नमस्कार,
रानडे बालक मंदिर शाळेतल्या पाळणाघरात सध्या शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर सुरू आहे.
आज दि. १७ एप्रिल रोजी शिबिर सुरू व्हायच्या आधी काल पुस्तकात कोणतं चित्र काढलं, कोणते खेळ खेळलो याची उजळणी करत असतानाच 'आज काय करणार' याचे कुतूहल सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर दिसत होते. आजचे सत्र म्हणजे रंगीत सत्र - 'रंग - रांगोळी'. या सत्रात धनश्री कोंडे यांनी मुलांना रांगोळी शिकवली. सुरुवातीला ताईंनी सगळ्या मुलांना त्यांची नावे विचारली आणि ' तुमच्या घरी कोण रांगोळी काढतं का?' असंही विचारलं. कोणाची आई, कोणाची आजी तर कोणाची ताई रांगोळी काढते अशी उत्तरे मिळाल्यानंतर रांगोळीचे रंग, काढण्याची पद्धत यांवर चर्चा झाली. रांगोळीची ओळख झाल्यानंतर धनश्री ताईंच्याभोवती सगळे छोटे कलाकार जमा झाले. त्यांनी रांगोळीतून फुले, पाने, सूर्यफूल ही चित्रे काढून दाखवली. चिमटीत पकडून रांगोळी कशी काढायची, काडीपेटीच्या काडीने रांगोळी कशी काढायची, हे व्यवस्थित समजावून सांगितले. गटात विभागणी केल्यानुसार सगळ्यांना रंगीत रांगोळी देण्यात आली. सगळी मुलं ताईंनी शिकवलेली रांगोळी अगदी हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करत होती. काही जण आपल्या कल्पनेनुसार वेगवेगळे आकार काढण्याचा काढत होते, हे बघून खूप छान वाटलं. रांगोळी काढून झाल्यानंतर मुलांनी 'सिग्नल', 'आईचं पत्र हरवलं' हे खेळ खेळले. त्यानंतर रुपालीताईंनी 'अशी खीर बनवू या...' हे गाणं मुलांना शिकवलं. मुलांनी खूप आवडीने गाणं म्हंटल. उद्या आणखीन मजा करायची असं सगळ्यांनी मिळून ठरवलं. आज अर्चनाताई, धनश्रीताई, रुपालीताई आणि सायलीताई यांनी मुलांबरोबर रांगोळीचा आनंद घेतला.

-प्रतिनिधी

[email protected]

 

उन्हाळी शिबिर : दिवस पहिला (रानडे बालक मंदिर)