आपण नदीबद्दल बरंच काही ऐकून असतो. कधीतरी भूगोल विषय शिकताना शिक्षकांनी विचारले असेल, "सांगा बघू नदी म्हणजे काय?" तर अशा वेळी नदीची काय बर व्याख्या सांगता तुम्ही.? नदी म्हणजे अखंड वाहणाऱ्या खळखळत्या पाण्याचा झरा. असं जर तुम्ही सांगत असाल, तर अगदी बरोबर! तर याच नदीबद्दल काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

नैसर्गिकरीत्या वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीच्या उगमस्थानाविषयी थोडी गमतीशीर माहिती आहे बरं का! असं म्हणतात, ऋषीचं कुळ आणि नदीच मूळ विचारू नये. कारण याविषयी नक्की माहिती सांगता येत नाही. नदीचा उगम कोठून होतो? हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण प्रामुख्याने नदीचा उगम तलाव, मोठा झरा, अनेक छोटे-छोटे झरे; तसेच बर्फाच्छादित पर्वतामधून होतो. तेथून तिच्या प्रवाहाला सुरुवात होते. तेथून वाहत समुद्राला जाऊन मिळेपर्यंत तिला अनेक उपनद्या मिळत जातात. उगम स्थानापासून नदी ज्या ज्या भागातून वाहत जाते, तेथे आपणास लोकवस्ती दिसून येते.

डिस्कव्हरी चॅनेलवर एकदा खूप छान माहिती सांगितली होती. जर समजा आपण जंगलात फिरायला गेलो आणि हरवलो. आपल्याला रस्ता सापडला नाही, तर अशा वेळी घाबरून न जाता त्या जंगलातून जी नदी वाहत जात असते, त्या नदीच्या काठावरून आपण नदीच्या प्रवाहासोबत पुढे पुढे जावे. पुढे आपणास कोठे ना कोठे तरी लोकवस्ती नक्कीच दिसते. पुढच्या अंकापासून आपण ज्या नद्यांविषयी माहिती घेणार आहोत, त्यात आपणास नदीकाठी वसलेल्या गाव, शहरांची माहिती येईलच. छोट्या गावापासून मोठ-मोठी शहरे ही नदीकाठी वसलेली आहेत. कारण या नदी, तलावापासून आपणास पाणीपुरवठा होतो.

मुलांनो, माझी आई सांगायची की, आग, वेग, हवा आणि पाणी यांच्याशी कधीच मस्ती करायला जाऊ नये. कारण यांच्या खोलाचा आपल्याला अंदाज येत नाही. एक छोटीशी आग कधी मोठ रूप धारण करेल सांगता येत नाही. वेगाचंही तसंच आणि पाण्याचंही. वरवर दिसणाऱ्या नदीच्या पाण्याचा तळ किती खोल असेल सांगता येत नाही. तसाच नदीच्या प्रवाहाचा ही अंदाज येत नाही. म्हणूनच नदीच्या पाण्यात खेळताना आपण काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराबद्दल वगैरे आपण वृत्तपत्रातून वाचत असतो. नदीचा प्रवाह कधी वाढेल, त्याचा जोर याचा आपण अंदाज करू शकत नाही. म्हणूनच काळजी घेतलेली नेहमीच बरी.....

नदी आपल्याच नादात खळखळ वाहत पुढेपुढे जात असते. ती आपल्याकडून काही मागत नाही. उलट तीच मानवाला, प्राणी, पक्षी आणि झाडांना भरभरून देत असते. सगळ्या निसर्गाला समृद्ध करत ती वाहत असते. अशा वेळी आपण मात्र तिचा विचार न करता तिच्यात सांडपाणी, कचरा टाकून तिला दुषित करत असतो. तिच्या शुद्ध पाण्याला दुषित करत असतो. तरीसुद्धा ती काहीही तक्रार न करता खळखळ करत समुद्राला भेटायला पुढे पुढे जात असते.

नदीला माता असेही म्हणतात. आपली आई जशी मुलांच्या सगळ्या चुका पोटात घालून आपल्याला भरभरून प्रेम देत असते, तसंच नदी देखील आपण तिला दुषित केलं, तरी आपल्यावर न रागवता आपल्याला पाणी देत असते. आपलं जीवन समृद्ध करत असते. अशा प्रत्येक नदीला स्वतःचा असा इतिहास आहे, संस्कृती आहे. काही रंजक गोष्टी आहेत. तर याबद्दलची सगळी माहिती आपण पुढच्या लेखापासून घेणार आहोत. आणि बरं का, ही माहिती मी नाही सांगणार, तर नद्या स्वतः तुमच्याशी बोलायला येणार आहेत, स्वत:बद्दल खूप काही सांगणार आहेत. तर वाचायची ना या नद्यांविषयी माहिती? चला तर भेटू पुढच्या लेखात एका प्रमुख नदीसोबत...

-उत्कर्षा मुळे-सागवेकर

[email protected]