शिक्षणविवेक आणि शिल्पकार चरित्रकोश आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिल्या बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांनी पाहिले भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव.' महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतेने साकारलेले पुस्तकांचे गाव पाहणे हे आगळेवेगळे बक्षिस मुलांना खूप आवडले. दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सहल निघाली. भिलारला पोहोचल्यावर न्याहरी करून प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात सगळे जमले. सुरुवातीला प्रकल्प समन्वयक बालाजी हळदे यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली व एक डॉक्यूमेंट्री दाखवली. बाल साहित्यिक ल.म. कडू खास या विद्यार्थ्यांसाठी आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ल.म.कडू सरांची मुलाखत घेतली. सरांचे लेखन, चित्रकला, चित्रांचे प्रदर्शन यांबद्दले अनेक प्रश्न मुलांनी विचारले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखत चालली होती. संपूर्ण मुलाखत शिक्षणविवेकच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात आली होती. घरी बसून पालकांनीही मुलाखत पाहिली. इतक्या प्रसिद्ध बालसाहित्यिकासोबत माझा पाल्य बोलत आहे, याचे पालकांना कौतुक होते. मुलाखतीनंतर भोजनाचा आस्वाद घेऊन सर्वजण गावाचा परिसर पाहण्यास व पुस्तके वाचण्यासाठी सज्ज झाले. तीन गटांत विभागणी होऊन सर्वांनी पुस्तकांची दालने पाहिली. प्रत्येक दालनातील रचलेली पुस्तके, पुस्तक वाचण्यासाठी उत्तम सोय, विशिष्ट पद्धतीची कपाटे पाहून पुस्तक वाचण्याचा मोह आवरता येत नव्हता. कथा, बालसाहित्य, विनोदी साहित्य, स्त्री साहित्य, शिवकालीन इतिहास, क्रीडा, विज्ञान, कलाविषयक अशा दालनांना भेटी देताना नवनवीन पुस्तकांची नावेही माहीत होत होती. १५००० पुस्तके, २५ घरे यांचे बहारदार विश्व पाहत वाचन-आनंद घेताना निघण्याची वेळ कधी झाली हे कळलेच नाही. शेवटी सरबत घेऊन सर्वजण पुण्याच्या दिशेने निघाले. मुलाखतीदरम्यानचे कडू सरांचे शब्द आठवत आणि पाहिलेली, वाचलेली पुस्तके मनात साठवत मुले रात्री ८ वाजता पुण्यात परतली.

-प्रतिनिधी

[email protected]