आज शिबिरातील तिसरा दिवस. आज मुलांच्या चेहऱ्यावर खूप कुतूहल दिसत होते. ‘विठ्ठल-रुक्मिणी’ आणि ‘पोस्टमन’ हे काल खेळलेले आणि आवडलेले खेळ पुन्हा खेळून आजच्या सत्राला सुरुवात झाली. आज मुलांना भेटायला चिंटू, मिनी, आज्जीबाई यांच्यासोबतच ससा, त्याचा मित्र माकड, साप आणि कासव आले होते. सुरुवातीला गाण्यावर नाच करणारे चिंटू आणि मिनीपाहून मुलांना खूप आनंद झाला. त्यानंतर मुलांनी ‘पपेट शो’च्या माध्यमातून ससा आणि कासवाची नवीन गोष्ट बघितली आणि ऐकली. शिक्षणविवेकच्या चित्रा नातू आणि रुपाली निरगुडे यांनी पपेटसद्वारा गोष्टींचे सादरीकरण केले. ससा आणि त्याचा मित्र माकड यांची धमाल, मुलं खूप मन लावून ऐकत होती. पूर्वीची ससा आणि कासवाची शर्यत, माकडाची मैत्री, साप माकड आणि कासव यांनी सशाला अद्दल घडवण्यासाठी केलेले नाटक आणि सशाला उमगलेली चूक या सगळया गोष्टीतील घटना मुलांच्या लक्षात राहिल्या. गोष्टीतील शब्दफेकीमुळे मुलांनी टाळ्या वाजवून उत्तम प्रतिसाद दिला. कोणीतरी पडद्यामागे बोलत आहे हे मुलांना कळत होते, मात्र कोण बोलत असावे याचा प्रत्येकजण अंदाज बांधत होते. चिंटू आणि मिनीच्या आवाजात चित्राताईंनी म्हटलेले ‘चिऊ काऊ माऊ...’ हे गाणे मुलांनी आवडीने म्हटले. दोन गट केल्यानंतर प्रत्येकाने आपापली एक गोष्ट करायचे ठरवून त्या गोष्टीतील पात्रानुसार एक एक पपेट तयार केली. चित्राताईच्या सुचनेप्रमाणे मुलांची पपेट्स तयार झाली. आपापली पपेट घेऊन मुलांनी अगदी चित्राताईप्रमाणे पडद्याच्या मागे जाऊन एक गीत म्हटले. ‘गीत म्हणताना पपेट हलवणे’ ही कृती काही जणांना जिकीरीची होत होती. तरीही थोडा वेळ पडद्यावर, थोडा वेळ हात खाली ठेवत पूर्ण गाणे सर्वांनी म्हटले. ‘बोलक्या बाहुल्या’ या सत्रानंतर गंमत खेळ सत्रात आज दोन खेळ खेळले. बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी शिक्षणविवेक मासिकात दिलेला ‘त्रिकोणी खेळ’ खेळताना तारांबळ तर उडत होतीच शिवाय मजा पण येत होती. फुग्याचा सुंदर खेळ खेळताना सर्वजण एकमेकांना मदत करत होते. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी गम्मत खेळ सत्रात दोन खेळ घेतले. त्रिकोणी खेळानंतर जोडीदार शोध हा खेळ घेण्यात आला. ‘जोडीदार शोधा’ हा खेळ म्हणजे मुलांना आरडाओरडा करण्याला पूर्ण मुभा. जितका जास्त आरडाओरडा तितकी जास्त मजा येत होती. आवाजदर्शक शब्दांच्या चिठ्ठ्या वाचून जोडीदार शोधताना सर्वांचा आवाज एकमेकांत मिसळून जोडीदार सापडल्यावर होणारा आनंद चेहेऱ्यावर दिसत होता. ‘चिऊ काऊ माऊ...’ गाणे म्हणत आणि खेळातील मजा आईला सांगत सगळे बालचमू घरी गेले.

-प्रतिनिधी

[email protected]