नमस्कार, 
तिसऱ्या टप्प्यातील शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज पहिला दिवस. पहिले सत्र परिचयाचे होते. सर्वच मुले वेगवेगळ्या शाळांतून आली असल्याने एकमेकांचा परिचय नव्हता. या सत्रात प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव, आवडता खाऊ, आवडती ऍक्टिव्हिटी असे सांगत करून दिली. यांतून संवाद कौशल्याचा विकास होण्यास मदत झाली. एकमेकांचा परिचय झाल्यावर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. नवीन ठिकाण, नवी माणसं पाहून सुरुवातीला गप्प गप्प असणारी मुले थोड्याच वेळात सत्रासाठी तयार झाली. 'पुस्तक माझे' या सत्रात मुलांनी स्वतःचे पुस्तक तयार केले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी हे सत्र घेतले. कृती समजून घेतल्यानंतर प्रत्येकाने आपल्या पुस्तकाचा विषय ठरवला. चित्र आणि मुलांच्या त्यामागील कल्पना अशी खूप सुंदर पुस्तके तयार झाली. जवळपास सव्वा तास गडबड न करता, एकाग्र चित्ताने मुलांनी आवडीने आपापली पुस्तके तयार केली.  त्यांच्या वयानुसार त्यांनी काढलेली चित्रे खरोखरच उत्तम होती. मुलांनी स्वतःचे असे पहिले पुस्तक लहान वयातच तयार केले, हे पाहून पालकांनाही आनंद झाला. रुपाली निरगुडे आणि सायली शिगवण यांनी मुलांना मदत केली. त्यानंतर 'ब,ब बगळा ... ब ब बदक'  आणि 'पोस्टमन' हे खेळ खेळले. उद्याची गंमत काय असेल, याचा विचार करत छोटी लेखक मंडळी घरी गेली.
-प्रतिनिधी