छत्तीसगडचं कोटमी सोनार गाव. तेथे मोठं मगरींच पार्क आहे. ते बघायला अनेक लोक येत असतात. असेच एकदा बरेच पर्यटक आले होते. तेवढ्यात अचानक एक व्यक्ती मगरींच पार्क असलेल्या तळ्याकाठी येते. ती व्यक्ती तोंडातून काही वेगळाच आवाज काढू लागते आणि काय आश्चर्य! तळ्यातून एका मागून एक मगरी बाहेर येऊ लागतात. पार्क बघायला आलेले लोक आश्चर्यचकीत होतात. तो माणूस आवाज काय काढतो आणि तो ऐकून त्या तळ्यातील मगरी बाहेर काय येतात! पण असं हे रोज घडत होतं.

तर आवाज काढून त्या मगरींना तळयाबाहेर बोलावणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे - सीताराम. २००५ च्या एप्रिल महिन्यात याच सीताराम भाऊंना एका दिवशी एका मगरीने जबड्यात पकडून पाण्यात खेचून नेलं होतं. महामुश्किलीने त्यांचे प्राण वाचले होते; पण एक हात मात्र कापला गेला. त्याच सीताराम भाऊंच्या एका आवाजानं तळ्यातून मगरी धावत बाहेर येतात. त्या मागचा इतिहास सांगताना सीताराम भाऊ म्हणतात, “एप्रिल २००५ मधील, एके दिवशी मी मगरींच्या पिल्लांना पाण्यात सोडत होतो. तेवढ्यात गावातील काही मुलांनी मगरींवर दगड मारायला सुरुवात केली; त्यामुळे मगरी बिथरल्या. त्यातील एक मगर हिंसक होऊन, तिने मला पाण्यात खेचून नेलं.” मगरीने सीताराम भाऊंचा एक हात जबड्यात पकडला आणि पाण्यात खेचू लागल्यावर प्रसंगवधान साधून सीताराम भाऊंनी डाव्या हाताने जोरात मगरीच्या डोळ्यावर घाव घातला. त्या मारामुळे मगरीने जबडा उघडला आणि सीताराम भाऊ त्यांचा हात बाहेर काढू शकले. अर्थात, त्यांचा हात कापला गेला होता. त्यांना विलासपूरच्या मेडीकल कॉलेजमध्ये दीड महिन्यापर्यंत इलाज करावा लागला होता. त्याच काळात कोटमी सोनार गावातील अन्य लोकांवरदेखील मगरींनी हल्ला केला होता.

कोटमी सोनार गावातील या मोठया तलावात बऱ्याच मोठया प्रमाणावर मगरी असल्यामुळे त्या ठिकाणी ‘क्रोकोडाईल पार्क’ बनवण्याची सुरुवात करण्यात आली आणि सीताराम भाऊंना मगरींची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आले. त्यांना ‘केअरटेकर’ बनवण्यात आले. ते रात्री देखील पार्कमध्येच राहतात; जेणेकरून रात्रीच्या वेळी कोणी येऊन पाण्यात काही टाकून जाऊ नये.

हा मगरींचा पार्क वनविभागाच्या अधिकारात येतो. १२० एकरांचा हा पार्क आहे; त्यातील ८० एकरात पाणी भरलेले असते. सुरुवातीला त्यात फक्त २७२ मगरी सोडण्यात आल्या होत्या. सीताराम भाऊना मगरींबद्दल एवढं प्रेम आहे की, त्यांनी विलासपूर हायकोर्टाच्या न्यायाधीशांना अर्ज दिला आहे की, त्यांना आजीवन मगरींची सेवा करण्याची मंजुरी देण्यात यावी.

दुसरी चकीत करणारी गोष्ट; सीताराम भाऊंनी कोर्टात एक असा अर्ज केला आहे. त्याबाबत न्यायाधीशदेखील अचंब्यात पडले आहेत. स्वतःचं सार जीवन मगरींची सेवा करण्यात घालवणाऱ्या साखराम भाऊंची इच्छा आहे की, त्यांच्या मृत्यूनंतरदेखील मगरीं बरोबरच त्यांचा सहवास टिकून राहावा; यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज केला आहे की, त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेह मगरींच्यामध्ये, पाण्यात टाकण्यात यावा. सीताराम भाऊंच्या अशा जगावेगळ्या अर्जावर कोर्टाचा अजूनपर्यंत कोणताच निर्णय आलेला नाही.

सीताराम भाऊंनी सांगितलं की, ते २० वर्षांपासून मगरींची काळजी घेत आहेत. सुरुवातीला ‘जोगिया’ तलावातील मगरींची काळजी घेतली; आता ‘मुडा’ तलावातील मगरींची काळजी घेत आहेत. क्रोकोडाईल पार्कमध्ये सीताराम भाऊ स्वतः मगरींची पूजा करतात. त्याठिकाणी ते मगरींचं ‘मंदिर’ बनवायचं स्वप्न बघत आहेत; त्यासाठी कलेक्टर आणि वन विभागाला अर्जदेखील केले आहेत. असे हे अनोखे मगरप्रेमी सीतारामभाऊ.

गुजराथी दैनिक ‘दिव्य भास्कर’ मध्ये १८ जून २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘स्पेशल स्टोरी’ या कॉलममध्ये देवेंद्र गोस्वामी यांनी लिहिलेल्या सत्य कहाणीचा हा अनुवाद.

अनुवाद : सुधा(साने)बोडा

[email protected]