मुलांनो, म्हणता म्हणता एप्रिल महिना आलाय. वार्षिक परीक्षेचे वेध लागलेत. त्या दिशेने तुमचा अभ्यासही सुरू झालाय, पण त्याचबरोबर ‘भीती’ नावाचा बागूलबुवा काही मुलांच्या मानेवर बसलाय, हो ना! मला परीक्षा कशी जाईल? माझा अभ्यास होईल का? मला कसे मार्क मिळतील? मला कोणती श्रेणी मिळेल? किंवा किती टक्के मिळतील? माझा पेपर पूर्ण होईल का? परीक्षेत सगळं आठवेल का?... बाप रे!!! किती हे प्रश्न. भीतीच्या बागुलबुवामुळे मनात येणारे हे ढिगभर प्रश्न. या प्रश्नांचं काय करायचं? अभ्यास करायचा का हे प्रश्न सोडवायचे? काहींच्या मनात असाच गोंधळ उडालाय नं? चला तर मग, आजच्या लेखात अशा काही टिप्स पाहू या, जेणेकरून तुमच्या मनातील परीक्षेची अवाजवी भीती कमी होईल.

1) आत्तापासूनच वेळेचे पक्के नियोजन करा. परीक्षेला किती दिवस राहिलेत, त्या दिवसांमध्ये एकूण किती धडे करावे लागणार आहेत, रोज किती धडे पूर्ण करायचे ते ठरवा व त्यानुसार कामाला लागा.

2) अभ्यासाचं नियोजन करताना सोशल मिडियापासून (व्हाट्सअँप, फेसबुक, चॅटिंग) आवर्जून लांब राहा. यासाठी तुमच्या मनाचा निश्चय मात्र पक्का हवा. या गोष्टींना दुय्यम स्थान देऊन अभ्यासाचा वेळ वाढवा.

3) तब्येतीकडे लक्ष द्या. सकस, पौष्टिक, घरी केलेले पदार्थ खा. आता उन्हाळा सुरू झालाय, तर घरच्या सरबतांवर भर द्या. कोल्ड्रिंक, जंकफूड जरूर टाळा.

4) तुमचे विचार सकारात्मक ठेवा. मी माझ्या क्षमतेनुसार योग्य अभ्यास करत आहे. माझ्या प्रयत्नांना १००% यश मिळत आहे, असा विचार सतत मनात करत राहा.

5) परीक्षेचं नेमकं ध्येय ठरवा, त्यानुसार नियोजन करा, त्याची अंमलबजावणी करा.

6) सतत स्वतःचं मूल्यमापन करत राहा. रोज रात्री, मी दिवसभरात काय करायचं ठरवलं होतं, त्यानुसार अभ्यास झाला का? नसेल तर का नाही झाला? आता उद्या कसा अभ्यास करू? असे प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे मिळवा व आवश्यक ते बदल करा.

7) मुलांनो, स्वतःची प्रगती करण्याची वेळ कधीच गेलेली नसते. त्यामुळे कितीही अडथळे आले, तरी प्रयत्न सोडू नका. कोणीही तुम्हाला कितीही नावं ठेवली, तरी त्याकडे दुर्लक्ष करा. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

8) नकारात्मक प्रभावांपासून दूर राहा. सतत टोचून बोलणाऱ्या व्यक्ती, भांडणं करणाऱ्या व्यक्ती, वाईट सवयी असणाऱ्या व्यक्ती, उगाचच टोमणे मारणाऱ्या व्यक्ती, नकारघंटा वाजवणार्‍या व्यक्ती यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. त्यांच्याबरोबर वाद घालण्यात तुमचा अभ्यासाचा वेळ अजिबात वाया घालवू नका.

तेव्हा मुलांनो, तुमच्या परीक्षेसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा! All the Best!!!

का बरं आपल्या लक्षात राहत नाही? असं काय होतं आणि आपण उत्तरच्या उत्तरं विसरतो. जाणून घ्या रश्मी पटवर्धन यांच्या लेखात.

लक्षात राहण्यासाठी

-रश्मी पटवर्धन

[email protected]