‘ए आई, उठ ना. मला शाळेत जायला उशीर होतोय.’

रोज सकाळी लवकर उठण्यासाठी हातापाया पडायला लावणारी वैदेही, आज चक्क आपल्यालाच उठवत आहे, हे बघून मनीषाने सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना, याची खात्री करून घेतली.

‘वैदेही, हा काय चमत्कार, आज चक्क माझ्या आधी जागी झालीस?’

‘अगं आई, आज शाळेचा शेवटचा दिवस, रिक्षावाल्या काकांची आईसक्रीम पार्टी, मग उद्यापासून सुट्टी, त्यामुळे मी भरपूर खूश असल्यामुळे पटकन जाग आली.’

मनीषाने तिच्याकडे हसून बघत दूध व पेपरसाठी दार उघडले. दारात पडलेला पेपर, सोफ्यावर आणून ठेवताना, त्या पेपरमध्ये कोंबलेले जाहिरातीचे कागद एकामागे एक खाली पडले. कागद गोळा करताना तिच्या लक्षात आले की, या सगळ्या तर उन्हाळी शिबिराच्या जाहिराती आहेत. चित्रकलेपासून ते घोडेस्वारी, जंगल भ्रमंती, रोबोटिक्स, ओरेगामी असे एकापेक्षा एक पर्याय बघून, वैदेहीला कोणत्या ना कोणत्या शिबिरात पाठवूयाच, असे मनातल्या मनात ठरवून, तिने ते सगळे कागद जपून ठेवले.

वैदेही पटापट आवरून शाळेत पळाली. शेवटचा दिवस असल्यामुळे व शाळेतून पुढच्या वर्षीसाठी काही सूचना मिळणार असल्यामुळे सगळे पालक मुलांना घेण्यासाठी, तसेच सूचना ऐकण्यासाठी आज शाळेत आले होते. त्यामुळे आईसक्रीम पार्टी उरकून वैदेही, तिच्या दोन मैत्रिणी व त्यांच्या आया असे सगळे एकत्र घरी यायला निघाले. सुट्ट्या तर लागल्या, आता पुढे काय करायचे, याविषयी आयांच्या गप्पा सुरू होताच, वैदेही व तिच्या मैत्रिणीनी, खेळणे सोडून आपल्या सुट्टीच्या भविष्याचा फैसला काय होतोय हे कान टवकारून ऐकायला सुरुवात केली.

मी आज सकाळीच दोन-तीन उन्हाळी शिबिराच्या जाहिराती बघितल्या आहेत. त्यातल्या एका शिबिरासाठी वैदेहीला पाठवायचे मी ठरवले आहे. तिथे ओरिगामी, चित्रकला, योग व मातीकाम असे भरगच्च उपक्रम आहेत.

हे ऐकताच, ‘मी अजिबात कुठल्याही शिबिराला जाणार नाही, सुट्टीत मी मला पाहिजे तेच आणि पाहिजे तेवढ्या वेळ करणार’, असे सांगून वैदेहीने नकारघंटा वाजवली.

दोघीही घरी पोहोचल्या. वैदेहीचा राग तिच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. तेवढ्यात तिचे बाबा घरी पोहोचले.

‘काय, लागली का सुट्टी, खूश ना मग आता?’, त्यांनी वैदेहीला जवळ घेत विचारले.

‘सुट्टी लागली, पण खूश वगैरे काही नाही, आईने सुट्टीत मला पक्के अडकवण्याचे ठरवले आहे. बाबा, सुट्टीत तरी, आम्हाला जे हवे तेच करायला मिळाले पाहिजे.’

‘अगं, तुझ्या भल्यासाठीच करत आहोत आम्ही. फुकट पैसे वाया घालवायला आम्हाला वेड लागले आहे का? तुला शाळेत शिकायला मिळत नाही, अशा चार नवीन गोष्टी शिकता येतील’, तिथे आईने तिचे बोलणे मध्येच तोडले.

‘असो, वैदेही, तू आवर आणि खेळायला पळ, आम्ही बघतो शिबिराचे.’

‘मनीषा, तिला शिबिराला जायचे नाही आणि तुला असे वाटते की, तिचा वेळ सत्कारणी लावावा. मला तुमचे दोघांचेही पटते म्हणूनच मी तुला एक सुवर्णमध्य सुचवतो. वैदेही उन्हाळी शिबिराला जाईल पण ते शिबिर कसे असले पाहिजे, हे ठरवण्याचा अधिकार आपण तिला देऊन टाकू.’

‘तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही. असे शिबिर कोण घेणार आणि ते शोधायचे तरी कसे?’

‘अगं, शोधायची काहीच गरज नाही. हे बघ आपल्या सोसायटीत वैदेही व तिचे मित्र-मैत्रिणी मिळून किमान वीस मुले आहेत. त्यांना आपण उद्या घरी सरबत पार्टीसाठी बोलवू. त्यांच्याशी गप्पा मारता मारता, त्यांना उन्हाळ्यात काय करायला आवडेल, हे विचारू. आणि मग आपण व त्या मुलांचे आई-बाबा मिळून मस्त शिबिर घेऊ की.’

मनीषाला व मुलांनाही हा निर्णय पटला. पार्टीत मुलांनी त्यांच्या अतृप्त इच्छा सांगायला सुरुवात केली. कुणाला गॅरेज बघायचे होते, तर कुणाला उसाचा रस काढून बघायचा होता. काही जणांना हॉटेलमध्ये एवढ्या लोकांचा स्वयंपाक कसा करत असतील हा प्रश्न होता, तर कुणाला शर्टचे तुटलेले बटण कसे बसवायचे हे शिकायचे होते. काहींना कैर्‍या पाडायच्या होत्या, तर काहींना मित्राच्या घरी जाऊन एक रात्र राहायचे होते. सायकलिंग, किल्ले फिरणे, नदीत मनसोक्त डुंबणे, फोटोग्राफी शिकणे आणि सोसायटीच्या कचर्‍याचे नक्की काय होते हे शोधणे अशा अनेक कल्पना मुलांच्या सुपीक डोक्यातून बाहेर आल्या.

मुलांचा कल्ला चाललेला बघून न बोलावता पार्टीत हजर झालेल्या आई-बाबांनी ‘अरे, हे तर आपण सगळे मिळून सहज करू शकतो’, असे म्हणून मुलांच्या कल्पनेतील उन्हाळी शिबिरावर शिकामोर्तब करत, शिबिरातील कोणत्या कामाची जबाबदारी कुणी घ्यायची हे ताबडतोब उत्साहाने ठरवून टाकले!

‘काय वैदेही, जायचे ना या शिबिराला?’ बाबांच्या या प्रश्नाला वैदेहीचे उत्तर काय असेल हे वेगळे सांगायलाच हवे का?

घराघरातील भाजीचा यक्षप्रश्न सोडवण्यासाठी नक्की वाचा चेतन एरंडे यांचा लेख. 

भाजीचा यक्षप्रश्न

 -चेतन एरंडे

[email protected]