नमस्कार,
आजचा दिवस मुलांसाठी खूप रंगीत होता. शिक्षणविवेक आयोजित प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा उन्हाळी शिबिराचा आज दुसरा दिवस. आज काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज रुपालीताईने  मुलांना 'विठ्ठल-रुक्मिणी' हा नवीन खेळ शिकवला. काल खेळलेला 'पोस्टमन' हा खेळ परत खेळून आजच्या सत्राला सुरुवात झाली. आजचे सत्र म्हणजे रंगीत सत्र- 'रंग-रांगोळी. आज गौरी कुर्बेट यांनी हे सत्र घेतले. सुरुवातीला ताईंनी रांगोळीबद्दल मुलांना खूप छान माहिती सांगितली. रांगोळीचे प्रकार, रांगोळीचे महत्त्व सांगितल्यावर रांगोळी काढायला सुरुवात झाली. सगळे छोटे गौरीताईच्या भोवती गोळा झाले. अधिकच्या चिन्हातून स्वस्तिक, सोपे तुळशीचे वृंदावन, चांदणीतून फूल, बोटांनी तयार केलेली फुले, ठिपक्यांची रांगोळी असे एक ना अनेक प्रकार काढून दाखवले. त्यानंतर सर्वांना एकेक कागद देऊन सराव करायला सांगितले. मुलांनी रांगोळी काढताना सुपारी, दोरी अशा वस्तूंचा वापर करत रांगोळी काढली. गंमत म्हणजे डास मारण्यासाठी वापरली जाणारी कॉईल पण रांगोळी काढताना उपयोगी पडते, ही नवी कल्पना मुलांना  समजली. सराव झाल्यानंतर सर्वांनी मिळून मोठी रांगोळी काढली. त्यानंतर रुपालीताईने 'फुगे उडवा' हा खेळ घेतला. आवडीच्या फुग्याबरोबर  खेळताना मुलांना मजा येत होती. बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी शिक्षणविवेक मासिकात दिलेला 'नाकाबंदी' खेळ खेळताना तर आणखीनच मजा आली. खेळून दमल्यावर मनात नसतानाही आपापले फुगे घेऊन मुलं घरी गेली.
-प्रतिनिधी