हॅनाची सुटकेस

दिंनाक: 24 Apr 2018 15:01:34


‘हॅनाची सुटकेस’ ही कहाणी आहे १९३० च्या दशकात चेकोस्लोव्हाकिया इथे राहणाऱ्या हॅना ब्रॅडी या मुलीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या आयुष्यात घडलेली. या गोष्टीची सुरुवात होते टोकियो (जपान)मधल्या एका लहानशा वस्तूसंग्रहालयात. तिथेच ही हॅनाची तपकिरी रंगाची सुटकेस काचेच्या कपाटात ठेवलेली आहे. तिथे ती सुटकेस पाहायला रोज खूप मुलं येतात. त्या सुटकेसवर लिहिलं होतं - हॅना ब्रॅडी. जन्म १६ मे १९३१. ‘वाइजनकिड म्हणजे अनाथ’. संग्रहालयात येणाऱ्या मुलांना प्रश्न पडायचे - कोण होती ही हॅना? ती कुठे राहायची? भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती? काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये? ती अनाथ कशी झाली? तिचं पुढे काय झालं? आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली?

हेच प्रश्न आपल्याही पडतात, पुस्तक वाचायला सुरुवात केल्याबरोबर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम हरतऱ्हेचे प्रयत्न करून केलं ते संग्रहालयाची समन्वयक फ्युमिको इशिओकानं. तिनं जगच पालथं घातलं हॅनाची कथा शोधण्यासाठी.

ही कहाणी जशी हॅनाची आहे, तशी ती फ्युमिकोची, तिच्या अतिशय उदार अशा हेतूंनी केलेल्या शोधकार्याची माणुसकीच्या नात्याचीही आहे. १९३९ ते १९४५ या दुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात हिटलर नावाच्या नाझी भस्मासुरानं ज्यू धर्मियांविषयीच्या प्रचंड द्वेषानं लाखों ज्यूंचा अनन्वित छळ केला, त्यांना गॅसचेंबरमध्ये कोंडून त्यांचा संहार केला. या ‘नरसंहाराला हॉलोकास्ट’ असं म्हणतात. अवघ्या तेरा वर्षांची हॅनाही या होलोकास्टमध्येच नाहीशी करण्यात आली. क्रूरपणानं तिला मरण्यासाठी २३ ऑक्टोबर १९४४ ला गॅसचेंबरमध्ये पाठवण्यात आलं. लाखो ज्यू मुलांना असंच संपवण्यात आलं. मरणापूर्वी ३ वर्ष हॅनानं छळछावण्यांमधला छळ सोसला. हिटलरच्या कुरतेनं हॅना तिचे आई, वडील, भाऊ या साऱ्यांशी ताटातूट केली. पोरकेपणाचं, एकटेपणाचं भयंकर यातनादायी दु:ख साऱ्यांनीच भोगलं.

जपानमधल्या मुलांना या होलोकास्टविषयी कळावं त्यातून त्यांनी काही शिकावं; जगात भविष्यात शांतता निर्माण करण्याची ताकद मुलांमध्येच आहे ती जागी करावी, या उद्देशानं जपानमधल्या एका दानशूर माणसाने एकट्यानं ‘टोकियो हॉलोकॉस्ट एज्युकेशन रिसोर्स सेंटर’ उभारलं. हाच हेतू या सेंटरची समन्वयक फ्युमिकोनं उलगडलेली ही हॅनाची कहाणी जगभरच्या मुलांनी वाचल्यानं साध्य होतो आहे...होणार आहे.

ही सत्यकथा वाचणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणते, वाचताना संहार आणि संहारकाविषयी मनात तिरस्कार जागा करते. आतड्यांना पीळ पाडला तरी ‘जगातल्या सगळ्या मुलांमध्ये परस्परांबद्दल मुळात कसं प्रेम असतं, आस्था असते, सर्वांच्या सुखी असण्याची इच्छा असते त्याचं सुंदर प्रत्यंतरही देते.’

ही कथा जगातल्या असुंदराचं, कौर्याचं दर्शन घडवून सुंदरतेचं-अहिंसा-शांतीचं महत्त्व सांगते आहे... जगातल्या ३७ भाषांत पोचलेलं हे अनेक पुरस्कारविजेतं पुस्तक मराठीतून...आपल्या भाषेतून आपल्यापर्यंत झेपावत आहे-सांगत आहे-‘युद्ध सुरू असतं तेव्हाही, भोवतीचं वातावरण उदास असतं तेव्हाही..जग सुंदरच असतं आणि प्रत्येक माणसाला त्या सौंदर्यात भर घालता येते.’

- स्वाती प्रभुमिराशी

मूळ इंग्रजी लेखक : कॅरन लीवाईन

अनुवाद (मराठी) : माधुरी पुरंदरे

प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन