तेरडा

दिंनाक: 20 Apr 2018 15:15:48


तेरडा हा मूळचा भारतातलाच. त्याला गौरीची फुले असेही म्हटले जाते. त्याची पत्री पूजेकरता वापरतात. पूर्वी फक्त पावसाळ्यातच हा फुलत असे, पण आता तो बहुवार्षिकही झाला आहे. तेरडा हे सरळ वाढणारे झाड. त्याचा वापर गणपतीमध्ये माटोळीसाठीदेखील केला जातो.

तेरड्याचे शास्त्रीय नाव ‘इंपेटिएन्स बाल्समिना’ आणि याचे कुल ‘बाल्सामिनेशी’ आहे. ती उंच, गुळगुळीत, काहीशी लवदार, मांसल खोडाची, थोड्या व आखूड फांद्यांची ही औषधी वनस्पती आहे. समुद्रसपाटीपासून १.५५० मी. उंचीपर्यंत भारतात सर्वत्र आढळते. जंगलात झाडाझुडपांच्या खाली भरपूर वाढते. महाराष्ट्रात पश्चिम घाट, कोकण, दख्खनमध्ये सापडले. आपली विशिष्ट प्रतिभा जपते.

याची फुले पांढरा, लाल, गुलाबी, फिकट जांभळ्या रंगात असून नाजूक असतात. फुललेले फूल चार - पाच दिवस ताजे राहते. याचे उत्पादन भरपूर येते. त्यामुळे तो स्वस्त मिळतो. जरी तो वासरहित असला तरी, रंगविविधतेमुळे त्याचा बराच वापर होतो. पाने साधी, एकाआड एक १५ से.मी लांब, दातेरी भात्यासारखी निमुळती असून देठावर ग्रंथी असतात. फुले एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात. लहान सोंडेसारखी नळी असते. बोंडे एक सें.मी जाड, लवदार असल्याने पूर्णावस्थेत धक्का लागल्यास तडकन बिया आसपास फेकल्या जातात. याच्या वंशातील सुमारे १५० जाती भारतात आढळतात. रोपात क्षारांचे प्रमाण जास्त असते. कर्नाटक, गुजरातमध्ये दातेरी पानाची लहान आकाराची फुले येतात. कोणी कोवळ्या पानांची भाजी करतात.

तेरड्याची लागवड रोपे लावून करतात. याला कोणतीही जमीन चालते. मेमध्ये बी पेरल्यावर ऑगस्टमध्ये याची फुले मिळतात. पुढे ती अनेक दिवस मिळतात. फुलांचा हंगाम मात्र थोडे दिवस टिकतो. फुलांचा रंग लवकर विटतो. म्हणूनच तेरड्याचा रंग तीन दिवस असे म्हटले जाते. याला माफक पाणी लागते. फुले संपताच याला शेंगा लागतात. सहसा या झाडावर किडींचा प्रादुर्भाव होत नाही.

तेरड्याची फुले थंडावा देणारी व पौष्टिक असतात. भाजलेल्या जागी ती लावतात. ही सांधेदुखीवरही उपयुक्त आहेत. ती पोट साफ करणारी, लघवी करणारी म्हणून पोटात घेतात. फुले वाळवून त्यापासून नैसर्गिक रंग करतात, तसेच पानांपासून रंग तयार करतात. बियांपासून २७% हिरवट, चिकट तेल निघते, ते स्वयंपाकात व दिव्याकरिता वापरतात. मेंदीप्रमाणे फुलापानांनी नखे रंगवितात. फिलिपीन्समध्ये कटिशुलावर फुले वापरतात. चीनमध्ये बियांचे चूर्ण सुलभ प्रसूतीकरता देतात. कास पठारावर फुललेल्या तेरड्याचे कार्पेट पाहायला पर्यटक गर्दी करतात.

अगरबत्ती, साबण, सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोनटक्का या फुलाविषयी माहिती घेऊ खालील लिंकवर. 

सोनटक्का

-मीनल पटवर्धन

[email protected]