचताना कळते. सर्वनामांची काही उदाहरणे येथे देत आहे. ‘यी-ही, तेरं - तिचं, ची - ती, तिनीही - तिला, तिनाहा - त्याचे’ ही सर्वनामे मराठीपेक्षा वेगळी असली तरी ‘मी’ हे सर्वनाम ‘मी’च राहाते. काही शब्द तर खूप मजेशीर आहेत. (बाळ - गिदला, मऊमऊ - हुवालंहुवालं, गरम - तातलू, घंटा - काहटी, गळा -भुचीम). या पुस्तिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात पावरी - मराठी भाषेसोबत इंग्लिश भाषेचाही परिचय करून दिलेला आहे. उदा. पावरी - ‘डूडान लूट केलव्यूं’, मराठी - ‘मक्याच पीठ मळलं’, इंग्लिश - ‘Corn flour is knraded’. एकाचवेळी तीन भाषांचा परिचय करून देणारा हा संच लहान मुलांना भाषा शिकण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे, तसेच एकाच वेळी तीन शब्दही आपल्याला कळणार आहेत. 

या पुस्तकांचे मराठी व इंग्लिश या भाषांतील लेखन वर्षा सहस्रबुद्धे यांनी केलेले असले तरी पावरी अनुवाद मात्र रूपसिंग जंगल्या पावरा यांनी केलेला आहे.

माधुरी पुरंदरे यांनी विषयानुरूप काढलेली बोलकी रेखाटने हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य असलेले दिसते.  या रेखाटणांमधूनही आदिवासी- पावरी समाजातील गावे, बाजार, कपडे घालण्याच्या पद्धती या समाज निदर्शक गोष्टींचे आकलन होते. सहज, सुलभ शब्द घेऊन कोणत्याही भाषेतील मुलाला कळेल अशी या पुस्तकाची मांडणी लहानपणी वाचलेल्या अंकलिपीची आठवण करून देते. तांबड्या रंगाच्या मुखपृष्ठावर काळया रंगाची रेखाटणे उठावदार दिसतात. मूलगामी प्रकाशनाच्या या संचाचे वाचन करून आपल्या शब्दभांडारात नक्कीच भर पाडता येईल, हे खरे. 

डॉ. अर्चना कुडतरकर

[email protected]