अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्या की, आपण संगीत, नाटक, सिनेमा, चित्रकला, लेखन-वाचन अशा गोष्टींकडे बौद्धिक, भावनिक गरज म्हणून पाहतो. आपल्या भावभावनांना दृश्य स्वरूपात अनुभवण्यासाठी या कलांची आपल्याला गरज असते. आपल्या आयुष्यातल्या घटना, प्रसंग यांचे प्रतिबिंब आपण यात शोधतो आणि या कलांबरोबर सहजपणे आपलं आपुलकीचं नातं जुळतं.

त्यामुळेच पुस्तकं ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जातात. आवडीनुसार निरनिराळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला वाचायला आवडतात. सर्वसाधारणपणे पुस्तकं आपल्याला नवीन विषयांचं ज्ञान देणारी असतात. एखाद्याचं आयुष्य कसं घडलं? याचं चित्रण करणारी असतात. निरनिराळ्या ठिकाणांची भटकंती घडवून आणतात. पाकशास्त्रातील खवैय्येगिरीची असतात; पण मी आज ज्या पुस्तकाविषयी तुम्हाला सांगणार आहे, ते आहे आजच्या काळातल्या संगीताविषयी, विशेषत: सिनेसंगीताविषयी! हे पुस्तक सिनेसंगीताच्या बदलांवर अतिशय मार्मिकपणे भाष्य करतं.

"नवे सूर अन् नवे तराणे" या नावातून लेखक आपल्याला विषयाचं वेगळेपण सूचित करतो. डॉ. आशुतोष जावडेकर स्वत: संगीताच्या क्षेत्रात मुशाफिरी केलेले संगीतकार आहेत, पण इथं ते आपल्याशी एक रसिक म्हणून संवाद साधतात. एका रसिकाच्या दृष्टिकोनातून, त्यांनी टिपलेले हे संगीतातील बदल, मुख्यत: सर्वसामान्यांच्या आवडीचं जे सिनेसंगीत आहे, त्यांतील बदल मांडतात.

डोळ्यांनी आस्वाद घेतली जाणारी चित्रकला, रसनेनं आस्वाद घेतली जाणारी पाककला आणि कानांनी आस्वाद घेतली जाणारी संगीत कला! हिच्याविषयी शब्दांत लिहिणं हे खूपच कठीण आहे. म्हणजे पाहा, श्रीखंड, बांसुंदी, गुलाबजाम, जिलेबी हे आपापल्या आवडीप्रमाणे श्रेष्ठच आहेत. पण श्रीखंडापेक्षा बासुंदीचं खास वैशिष्ठ्यं कोणतं? आणि जिलेबी पेक्षा गुलाबजाम कसा चवीला वेगळा? हे शब्दात वर्णन करणं किती अवघड. पण लेखक आपल्याला विविध संगीतकारांच्या मधुर चाली, कशामुळे मधुर लागतात? पूर्वीच्या संगीतकारांनंतर नवीन संगीतकारांनी कशा वेगळ्या चाली दिल्या, त्या वेगवेगळ्या गायक - गायिकांनी कशा समर्थपणे गाईल्या, निरनिराळी वाद्यं वापरून संगीतकारांनी कशी रसिकांवर मोहिनी घातली, अशा अनेक गोष्टी अगदी सहजपणे उलगडून सांगतात. हे सिनेसंगीतातील अनेक बदल, त्यांनी केलेल्या निरीक्षणांतून आपल्यासमोर असे काही मांडलेत की, ते आपल्याला लगेच पटतात आणि ‘खरंच की, आपल्याला हे माहीत होतं, पण जाणवलं नव्हतं', असं वाटल्यावाचून राहात नाही.

त्यांनी दिलेल्या अनेक गीतांच्या उदाहरणांतून, आपल्याला अगदी जुन्या जमान्यातील नूरजहां - सुरैय्यापासून पुढे लता - आशा यांच्यापर्यंत, पुढे कविता कृष्णमूर्ती - साधना सरगम - श्रेया घोषालपर्यंत ते फिरवून आणतात. कुंदनलाल सैगल - सचिनदेव बर्मनदापासून, किशोरकुमार - महंमद रफी - हेमंतकुमार - मुकेश, पुढे सोनू निगम - कुमार सानू - उदित नारायण - शंकर महादेवनपर्यंत सर्व गायकांची खास खास गाणी नजरेस आणून देतात... नव्हे, वाचता वाचता कानात ती घुमायलाही लागतात.

तीच गोष्ट संगीतकारांची वैशिष्टय सांगतानासुद्धा. अगदी १९१३ सालच्या पहिल्या बोलपटापासून थेट आताच्या अवधूत गुप्तेच्या गाण्यापर्यंत. नुसती नावांची जंत्री ते देत नाहीत तर प्रत्येक संगीतकाराच्या संगीत दिग्दर्शकाची वैशिष्टय खुलवून सांगतात. नितीन बोस या संगीतकाराने, पंकज मलिकच्या आवाजात पहिलं पार्श्वगायन कसं रेकॉर्ड केलं इथपासून, सचिनदेव बर्मन - शंकर जयकिशन - सलील चौधरी - नंतर मदन मोहन, जयदेव, आर् . डी बर्मन, कल्याणजी - आनंदजीपासून आत्ताच्या प्रीतम, सलीम सुलेमान, शंकर अहसान लॉयपर्यंत प्रत्येक संगीतकाराची खासियत दाखवून देतात.

या दरम्यान, काळानुसार वाद्यवृंदामध्ये झालेले बदलही त्यांनी निरखले आहेत. पंजाब लोकगीतं, राजस्थानी लोकसंगीत, सूफीसंगीत, कव्वाली अशा अनेक गीतप्रकारांचा प्रभाव सिनेसंगीतावर कसा होत गेला, हेही त्यांनी उदाहरणांसह सांगितलं आहे.

पूर्वीच्या आणि आजकालच्या रसिकांबद्दल ते म्हणतात, “पूर्वी गाणं जसं जीव ओतून गायलं जायचं, तसं जीव ओतून ऐकलं जायचं. त्यांचं पुन:स्मरण करून ते मुखोद्गत केलं जायचं. पुन:प्रत्यय घेतां घेता त्या गायकीतलं मर्म शोधलं जायचं. पण दुर्दैवानं आपण अशा काळात वावरत आहोत, जिथे सुरांचा, नादांचा, तालाचा भडिमार होतोय. हा ओव्हर सप्लाय पचवायचा कसा हा प्रश्न श्रोते म्हणून आपल्याला पडतो.’’

खरंच इतकं मार्मिक विधान लेखकच करू जाणे आणि स्वत: लेखक आपल्याला हा प्रश्न सोडवायला मदत करत आहेत. त्यांचा प्रयत्न आहे, “या नव्या संगीताला भिडायचं कसं? याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवायचा? याची वाट या पुस्तकातून दाखविण्याचा. ही वाट रसिकांना स्वच्छ डोळ्यांनी जरी बघता आली, तरी पुरेसं आहे. मग सच्चा रसिक स्वत:हून त्या वाटेकडे चालू लागतो. लेखकाचा प्रयत्न आहे, फक्त ती वाट दाखवण्याचा, भोवतालचं धुकं बाजूला सारण्याचा. हे धुकं आहे, पुन्हा काळाचाच परिणाम म्हणून उभं राहिलेलं. गेल्या पंधरा-वीस वर्षात तंत्रज्ञानानं केवढी झेप घेतली आहे. गाणं ज्या पायावर उभं राहत असे, तो पायाच बदलला आहे. गाणं चमकदार होऊ लागलंय. पण त्याचा आत्मा निरागस राहिलेला नाही. गायक, वादक आणि संगीतकार हे जुन्या काळातील मुख्य शिलेदार असत, तर अत्याधुनिक ध्वनिमुद्रण तंत्र, अॅरेंजर आणि साउंड इंजिनिअर हे आजचे सूत्रधार झाले आहेत.’’

ही मतं मांडतानांच लेखक या तंत्रज्ञानाची दुसरी चांगली बाजू पण दाखवताना म्हणतात, “आजच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे दणकट, बुलंद गायकाचा आवाजही कर्कश न होता आपल्यापर्यंत पोहोचतो. गायकाला तयार ट्रॅकच्या पट्टीत गाता आलं नाही, तर एका बटनाच्या मदतीने संपूर्ण ट्रॅक, त्यातल्या सगळ्या वाद्यमेळाच्या सुरावटीसकट, खाली किंवा वर करता येतो. ही सारी वैविध्यं एकजात चांगलीच असतील असं नाही, पण एकूण संगीत पुढे जाण्याच्या दृष्टीनं फारच महत्त्वाची आहेत.’’

अशा प्रकारे पूर्वीचे सिनेसंगीत ते आजच्या सिनेसंगीताचं बदललेलं स्वरूप, त्याच्या बऱ्या-वाईट दोन्ही बाजूंसह, त्यांच्या निरीक्षणांनुसार लेखक आपल्यासमोर मांडतात. आणि जुन्या मेलडीयुक्त संगीतात रमता रमता, नव्या बदललेल्या संगीताकडे पाहण्याची नवी दृष्टी ते आपल्याला देतात.

शेवटी लेखकानं, संगीत क्षेत्रातील निरनिराळ्या माध्यमांत (नाटक, सिनेमा, खाजगी अल्बम्स, जाहिराती, मालिका, जाहीर कार्यक्रम) अनेक वर्षं कार्यरत राहून, या बदलांना ज्यांनी सहजपणे आपलसं केलं, अशा शंकर महादेवन् आणि अशोक पत्की या दोन संगीतकारांबरोबर मनमोकळा संवाद साधलाय, तो ही वाचनीय आहे.

संगीत रसिकांनी हे पूर्ण पुस्तक वाचून याचा आनंद लुटावा, हे मात्र मी नक्की सांगेन .

लेखक - डॉ. आशुतोष जावडेकर

राजहंस प्रकाशन

-      मधुवंती पेठे

[email protected]